पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
कोविड- 19 महामारीच्या काळामध्ये एलपीजी सिलेंडर्सचे वितरण
Posted On:
21 SEP 2020 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा एक भाग म्हणून पीएमयूवाय लाभार्थींना दि. 1 एप्रिल,2020 पासून तीन महिन्यांसाठी मोफत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. या योजनेला दि. 30 सप्टेंबर,2020 पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ज्यांनी या लाभार्थींना मोफत सिलेंडर पुरवठा करण्यासाठी अग्रिम रक्कम जमा केली आहे, परंतु ते दि. 30 जून 2020 पर्यंत भरलेले सिलेंडर्स विकत घेवू शकले नाहीत, त्यांना या योजनेच्या मुदतवाढीचा लाभ होवू शकणार आहे. दि. 16 सप्टेंबर, 2020 पर्यंत पीएमयूवायअंतर्गत 13.57 कोटी लाभार्थींना मोफत सिलेंडर पुरविण्यात आले आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ भारतामध्ये तयार केलेले सिलेंडर्सची खरेदी या विपणन कंपन्यांकडून करण्यात येते. सिलेंडरची आयात केली जात नाही. भारतामध्ये एलपीजीला असलेल्या मागणीपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यामुळे मागणीच्या पूर्ततेसाठी एलपीजीची आयात केली जाते. एप्रिल, 2020 ते जून 2020 या काळामध्ये एलपीजीच्या मागणीपैकी 44 टक्के देशामध्ये एलपीजीचे उत्पादन झाले होते. उर्वरित 56 टक्के मागणी आयातीव्दारे पूर्ण करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एलपीजीच्या किंमतीमध्ये होणारी चढउतार लक्षात घेवून त्याचे परिणाम देशांतर्गत एलपीजी ग्राहकांना भोगावे लागू नयेत, यासाठी सरकार अनुदानित एलपीजीच्या विक्री किंमतीमध्ये बदल करीत असते. आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार मासिक एलपीजी अनुदानाच्या अनुषंगाने ‘पहल’ योजनेनुसार सुधारणा करण्यात येते. विना अनुदानित सिलेंडरची खरेदी केली गेली, त्याप्रमाणे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाते. अनुदानाचा भार हा शासनावर पडतो. सध्या दिल्लीमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्रीची किंमत 594 रुपये आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिली.
M.Iyengar/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657357)
Visitor Counter : 256