वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत स्वच्छ ऊर्जा मोहिमेवर सामूहिक मानसिकतेतून काम करीत आहे - पीयूष गोयल


नवीकरणीय स्त्रोतांमुळे जगामध्ये एक दिवस जवळपास मोफत ऊर्जा मिळू शकेल - पीयूष गोयल

Posted On: 09 SEP 2020 12:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

भारत स्वच्छ ऊर्जा मोहिमेवर सामूहिक मानसिकतेतून काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. आयएसए अर्थात आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्यावतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेमध्ये ते  बोलत होते. या आभासी परिषदेत गोयल पुढे म्हणाले, ‘‘ स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताची स्वतःची सर्वात उत्तम गुंतवणूक म्हणजे सर्व विभाग, लोक यांच्यामध्ये सामूहिक मानसिकता निर्माण झाली आहे, त्यामुळे काम वेगाने होत आहे. सर्वांनाच स्वच्छ ऊर्जेचे महत्व पटल्यामुळे आणि आपल्या आगामी पिढ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी एकमेकांना पाठिंबा दिला जात आहे.’’

सौर ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञानामुळे हे जग स्वच्छ आणि उत्तम स्थान बनविण्यासाठी शक्ती  मिळत असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.

पेट्रोलियम आणि वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये गॅस आधारित अर्थव्यवस्थेला प्रारंभ झाला असल्याचे सांगून गोयल यांनी यावेळी प्रधान यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.  देशामध्ये परिवर्तनात्मक सुधारणा घडून येत आहे. अगदी जीवाश्म इंधनापासून ते आताच्या नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा विचार केला तर हे संक्रमण महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

एक दिवस असा येईल की, संपूर्ण जगाला जवळपास मोफत ऊर्जा मिळू शकेल, अशी कल्पना मी करीत आहे, असे सांगून पीयूष गोयल म्हणाले, एकट्या भारतामध्ये 745 जीडब्ल्यू सौर ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे, आपली गरज भागवण्यात आल्यानंतर उर्वरित ऊर्जा जगाच्या इतर भागांनाही पुरविणे शक्य आहे. महासागर पार करून पारेषण वाहिन्याद्वारे जागतिक ग्रिड कार्यरत करता येवू शकते. जगाच्या काही भागामध्ये सूर्यप्रकाश दीर्घकाळ मिळतो, त्याचबरोबर पवन ऊर्जाही मोठ्या प्रमाणावर निर्माण करता येवू शकते. जलविद्युत प्रकल्पासाठी जगाच्या निरनिराळ्या भागातून पाण्याचा वापर केला जात आहेच.

गेल्या काही वर्षात घेतलेल्या महत्वाच्या सामूहिक निर्णयांपैकी एक म्हणजे कार्बन उत्सर्जनाचा स्तर कमी करणे हा  आहे. सीओपी-21 शिखर परिषदेमध्ये घेतलेला हा निर्णय सर्वांच्या चांगल्या, स्वच्छ भविष्यासाठी अतिशय महत्वाचा होता, असे पीयूष गोयल यांनी यावेळी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला 100 पेक्षा जास्त देशांनी मान्यता दिल्याबद्दल या आघाडीचे गोयल यांनी अभिनंदन केले. एस म्हणजे स्टेबल-स्थिर, यू- अनकंडिशनल- कोणत्याही अटीविना, आर- रिन्यूवेबल-नवीकरणीय, ए- अफोर्डेबल- सर्वांना परवडणारी आणि जे- जस्टिस- न्याय्य अर्थात ‘सूरज’च्या अमर्याद सामर्थ्‍यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी  केले.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652552) Visitor Counter : 108