पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
विपरित स्थितीमध्येही तसेच औद्योगिक कार्य सुरू असतानाही स्वच्छ हवा आणि निळे आकाश यांच्यासह हरित पृथ्वी शक्य- प्रकाश जावडेकर
आगामी दहा वर्षांत कार्बन उत्सर्जनामध्ये 35 टक्के कमी करण्याचे लक्ष्य भारत गाठणार - जावडेकर यांनी व्यक्त केला आत्मविश्वास
नैसर्गिक भयंकर आपत्तींमधून केवळ शाश्वत जीवनशैलीच मानवजातीला वाचवू शकेल- केंद्रीय पर्यावरण मंत्री
आत्मनिर्भरता म्हणजे इतरांपासून दूर जाणे नाही, तर जगाबरोबर अधिक जोडले जाणे आहे
Posted On:
09 SEP 2020 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2020
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, भारत सरकार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कटिबद्ध आहे. आज नवी दिल्ली येथे 15 व्या शाश्वत शिखर परिषद 2020 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत आणि स्वावलंबी भारताच्या कृती कार्यक्रमाच्या विशेष सत्राला जावडेकर यांनी मार्गदर्शन केले. आगामी दहा वर्षांत कार्बन उत्सर्जनामध्ये 35 टक्के कमी करण्याचे लक्ष्य भारत गाठेल, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता सातत्याने वाढत आहे आणि जगभरातील 68 देशांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी कराराला मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारताला सर्व क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्म निर्भर भारत कार्यक्रम सुरू केला आहे, याविषयी बोलताना पर्यावरण मंत्री जावडेकर म्हणाले, यामुळे भारत काही जगापासून तुटणार किेवा दूर जाणार नाही. तर याउलट जगाबरोबर अधिकाधिक जोडला जाणार आहे. नवसंकल्पना आणि संशोधन हे दोन्ही आजच्या काळात गुरूकिल्ली ठरणार आहे. नाविन्यवपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी करण्यात येणारे संशोधन आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे आयातीमध्ये घट होईल आणि निर्यातीमध्ये वाढ होवू शकणार आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना आणण्यासाठी संशोधन क्षेत्रामध्ये भारत अग्रणी बनला पाहिजे. संशोधनाच्या गुरूकिल्लीमुळेच आगामी दशकामध्ये देश विकासाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ हवा आणि निळे आकाश यांच्यासह हरित पृथ्वी असणे महत्वाचे आहे, असे सांगून प्रकाश जावडेकर कोविड -19 नंतर निर्माण झालेल्या विपरित परिस्थितीतही औद्योगिक कार्याबरोबरच हे करणे शक्य होणार आहे. जगाचा विचार केला तर भारताकडे केवळ 2.5 टक्के भूमी आहे. तर 4 टक्के ताज्या जलाचे स्त्रोत आहेत. जगातल्या लोकसंख्येपैकी जवळपास 20 टक्के लोकसंख्या आपल्याकडे आहे. तरीही जगातल्या जैवविविधतेपैकी 8टक्के जैववैविध्य भारतामध्ये आहे, याचे कारण म्हणजे भारताची संस्कृती आहे. वृक्ष, सर्व वनस्पती त्याचबरोबर विविध प्रकारचे जीवजंतू हे आपल्या जीवनशैलाचा हिस्सा आहेत.
नैसर्गिक आपत्तींपासून मानवजातीचा बचाव करायचा असेल तर शाश्वत जीवनशैलीच उपयोगी ठरणार आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केले. यासाठी शाश्वत विकासाविषयी वेगवेगळ्या देशांनी अभ्यास सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेल्या काही वर्षांपासून देशाने हरित वृद्धीकडे विशेष लक्ष दिल्याचे नमूद करून जावडेकर म्हणाले, हवामान परिवर्तनाविषयी भारत सातत्याने चर्चा करीत आहे, कार्यही करीत आहे. आमच्या सरकारने उज्ज्वला योजना, ई-वाहने, वाहनांसाठी बीएस-फोर इंजिन्स, जैवइंधन, स्वच्छ हवा आणि आपत्तीच्या काळात लवचिक धोरण स्वीकारून शाश्वत भारत बनविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. देशाने कार्बन उत्सर्जनामध्ये 35 टक्के घट आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. आत्तापर्यंत आम्ही 21 टक्क्यांपर्यंत पोहोचलो आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातून आगामी 10 वर्षात 220 जीडब्ल्यू ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आमचे आहे. यामध्ये 87 जी डब्ल्यू सौर आणि पवन ऊर्जेचा समावेश असणार आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही करीत असलेल्या ऊर्जा मिश्रणामुळे आता नवीकरणीय स्त्रोतांमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमध्ये 37टक्के अक्षय ऊर्जेचा समावेश आहे.
‘‘आत्मनिर्भर भारतासाठी दयाळू भांडवलशाही’’ या विषयावर सीआयआय-आयटीसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी म्हणाले, कोणत्याही व्यवसायासाठी शाश्वत धोरणे हा त्याचा अविभाज्य घटक आहे. सीआयआयचे महा संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी स्वावलंबी आणि शाश्वत भारतासाठी सर्वसमावेशक भूमिकेवर भर दिला.
सीआयआयच्यावतीने शाश्वत शिखर परिषदेचे 2006 पासून दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये या विषयावर चर्चा यामुळे होत आहे. ‘15वी शाश्वत परिषद- आगामी दशकासाठी कृती कार्यक्रम’यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून या कार्यक्रमाला आगामी दशकामध्ये आकार देण्यात येणार आहे. कोविड-19 महामारी आणि त्यामुळे झालेले परिणाम म्हणजे- नवसंकल्पना, तंत्रज्ञान आणि विचारपूर्वक केलेली कार्यप्रणाली यामुळे आपल्याला आगामी दशकामध्ये अधिकाधिक शाश्वत विकास होण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे, याचे प्रतिबिंब परिषदेवरही पडले.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652738)
अभ्यागत कक्ष : 200