ऊर्जा मंत्रालय

POSOCO मधील महिला कर्मचाऱ्यांचा असाधारण कार्यांचा गौरव करणारी “नारी शक्ती” ध्वनीचित्रफीत POSOCO कडून प्रसारित

Posted On: 28 AUG 2020 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

POSOCO, ऊर्जा व्यवस्था कार्यान्वयन महामंडळ लिमिटेड, या राष्ट्रीय ऊर्जा ग्रीड संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आज आपल्या कंपनीत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाची ध्वनीचित्रफीत म्हणजेच व्हिडीओ प्रसारित केला आहे. मनुष्यबळ विभागाच्या अध्यक्षा मीनाक्षी डावर यांच्या हस्ते हा  व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये  POSOCO चे अध्यक्ष केव्हीएस बाबा, सिस्टिम्स ऑपरेशन्स चे संचालक एस आर नरसिंहन, SRLDC च्या वरिष्ठ महाव्यवस्थापक टी कलानिथी यांच्यासह इतर मान्यवर सहभागी झाले होते.

आज नोकरदार महिलांसमोर असे आव्हान आहे की स्त्री-पुरुष दोन्ही असलेल्या चमूंमध्ये आपला अधिक प्रभाव कसा निर्माण करावा.  मात्र हे लक्ष्य साध्य करण्यासाठी  POSOCO महिलांना अनेक उत्तम संधी देत असते. पारंपारिक समजुतींच्या पलीकडे जात काम करण्याचे, आपल्या चमूला प्रेरित करण्याचे, आपल्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याचे आणि इच्छित धेय्य गाठण्यासाठी काम करण्याची संधी, POSOCO ने कायमच महिलांना दिली आहे.असे मीनाक्षी डावर यावेळी म्हणाल्या.

POSOCO मधील महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि नेतृत्वगुणांनी हे कायमच सिध्द केले की त्यांच्या कामाचा संस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो POSOCO मधल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या कटिबद्धते विषयी आणि या संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल मी या सर्वांचे अभिनंदन करते असेही त्या पुढे म्हणाल्या.

मीनाक्षी डावर याही विविध संस्था आणि कंपन्यांच्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत.

SRLDC च्या वरिष्ठ महाव्यवस्थापक, टी कलानिथी यावेळी म्हणाल्या की, POSOCO ही ज्ञान-आधारित कंपनी आहे.  या कंपनीतील कार्यक्षम अभियंतांच्या चमूचे नेतृत्व करण्याची आणि नवनवी आव्हाने पेलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. मला या कंपनीत मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी आणि माझ्या सृजनशीलतेनुसार निर्णय घेण्याचे तसेच कामाचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कलानिथी यावेळी म्हणाल्या. व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर महिलांच्या सर्वांगीण प्रगतीकडे, POSOCOचे विशेष लक्ष असते, असेही त्यांनी सांगितले.

POSOCO कंपनीत सर्व श्रेणीत महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. POSOCO च्या व्यवस्थापनाद्वारे महिलांना कायमच नवनव्या संधी आणि प्रगतीची दारे उघडी करुन दिली जातात. व्यावसायिक प्रगतीसोबतच, काम आणि आयुष्य यांचा समतोल, ज्ञानाचे आदानप्रदान आणि आणखी ज्ञान-कौशल्ये शिकण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. महिला कर्मचाऱ्यांसाठीचे विशेष उपक्रम हे POSOCO कंपनीचे अविभाज्य वैशिष्ट्य आहे.

SRLDC च्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक सी रिती नायर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. POSOCO कंपनीचा भाग असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या. भारतीय उर्जा व्यवस्थेच्या अंतर्गत ग्रीडच्या व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी या कंपनी कडे आहे. आणि आमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना व्यवस्थापनाचा आम्हाला भक्कम पाठींबा असतो, असे नायर यांनी सांगितले.

नारी शक्तीचा व्हिडीओ बघण्यासाठी https://posoco.in/video-gallery/.या लिंकवर क्लिक करा.

POSOCO, ऊर्जा व्यवस्था कार्यान्वयन महामंडळ लिमिटेड ही उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कंपनी असून, भारतीय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन च्या उर्जा व्यवस्थापनाची जबाबदारी या आस्थापनेवर आहे. ग्रीडचे एकात्मिक उर्जा पारेषण आणि कार्यान्वयन सुरक्षित सुरु ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ही कंपनी पार पाडते.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649232) Visitor Counter : 166