गृह मंत्रालय
केंद्रीय गृहसचिव आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी केंद्रशासित प्रदेशांतील कोविड-19 संक्रमणाचा प्रसार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला
Posted On:
29 AUG 2020 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2020
केंद्रीय गृहसचिव आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी पुदुच्चेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगरहवेली, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांत कोविड-19 संक्रमणाचा प्रसार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांचा आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, केंद्रीय गृहसचिवांना चाचण्या करण्याविषयीच्या उपाययोजनांची माहिती दिली. कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचे व्यवस्थापन, कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचे अलगीकरण, आरोग्य पायाभूत सुविधा/आरोग्य कर्मचारी यांची उपलब्धता, निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांविषयी माहिती दिली.
केंद्रीय गृहसचिव आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांना सूचना केली की, कोविड-19 संक्रमण व्यवस्थापनासंबंधी कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
केंद्रशासित प्रदेशांना चाचण्यांच्या सुविधांचा आणखी विस्तार करण्यास सांगण्यात आले. कोविड रुग्णाचे लवकर निदान व्हावे यासाठी प्रभावी देखरेख करावी, प्रभावी संपर्क मागोवा, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, प्रतिबंधित क्षेत्राचे स्पष्ट सीमांकन करुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, खाटांची संख्या, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेंटीलेटर्स, आयसीयु खाटा, रुग्णवाहिका या आरोग्य सुविधांचा विस्तार करावा. जनतेमध्ये प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जागृती करावी. केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649675)
Visitor Counter : 199