रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच होणार ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर
सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला बळ देणे आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या उद्देशाने ड्रोनचा वापर
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वेच्या मालकीच्या जागेची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी अलीकडेच दोन निन्जा यूएव्हीची खरेदी
आतापर्यंत आरपीएफकडून 9 ड्रोनची खरेदी
Posted On:
18 AUG 2020 10:34PM by PIB Mumbai
कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अलीकडेच रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरता दोन निन्जा यूएव्ही खरेदी केली आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाच्या(आरपीएफ) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. रियल टाईम ट्रॅकिंग, व्हिडिओ स्ट्रिमिंग करण्याची या ड्रोन्सची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.
रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे आरपीएफने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लाख रुपये खर्चाने दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी केली आहेत.
तसेच 97.52 लाख रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करणे प्रस्तावित आहे. आतापर्यंत आरपीएफच्या 19 कर्मचाऱ्यांना ड्रोनचे परिचालन आणि देखभाल यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यापैकी चार जणांना ड्रोन उड्डाणाचा परवाना प्राप्त झाला आहे. आरपीएफच्या आणखी सहा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.
रेल्वेच्या मालमत्ता आणि यार्डांची सुरक्षा, कार्यशाळा, कार शेड्स इत्यादींवर देखरेख करण्यामध्ये या प्रणालीची मदत मिळू शकते. रेल्वेच्या संकुलात जुगार, कचरा फेकणे, फेरीने विक्री करणे यांसारख्या गुन्हेगारी आणि समाजविघातक तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.
याचा वापर विविध प्रकारच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषणासाठी होईल. या माहितीचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित परिचालनासाठी आणि संवेदनशील भागांमध्ये होऊ शकेल.
आपत्ती घडलेल्या ठिकाणी मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी तसेच विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी देखील ड्रोन तैनात केली जाऊ शकतात.
रेल्वेच्या मालमत्तांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी या मालमत्तांचे मॅपिंग करण्यासाठी देखील ड्रोन उपयुक्त आहेत.
खूप जास्त प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना जास्त गर्दी होणारी ठिकाणे, गर्दीची वेळ आणि गर्दी पांगवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती ही प्रणाली उपलब्ध करू शकते आणि त्यानुसार गर्दी नियंत्रणाच्या योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करता येईल. लॉकडाऊन लागू करण्यासाठी आणि कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरिताच्या वाटचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
ड्रोनच्या एका कॅमेऱ्याने आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या खूप मोठ्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असताना अतिशय कमी मनुष्यबळामध्ये कामे करता येतील. रेल्वेच्या मालमत्ता, भागाची संवेदनशीलता, गुन्हेगारांच्या कारवाया इत्यादींच्या आधारे ड्रोन बीट्ची रचना करण्यात आली आहे. आकाशातील डोळा म्हणून ड्रोन काम करते आणि संपूर्ण भागावर लक्ष ठेवते. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या आरपीएफ पोस्टकडे संबंधित गुन्हेगाराला ताब्यात घेण्याची सूचना तात्काळ दिली जाते. अशा प्रकारे वाडीबंदर यार्ड भागात उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या डब्यात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले होते.
*****
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646848)
Visitor Counter : 282