गृह मंत्रालय

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन देशासाठी अतिशय दुःखद - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह


‘‘भारतीय राजकीय क्षितिजावर प्रणवदांनी अनेक दशके आपल्या नावाप्रमाणेच कार्यानेही तेज दाखवले’’

‘‘पक्षाला तसेच विरोधकांनाही सदोदित बरोबर घेवून प्रणवदा पुढे जात होते; एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांच्या भाषणांनी, चर्चांनी देशाला नवीन दिशा प्रदान केली’’

‘‘विरोधक असताना धोरणांवर केलेली कठोर टीका असो अथवा स्वतःचे धोरण निर्धारण असो, दोन्हीमध्ये प्रणवदांच्या कौशल्याचे दर्शन दिले’’

‘‘ज्यावेळी ते सत्तेमध्ये होते, त्यावेळी ते नेहमीच विरोधकांबरोबर संतुलन राखून काम करीत राहिले आणि ज्यावेळी विरोधक बनले त्यावेळी रचनात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्याचे कार्य केले’’

‘‘प्रणवदांनी राष्ट्रपती पदावर असताना परदेशामध्ये आपल्या विव्दतापूर्ण आणि अभ्यासू स्वभावाने तसेच इतिहास आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राचा सन्मान नेहमीच वृद्धिंगत केला’’

‘‘देशाची जनता आणि सार्वजनिक जीवनामध्ये कार्य करणा-या आम्हा सर्व लोकांच्या दृष्टीने त्यांचे निधन म्हणजे कधीही भरून न येणारी हानी’’

Posted On: 01 SEP 2020 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2020 


माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे  निधन संपूर्ण देशाच्या दृष्टीने अतिशय दुःखद असल्याचे, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, भारतीय राजकीय क्षितिजावर प्रणवदांनी अनेक दशके आपल्या नावाप्रमाणेच कार्यानेही तेज दाखवले. त्यांनी निरंतर राष्ट्राला मजबूत करण्याचे काम केले. पक्षाला तसेच विरोधकांनाही सदोदित बरोबर घेवून प्रणवदा पुढे जात होते; एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांच्या भाषणांनी, चर्चांनी देशाला नवीन दिशा प्रदान केली. 

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी असेही म्हटले आहे की, ‘‘विरोधक असताना धोरणांवर केलेली कठोर टीका असो अथवा स्वतःचे धोरण निर्धारण असो, दोन्हीमध्ये प्रणवदांच्या कौशल्याचे दर्शन दिले’’ राजकीय क्षेत्रामध्ये इतक्या दीर्घ काळामध्ये त्यांनी वित्त, विदेश, संरक्षण आणि वाणिज्य यांच्यासमवेत अनेक मंत्रालयांवर प्रणवदांच्या कामाचा अमिट ठसा दिसून येतो. 

गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, ‘‘कोणत्याही त्रुटीविना सार्वजनिक जीवनामध्ये इतके दीर्घ काळ योगदान देणे, ही मोठी गोष्ट आहे. प्रणवदांकडे सर्वांना बरोबर घेवून जाण्याचे एक विशेष कौशल्य होते. ज्यावेळी ते सत्तेमध्ये होते, त्यावेळी त्यांनी नेहमीच विरोधकांबरोबर संतुलन राखून काम करीत राहिले आणि ज्यावेळी विरोधक बनले त्यावेळी रचनात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्याचे कार्य केले’’

गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की,‘‘काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सेवा करून दीर्घकाळ भारतीय राजकारणामध्ये राहून त्यांनी अमूल्य योगदान दिले. राजकारण समृद्ध बनवले,  खूप चांगले मार्गदर्शक कार्य त्यांनी केले. त्यांचे राजकीय योगदान राजकारणामध्ये येवू इच्छिणा-या प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी असेल.’’ 

अमित शाह असेही म्हणाले, ‘‘ ज्यावेळी प्रणवदा भारताचे राष्ट्रपती बनले त्यावेळी राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांनी काहीही  कमी केले नाही. राष्ट्रपती भवनाची व्दारे सर्वसामान्य लोकांना मुक्त करण्याचा खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रणवदांनी राष्ट्रपती पदावर असताना देश आणि परदेशामध्ये आपल्या विव्दतापूर्ण आणि अभ्यासू स्वभावाने तसेच इतिहास आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राचा सन्मान नेहमीच वृद्धिंगत केला’’ 

गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले, ‘‘ आज प्रणवदा आपल्यामध्ये नाहीत,  त्यांची अनुपस्थिती सर्वांना नेहमीच जाणवत राहील. देशाची जनता आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करणा-या सर्वांना प्रणवदांचे जाणे दीर्घ काळापर्यंत न भरून येणारी हानी असणार आहे.’’ अमित शाह पुढे म्हणाले, माझ्या मते राजकारणामध्ये जे कोणी येवू इच्छितात त्यांना प्रणवदांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. राजकारणामध्ये राहून कोणत्याही वादविवादाशिवाय कसे काम करता येते, याचा आदर्श प्रणवदांकडून घेतला पाहिजे. त्यांच्या जीवनकार्याचा सर्वांनी अगदी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. अमित शाह म्हणाले की, ‘‘ ईश्वराने प्रणवदांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि प्रणवदांच्या परिवाराला या संकटाच्या काळामध्ये दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी. ओम शांती शांती शांती’’. 

 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650513) Visitor Counter : 151