वस्त्रोद्योग मंत्रालय
भारतीय ताग महामंडळ आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्यामध्ये सन 2021-22 साठी सामंजस्य करार; ताग उत्पादकांना प्रमाणित उच्च दर्जाचे बियाणे पुरविण्यात येणार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
ताग महामंडळ 2021-22च्या पीक हंगामामध्ये ‘जेआरओ-204’वाणाचे तागाचे 10,000 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करणार
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2020 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020
देशामध्ये कच्च्या तागाच्या उत्पादनात आणि उत्पादकतेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालय भारतीय ताग महामंडळाच्या माध्यमातून करणार आहे. यासाठी ताग उत्पादक शेतकरी बांधवांना तागाचे प्रमाणित, उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळाबरोबर आज सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार तागाच्या उत्तम बियाणांचे वितरण ताग महामंडळाला करण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्या आभासी उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी दोन्ही संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या करारानुसार सन 2021-2022 मध्ये येणार ताग पीक हंगामासाठी प्रमाणित, उच्च दर्जाच्या ताग बियाणांचे वितरण ताग उत्पादकांना करण्यात येणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी कृषी मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्यामध्ये झालेल्या या सहकार्याच्या कराराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या तीन वर्षापासून ताग उत्पादकांना प्रमाणित ताग बियाणे मिळण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मोहिमेमध्ये ताग आणि ताग वस्त्रोद्योग उत्पादनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे भूस्खलन रोखण्यासाठी, जलाशयांच्या बांधांसाठी, रस्त्यांची कामे करणे, यासाठी तागाचा वापर करण्याला वाव आहे. या अपार संभावना लक्षात घेवून उच्च प्रतीच्या तागाची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर देशांमध्ये तागाला असलेली मागणी पूर्ण होऊन यामध्ये आपण स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यापुढचे लक्ष्य देशाच्या निर्यातीमध्ये ताग आणि तागजन्य उत्पादनांचा हिस्सा वाढवणे आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आजच्या या सामंजस्य कराराविषयी आनंद व्यक्त केला. ताग उत्पादक शेतकरी बांधवांना स्वस्त किंमतीत उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे कौतुक केले. देशात कच्च्या तागाचे उत्पादन आणि गुणवत्ता यांच्या वाढ करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तागाच्या मूल्यवर्धनाला बळकटी येणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले ‘आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठणे, शक्य होणार आहे, असे तोमर यावेळी म्हणाले. आता तागाची निर्यात क्षमता वाढीसाठी एका विशिष्ट काल मर्यादेचा आराखडा तयार करण्यासाठी तोमर यांनी भर दिला.
आज झालेल्या सामंजस्य करारानुसार ताग महामंडळाच्या वतीने ‘जेआरओ-204’ वाणाचे प्रमाणित 10,000 क्विंटल तागाचे बियाणे वितरित करणार आहे. हे बियाणे 2021-22 च्या ताग पीक हंगामासाठी असणार आहे. हे प्रमाणित बियाणे राष्ट्रीय बियाणे महामंडळ उपलब्ध करून देणार आहे. ताग महामंडळ अशा प्रकारे पहिल्या व्यावसायिक वितरणाचे कार्य करणार आहे. याचा लाभ 5-6 लाख शेतकरी कुटुंबियांना होणार आहे. उत्तम , दर्जेदार बियाणांमुळे तागाच्या उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. आणि 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.
या सर्व गोष्टींसाठी भाारतीय ताग महामंडळ, राष्ट्रीय ताग मंडळ आणि त्याचबरोबर ताग आणि इतर तंतूमय संशोधन केंद्र (सीआरआयजेएएफ) या तीन कृषी क्षेत्रातल्या संस्था संयुक्तपणे प्रोत्साहनासाठी कार्यरत आहेत. तसेच तागाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘आयकेअर’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे गेली अनेक वर्षे कच्चे तागही कमी प्रतीचे मिळत होते. आता या सामंजस्य करारामुळे ताग उत्पादक शेतकरी बांधवांना उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे मिळू शकणार आहे. तसेच कृषी हवामान स्थितीचा विचार करून मदत केली जाणार आहे. उत्तम कृषी पद्धतीमुळे ताग उत्पादनात भरघोस वाढ होवू शकेल.
M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1647026)
आगंतुक पटल : 1122