ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

रामविलास पासवान यांनी जव्हेरींसाठी नोंदणी व नूतनीकरण आणि परिक्षण आणि हॉलमार्किंग (ए अँड एच) केंद्रे अधिकृत मान्यता आणि नूतनीकरणाची ऑनलाइन प्रणाली सुरू केली

Posted On: 21 AUG 2020 8:23PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री  रामविलास पासवान यांनी आज आभासी पद्धतीने जव्हेरींसाठी नोंदणी व नूतनीकरण आणि परिक्षण आणि हॉलमार्किंग (ए अँड एच) केंद्रांच्या अधिकृत मान्यता आणि नूतनीकरणाची ऑनलाइन प्रणाली सुरू केली. भारतीय मानक ब्युरो च्या www.manakonline.in  या वेब पोर्टल ही ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रणाली सुरू करताना पासवान म्हणाले की, नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीने हाताळणे अवघड आहे, या ऑनलाइन मॉड्युल्समुळे जव्हेरी व उद्योजक दोघांनाही व्यवसाय स्थापित करणे व हॉलमार्किंग सेंटर स्थापित करणे किंवा तसे करण्याची तयारी असलेल्यांना सुलभ होईल. 1 जून 2021 पासून सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य केले जाईल.

प्रसार माध्यमांना योजनेबद्दल माहिती देताना पासवान म्हणाले की, ऑनलाईन प्रणालीतील कोणत्याही मानवी हस्तक्षेपा शिवाय अर्जांची पडताळणी होईल. आता जव्हेरी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आणि या ऑनलाइन पोर्टलद्वारे परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरू शकतात. ऑनलाईन प्रक्रियेविषयी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा जव्हेरी आवश्यक शुल्कासह अर्ज सादर करेल तेव्हा त्याची नोंदणी केली जाईल. ई-मेल व एसएमएस द्वारे जव्हेरीला नोंदणी क्रमांकाची माहिती दिली जाईल आणि नंतर तो नोंदणी क्रमांक वापरून नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड आणि मुद्रित करू शकेल.

पासवान म्हणाले की सोन्याचे दागिने आणि आभूषणे यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य झाल्याने नोंदणीसाठी पुढे येणाऱ्या जव्हेहीरांची संख्या सध्याच्या 31,000 वरून 5 लाखांवर जाण्याची अपेक्षा आहे. हॉलमार्क असणाऱ्या सोन्याचे दागिने आणि आभूषणे यांची संख्या वृद्धिंगत झालेली दिसून येईल. सध्याचा 5 कोटींचा आकडा 10 कोटींवर जाण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परिक्षण आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या वाढविणे  देखील आवश्यक आहे. सध्या देशातील 234 जिल्ह्यात 921 केंद्रे आहेत. बीआयएस जून 2021 पर्यंत उर्वरित 80 जिल्ह्यात ए अँड एच सेंटर कार्यान्वित करण्याचे दिशेने काम करीत आहे असे मंत्री म्हणाले. पासवान यांनी सांगितले की आता बीआयएस हॉलमार्क केवळ तीन प्रकारांसाठी देण्यात येईल. ए अँड एच केंद्राचे ओळख चिन्ह / संख्या आणि जव्हेरी ओळख चिन्ह / संख्येसह केवळ 14 कॅरेट (14 के 585), 18 (18 के 750) कॅरेट आणि 22 (22 के 916) कॅरेट साठी दिले जाईल.

भारतातील उत्पादनांसाठी IS किंवा EU मानके लागू करण्यासाठी विभाग कार्यरत आहे असे पासवान म्हणाले. सप्टेंबर, 2020 पासून बीआयएसचे अधिकारी आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांसह 7 भारतीय बंदरांवरील आयात केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि मानक तपासतील असे ते म्हणाले. जे विहित गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करतील केवळ तीच उत्पादने भारतीय बाजारात उपलब्ध करण्याची परवानगी दिली जाईल. सध्या देशाच्या आयात यादीमध्ये पोलाद, रसायन, अवजड यंत्र आणि खेळणी यांचा मोठा वाटा आहे.

पासवान यांनी माहिती दिली की बीआयएस बाजारात उपलब्ध असलेल्या विविध उत्पादनांच्या गुणवत्तेच्या तपासणीचे देखील काम करत आहे. सध्या 254 उत्पादनांसाठी क्यूसीओ उपलब्ध आहे आणि 268 उत्पादनांसाठी क्यूसीओ प्रक्रिया सुरु आहे. अधिक उत्पादनांना क्यूसी देण्यासाठी इतर मंत्रालये आणि विभागांशी चर्चा सुरु असल्याचे पासवान यांनी सांगितले.

****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647736) Visitor Counter : 151