संरक्षण मंत्रालय

उत्तराखंडमधल्या 20 गावांना जोडणाऱ्या 180 फूट लांबीच्या ‘बेली पुलाचे’ बांधकाम सीमा रस्ते संघटना (BRO) कडून केवळ तीन आठवड्यात पूर्ण

Posted On: 17 AUG 2020 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने उत्तराखंड च्या पिथौरागड जिल्ह्यात जौलजीबी भागात 180 फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत पूर्ण केले आहे.सतत होणारे भूस्खलन आणि मुसळधार पावसातही अत्यंत अल्पावधीत हा पूल तयार करण्यात आला आहे. 27 जुलै 2020 रोजी झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरात 50 मीटरचा पुलाचा सिमेंटचा भाग संपूर्ण वाहून गेला होता. त्यामुळे या भागातून अत्यंत वेगाने चिखलगाळ देखील वाहून आला होता. या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले आणि रस्त्यांचा संपर्कही पूर्णपणे तुटला होता.

त्यानंतर बीआरओने या पुलासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव केली आणि पूल बांधण्याची व्यवस्था केली. सातत्याने होत असलेल्या भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे, पिथौरागड हून कामाच्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य पोहचवणे सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, सगळी आव्हाने पार करत, 16 ऑगस्ट 2020 रोजी या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे पूरग्रस्त गावांशी संपर्क साधता आला. तसेच या पुलाने जौलजीबी ते मुन्सियारी हे भाग जोडले गेले.

या पुलामुळे निर्माण झालेल्या संपर्काने 20 गावातल्या सुमारे 15,000 लोकांना मदत मिळणार आहे. या पुलामुळे जौलजीबी ते मुन्सियारी दरम्यानच्या 66 किलोमीटर्सच्या रस्त्यावरील संपर्क प्रस्थापित झाला आहे. खासदार अजय तमाटा यांनीही जौलजीबीपासून 25 किलोमीटर अंतरावरच्या लुमती आणि मोरी या पूरग्रस्त गावांच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती.पुरामुळे या दोन्ही गावात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. या नव्या पुलामुळे आता सर्व गावांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण होणार आहे.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646420) Visitor Counter : 171