आदिवासी विकास मंत्रालय
मुंबईमधील “ ट्राईब्स इंडिया शोरूमचे” अर्जुन मुंडा यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ई- उद्घाटन
Posted On:
21 AUG 2020 7:03PM by PIB Mumbai
केंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री अर्जुन मुंडा यांनी आज मुंबईत फोर्ट येथे एलआयसी वेस्टर्न झोनल कार्यालयाच्या इंडियन ग्लोब चेंबर्समधील ‘ट्राईब्स इंडिया शोरुम’चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. या व्हर्चुअल उद्घाटन कार्यक्रमाला आदिवासी व्यवहारमंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर,ट्रायफेडचे अध्यक्ष आर सी मीणा आणि ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कृष्णा, नामवंत डिझायनर रुमा देवी आणि चित्रपट अभिनेत्री पूजा बत्रा उपस्थित होते. 50 लाख आदिवासी कारागीर आणि वनोत्पादने गोळा करणाऱ्यांना त्यांच्या गरजेच्या काळात, उत्पन्न मिळावे, रोजगार मिळावा आणि चरितार्थ सुरू राहावा यासाठी त्यांच्या पाठिशी आपण अतिशय खंबीरपणे उभे आहोत, असे मुंडा यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

आदिवासी बांधवांना पाठबळ देण्यासाठी आपल्या मंत्रालयाचा निर्धार आणि ट्रायफेडचे एकीकृत प्रयत्न याविषयी बोलताना मुंडा यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी दिलेल्या व्होकल फॉक लोकल या संदेशाला अनुसरून वाटचाल करण्यासाठी आणि आदिवासींच्या चरितार्थाला चालना देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या ट्रायफेड या पणन विभागाने व्यापक परिणाम असलेले हे असाधारण उपक्रम सुरू केले आहेत. ही वन आणि आदिवासी उत्पादने आता देशभरातील 150 शहरांमधील ग्राहकांच्या दारात थेट पोहोचणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांना भक्कम करण्यासाठी छत्तीसगडमध्ये जगदलपूर आणि महाराष्ट्रात रायगडमध्ये ट्रायफूड प्रकल्पाचा एक भाग म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि एनएसटीएफडीसीच्या सहकार्याने गौण वन उत्पादन प्रक्रिया केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे हजारो आदिवासींना रोजगार संधी उपलब्ध होतील, असे मुंडा यांनी सांगितले.

मुंबईमधील फोर्टसारख्या प्रतिष्ठित भागामध्ये सुरू करण्यात आलेले ट्राईब्स इंडिया हे विक्री केंद्र मुंबईमधील तिसरे केंद्र आहे. सध्या पनवेल आणि जुहू येथे अशा प्रकारची दोन केंद्रे सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. फोर्ट, मुंबई येथे डी एन मार्गावर इंडियन ग्लोब चेंबर्समध्ये सुरू झालेले हे केंद्र देशभरातील 122वे ट्राईब्स इंडिया केंद्र आहे. सर्व 27 राज्यांमधील कला आणि हस्तकला उत्पादनांचा साठा ठेवण्याबरोबरच वन धन अत्यावश्यक वस्तू आणि या महामारीच्या काळात रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱी उत्पादने यावर प्राथमिक भर देणारे पहिले ठिकाण म्हणून या विक्री केंद्राकडे पाहिले जात आहे.


****
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647687)
Visitor Counter : 188