उपराष्ट्रपती कार्यालय
भारतातील तसेच जगभरातील सर्वांनीच आयुर्वेदाचा फायदा घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
परिणामकारक आरोग्य रक्षक पद्धती म्हणून काल सुसंगत राहण्यासाठी आयुर्वेदाने सतत सुधारणा करून घ्यायला हव्यात – उपराष्ट्रपती
Posted On:
15 SEP 2020 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2020
आयुर्वेदाचे सखोल ज्ञान वापरून कोविड-19 महामारीशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार पद्धती म्हणून वापर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले. आयुर्वेदात सांगितलेल्या नैसर्गिक उपाययोजनांच्या मदतीने आपली प्रतिकारशक्ती वाढवून विषाणूंशी लढा देता येईल असे ते म्हणाले.
भारतीय उद्योग परिसंस्था (CII) यांच्या वतीने आयोजित 'प्रतिकारशक्तीसाठी आयुर्वेद' या विषयावर आधारित ऑनलाइन जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेचे उद्घाटन करताना नायडू बोलत होते. आयुर्वेद ही फक्त औषधोपचार पद्धत नसून ते जीवनाचे तत्वज्ञान आहे , असेही ते म्हणाले.
आयुर्वेदाच्या उपचार पद्धती ज्यावर अवलंबून आहे त्या तत्वांबद्दल बोलताना नायडू म्हणाले, शरीराची आरोग्य यंत्रणा राखण्यासाठी नैसर्गिक घटक आणि शरीरातील त्रिदोष यांचा तोल सांभाळणे हे आयुर्वेदाचे मुख्य सूत्र आहे. प्रत्येकाची शारीरिक घडण एकमेवाद्वितीय असते आणि उपचारांना किंवा औषधाला मिळणारा प्रतिसाद हा व्यक्तीनुसार बदलतो.
परिणामकारक आरोग्यरक्षक यंत्रणा म्हणून आयुर्वेदाला सतत कालसुसंगत रहात विकसित होणे आवश्यक आहे, असे नमूद करत नवीन औषधांच्या चाचण्यांसाठी सरकार आणि खासगी क्षेत्राने एकत्र येऊन अत्याधुनिक संशोधन आणि विकास यंत्रणा उभारणे आवश्यक आहे असेही नायडू म्हणाले.
आयुर्वेदिक औषधांचे गुणधर्म आणि त्यांच्या वापरामुळे होणारे परिणाम यांचे वैज्ञानिक पद्धतीने योग्य दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे, असे नमूद करतानाच नायडू यांनी भारतातील तसेच जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पारंपारिक औषधी स्वस्त असतात आणि त्या लोकांना परवडू शकतात असेही नायडू म्हणाले.
आयुर्वेदाच्या वाढीसाठी, नवनवीन आयुर्वेदिक औषधे तयार होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेणे आवश्यक आहे असा सल्ला नायडू यांनी दिला. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील तज्ञांनी राष्ट्रीय संशोधन संस्था या सारख्या संस्थांशी संलग्न राहून आयुर्वेदात लोकप्रियता जगभरात कशी मिळेल या दिशेने काम करणे आवश्यक आहे असेही नायडू म्हणाले.
आपल्या पारंपारिक औषध उपचार पद्धतीत अजून जास्त संसाधनांचा वापर होणे आवश्यक आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअपना प्रोत्साहन आणि पोषक वातावरण देऊन या उद्योगात पारंगतता मिळवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तयार करणे आवश्यक आहे त्यामुळे या क्षेत्रात निर्यातीलाही वाव मिळेल असे ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, CII अध्यक्ष थॉमस जॉन मुथूट, CII आयुर्वेद पॅनलचे सहसंचालक बेबी मॅथ्यू, आयुर्वेद उद्योगातील मान्यवर, आयुर्वेद असोसिएशनचे सभासद, आयुर्वेदिक डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेतला
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654686)
Visitor Counter : 532