पर्यटन मंत्रालय
केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आज नवी दिल्लीत ट्रॅव्हल मीडियाबरोबर “कोविड-19 नंतर अतुल्य भारताला प्रोत्साहन” या विषयावर विचारमंथन सत्र आयोजित केले.
कोविड -19 नंतरच्या काळात भारत पुन्हा एकदा पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून उदयाला येईल – पटेल
Posted On:
08 SEP 2020 7:36PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र कार्यभार ) प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज नवी दिल्लीत हितधारक आणि ट्रॅव्हल मीडिया यांच्यासमवेत कोविड --19नंतर अतुल्य भारताला प्रोत्साहन या विषयावर विचारमंथन सत्र आयोजित केले. या सत्रात सुमारे 30 प्रभावशाली व्यक्ती आणि ट्रॅव्हल मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सत्रात पर्यटन महासंचालक मीनाक्षी शर्मा, आयटीडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी कमला वर्धन राव,पर्यटन उपमहासंचालक रुपिंदर ब्रार, पर्यटन सहसचिव राकेश कुमार वर्मा आणि पर्यटन मंत्रालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. कोविड -19 महामारी दरम्यान हितधारकांसह ही पहिली प्रत्यक्ष बैठक होती ज्यात सरकारच्या नियमावलीतील सावधगिरी आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन केले गेले.
पर्यटनमंत्र्यांनी सत्राचे उदघाटन केले आणि सर्वांना विनंती केली की त्यांनी भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपल्या मोलाच्या सूचना द्याव्यात. ते म्हणाले की आपण सर्व जण भारताचे प्रतिनिधित्व करतो आणि आपल्या देशात कोविड -19 नंतर पर्यटनाच्या संधीबद्दल विचार करणे ही आपली जबाबदारी आहे. ते म्हणाले की हे असे व्यासपीठ आहे जिथे आपण समस्येबद्दल तसेच पर्यटनाशी संबंधित उपक्रमांच्या संदर्भात उपायांबद्दल बोलू शकतो. पटेल म्हणाले की, परिस्थिती सामान्य झाल्यावर भारत पुन्हा पर्यटन क्षेत्रात गतिमान होईल. आपण सर्वानी कोविड -19 नंतरच्या जगासाठी तयार असायला हवे जिथे पर्यटकांना त्यांचा प्रवास अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आपण एक उत्तम आणि सुरक्षित वातावरण देऊ शकू . ते म्हणाले की, लोक सकरात्मक असून सावधगिरीने भारताचे सौंदर्य शोधण्यासाठी तयार आहेत; या महामारीच्या काळात ते आपल्यावर विश्वास ठेवू शकतील असे वातावरण आपण तयार केले पाहिजे.
सत्रादरम्यान विविध हितधारक आणि ट्रॅव्हल मीडिया प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले आणि पर्यटकांसाठी सुरक्षित, मैत्रीपूर्ण, सुगम्य , जबाबदार व सर्व पर्यटकांसाठी, विशेषतः स्त्रियांसाठी किफायतशीर पर्यटन बनवण्याबाबत बहुमूल्य सूचना दिल्या. काही सहभागींनी देशांतर्गत पर्यटनावर आणि भारतातील कमी लोकप्रिय स्थळांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, भारत छुप्या रत्नांचे घर आहे आणि या कमी ज्ञात पर्यटन स्थळांची माहिती व सुविधा देऊन आपण या भागात पर्यटनाला चालना दिली पाहिजे. एका सहभागीने सुरक्षिततेच्या उपायांसह कॅम्पिंगसाठी अधिक स्थळे खुली करण्याची सूचना केली जेणेकरुन आपण भारतात साहसी पर्यटनाला चालना देऊ शकू. अनुभवात्मक पर्यटनाला चालना देण्याच्या सूचनादेखील सहभागींकडून आल्या; ते म्हणाले की, यामुळे इतर पर्यटकांनाही वेगळी ठिकाणे शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. सर्वसामान्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी माहिती सामायिकरण यंत्रणा खूप मजबूत असायाला हवी असे निरीक्षण नोंदण्यात आले.
सत्राच्या अखेरीस पर्यटनमंत्र्यांनी मंथन सत्रात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले की आपल्या धोरण आखणीत आम्हाला सर्व हितधारकांचा सहभाग हवा आहे म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना आपले अभिप्राय देण्यासाठी आमंत्रित केले आहे. ते म्हणाले की आम्ही तुमच्या सूचना नोंदवून घेतल्या आहेत आणि त्या भविष्यातील धोरण नियोजनात समाविष्ट केल्या जातील. पटेल यांनी अशी आशा व्यक्त केली की कोविड -19 नंतरच्या काळात भारत पुन्हा एकदा पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून उदयाला येईल, तोपर्यंत आपण आपल्या देशांतर्गत पर्यटनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण आता जे भारतीय परदेशातील ठिकाणांना भेट देणार होते ते आता केवळ देशांतर्गत स्थळांना भेट देतील आणि यामुळे आपल्या पर्यटन उद्योगाला बळ मिळेल.
----
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652427)
Visitor Counter : 262