रेल्वे मंत्रालय
2030 पर्यंतची स्वतःच्या ऊर्जापूर्तीसाठी 33 अब्ज युनिटपेक्षाही जास्त ऊर्जा निर्मिती करण्यासाठी भारतीय रेल्वे सिद्ध; सध्या रेल्वेसाठी वर्षाला 21 अब्ज युनिट ऊर्जेची आवश्यकता
भारतीय रेल्वेच्यावतीने सौर ऊर्जा विकासकांच्या बैठकीचे आयोजन
रेल्वेच्या रिक्त आणि अतिक्रमण न झालेल्या भूमीवर सौर ऊर्जा उभारण्यासाठी विकासकांना भारतीय रेल्वे सर्वतोपरी मदत करणार
आघाडीच्या सौर विकासकांची बैठकीला उपस्थिती, भारतीय रेल्वे ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनविण्यासाठी सहभागीदार होण्याची सौर ऊर्जा विकासकांची तयारी
सन 2023 पर्यंत रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण करण्याची सिद्धता
2030 पर्यंत रिक्त भूमीचा वापर 20 जीडब्ल्यू क्षमतेचे सौर प्रकल्प स्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वेची भव्य योजना
भारतीय रेल्वे ‘आत्म-निर्भर’ होण्याच्या मार्गावर
Posted On:
27 AUG 2020 5:54PM by PIB Mumbai
राष्ट्रीय सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि भारतीय रेल्वेला उर्जेच्याबाबतीत स्वावलंबी बनविण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रेल्वेने प्रमुख भागधारकांबरोबर विस्तृत चर्चा केली.
भारतीय रेल्वेने सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे वाहतूक व्यवस्था ‘हरित’ करण्यासारखे आहे. रेल्वेची ऊर्जाविषयक गरजपूर्ती करताना आता अधिकाधिक सौर ऊर्जेचा वापर करण्याची आवश्यकता आहे. अशी चर्चा या बैठकीत झाली. यावेळी पुढील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला -
1. रेल्वं रूळांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय, कल्पना.
2. सन 2030 पर्यंत भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जक बनविण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्यासाठी संभाव्य पर्यायांचा विचार करणे
3. भारतीय रेल्वेपुढे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी येणा-या आव्हानांच्या पूर्ततेसाठी कार्य करणे
सौर ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे, त्यासाठी सौर ऊर्जा विकसकांनी आता पुढे आले पाहिजे. भारतीय रेल्वेला 2030 पर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनविण्यासाठी सहभागीदार होण्याची सौर ऊर्जा विकासकांनीही अतिशय उत्साहाने पाठिंबा आणि तयारी दर्शविली.
रेल्वे स्थानकांना लागणारी वीज सौर ऊर्जेतून मिळविण्यात यावी, यासाठी रेल्वेकडे असलेल्या अतिरिक्त जागेचा वापर करण्यासंबंधी पंतप्रधानांनी अलिकडेच दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराने राष्ट्रीय सौर अभियानामध्ये रेल्वेकडून योगदान देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
या सर्व गोष्टींचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने वापरात नसलेल्या आपल्या मालकीच्या जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. यामध्ये पहिला पथदर्शी प्रकल्प म्हणून बीनामध्ये उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये 1.7 मेगावॅट सौर ऊर्जा तयार होते. हा प्रकल्प थेट 25 केव्ही ट्रॅक्शन सिस्टमला जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर रायबरेली इथल्या मॉडर्न कोच फॅक्टरीसाठी (एमसीएफ) नाॅन ट्रॅक्शनचा 3 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. आणखी दोन प्रकल्पांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यामध्ये दिवाना येथे 2 मेगावॅटचा आणि भिलाई येथे 50 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांना राज्य ट्रान्समिशन युटिलिटी (एसटीयू) आणि सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी (सीटीयू) यांना जोडण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वे ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनविण्यासाठी सौर ऊर्जा विकासकांनी भारतीय रेल्वेच्या या प्रवासाचे सहभागीदार बनावे, असे आवाहन रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उपस्थितांना केले. भारतीय रेल्वे सन 2030 ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्याकडच्या रिक्त जागेचा उपयोग करून 20 जीडब्ल्यू क्षमतेचा सौर प्रकल्प सुरू करण्याची महत्वाकांक्षी योजना तयार केली आहे. या योजनेमुळे भारतीय रेल्वेची वार्षिक 21 अब्ज युनिट विजेची गरज सौर ऊर्जेेतून पूर्ण करता येईल, इतकेच नाही, तर भारतीय रेल्वे त्यापेक्षा जास्त म्हणजे 33 अब्ज युनिट सौर ऊर्जा निर्मिती करू शकणार आहे.
भारतीय रेल्वेद्वारे ‘शून्य कार्बन उत्सर्जक’ बनविण्याचा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी रेल्वे महत्वाकांक्षी सौर प्रकल्प उभारणार आहे. भारतीय रेल्वे ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनणारी देशातली पहिली परिवहन संस्था बनणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला हरित आणि आत्मनिर्भर बनणे शक्य होणार आहे.
रेल्वेच्या अतिरिक्त जमिनी, रेल्वे मार्ग तसेच रेल्वे ऊर्जा व्यवस्थापन कंपनी (आरईएमसीएल), तसेच सौर ऊर्जा विकासक, पुरवठादार या संबंधित प्रतिनिधींनी या बैठकीत चर्चा केली. रेल्वे मार्गाच्या बाजूने कुंपणाच्या भिंती बांधून रेल्वेच्या मालकीच्या जमिनीचे रक्षण करण्यात यावे, असे सांगण्यात आले.
रेल्वेच्या भूमींवर जेथे अतिक्रमण झालेले नाही, तिथे तर तातडीने सौर प्रकल्पांचे काम सुरू करण्यासंबंधी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी निर्देश दिले. रेल्वे मार्गाच्या बाजूने बांधकाम आणि विकासकांनी सीमा भिंती बांधून रेल्वे मार्गांचा गैरवापर रोखण्यास मदत करावी, असे सांगण्यात आले.
ऊर्जेच्याबाबतीत भारतीय रेल्वे स्वावलंबी बनविण्यासाठी आधुनिक परंतु स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. पंतप्रधान मोदी यांच्या ध्येयपूर्तीसाठी स्वदेशी, अक्षय ऊर्जा, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पीयूष गोयल यांनी यावेळी केले.
*****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648983)
Visitor Counter : 254