गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

कोची मेट्रोच्या थाईकुडम-पेट्टा मार्गाचे उद्घाटन


25.2 किमी मार्ग कार्यान्वित

कोची जल मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीसाठी सज्ज

Posted On: 07 SEP 2020 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2020


थाईकुडम-पेट्टा मार्ग सुरु झाल्यामुळे  केरळ मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांनी केली आहे . पुरी पुढे म्हणाले की, कोची मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यासाठी  6218 कोटी रुपये खर्च झाला आहे. ते पुढे म्हणाले की, कोची मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबतचा  प्रस्ताव केंद्र  सरकारच्या सक्रिय विचाराधीन असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. कोची मेट्रोच्या थाईकुडम-पेट्टा मार्गाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.

 

ऑनलाईन उदघाटन समारंभाला संबोधित करताना पुरी यांनी मेट्रोच्या परिचालनासाठी वेगवेगळ्या राज्यात जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करत देशातील जनतेने जबाबदारपणे प्रवास करण्याचे आवाहन केले.  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या आभासी उद्घाटन प्रसंगी केरळच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी दुपारी साडेबारा वाजता पेट्टा येथून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.  एसएन जंक्शन ते थ्रीप्पुनिथुरा पर्यंत नागरी कामांचा शुभारंभ फलकांचे अनावरण करून करण्यात आला. आभासी उद्घाटनामध्ये केरळचे मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.

गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी कोची मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल केरळ सरकार आणि केरळच्या जनतेचे अभिनंदन केले. आज थाईकुडम ते पेटा पर्यंतच्या 1.33 किमी लांबीच्या मार्गाच्या उद्घाटनासह एकूण परिचालन मार्ग  25.2 किमी असेल. तंत्रज्ञानापासून मनुष्यबळ, प्रक्रिया आणि परिचालनाच्या बाबतीत  कोची मेट्रो  अग्रेसर राहिली आहे. पेट्टा-थाईकुडम मार्ग सुरु झाल्यामुळे कोची मेट्रोला प्रवासी संख्या  दररोज एक लाखांहून अधिक वाढवता येऊ शकेल.

जर्मन बँक, केएफडब्ल्यूच्या आर्थिक मदतीने केएमआरएल  747 कोटी रुपये खर्च करून कोची जल मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी सज्ज आहे. कोची हे देशातील पहिले शहर आहे जेथे मेट्रोला फीडर सेवा म्हणून जलवाहतूक जोडली आहे.  कोची मेट्रोने मच्छीमार समुदायासाठी भिंती समर्पित केल्या आहेत ज्यांनी 2018 मध्ये केरळमधील पुराच्या वेळी  हजारो लोकांना वाचवले. केएमआरएलने एलजीबीटी समुदायामधील व्यक्तींना त्यांच्या कामकाजात सहभागी केले आहे आणि अशा प्रकारे तृतीयपंथीयांची नेमणूक करणारी ही  देशातील पहिली संस्था बनली आहे.

कोची मेट्रोचे आणखी एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे त्याची संकल्पना आधारित मेट्रो स्थानके. पश्चिम घाटांच्या मुख्य संकल्पनेवर आधारित कोची मेट्रोने केरळचा वारसा, संस्कृती, कला इत्यादी विविध संकल्पना निवडल्या आहेत. पेटा मेट्रो स्थानकासाठी केएमआरएलने  राज्यातील मच्छीमार समुदायाला समर्पित  म्हणून मत्स्यपालन संकल्पना  निवडली आहे. स्वयंचलित भाडे संकलन (एएफसी) व्यवस्था  कोणत्याही मेट्रो यंत्रणेचा एक महत्वाचा  घटक आहे. केएमआरएलने एक विशेष पीपीपी मॉडेल विकसित केले आहे जेथे भांडवल गुंतवणूक तसेच देखभाल खर्चाची काळजी बँकेने उचलली आहे आणि त्या बदल्यात बँकेकडे कोची मेट्रो सिस्टमसाठी  को-ब्रांडेड कार्ड असेल. प्रथमच अशा प्रकारचे अभिनव मॉडेल सुरु करण्यात आले असून मेट्रो उद्योगात जागतिक स्तरावर एएफसी यंत्रणेसाठी वित्तपुरवठा मॉडेल बदलले जाण्याची शक्यता आहे. 

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांनी मे, 2020 मध्ये पेट्टा मेट्रो स्थानक सुरू करायला मंजुरी दिली होती. केएमआरएलने मार्चमध्येच पेट्टा स्थानकाची कामे पूर्ण केली होती परंतु कोविड 19 लॉकडाऊनमुळे सुरु करायला विलंब  झाला.


 
* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652051) Visitor Counter : 203