संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून स्वदेशी उत्पादननिर्मिती प्रक्रियेच्या 'श्रीजन' या पोर्टलचे उद्घघाटन, उद्योगातील भागीदार आणि संस्थांसोबत डीपीएसयूचे सामंजस्य करार आणि कंत्राटांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण मंत्रालयाच्या आत्मनिर्भर सप्ताहाचा समारोप
Posted On:
14 AUG 2020 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
आत्मनिर्भर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण उत्पादन विभागाच्या 'श्रीजन' या पोर्टलचे उद्घाटन केले. हे एक वन स्टॉप ऑनलाईन पोर्टल असून ज्या उत्पादनांची स्वदेशी निर्मिती करण्यात येणार आहे त्यांच्या सामग्रीची माहिती पुरवठादार विक्रेत्यांना उपलब्ध होणार आहे. यावेळी संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आयडीईएक्स अंतर्गत डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंजची चार कंत्राटे आणि उद्योगातील भागीदारांशी चार सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी अनेक इरादापत्रे/ विनंती प्रस्ताव देखील जारी करण्यात आले. या सामंजस्य करारांवरील आणि कंत्राटांवरील स्वाक्षऱ्यांमुळे संरक्षण उत्पादनांशी संबंधित तंत्रज्ञानामधील स्वावलंबनाला चालना मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी आणि स्वदेशी उत्पादन निर्मितीसाठी भारतीय उद्योगातील भागीदारांनी संपूर्ण वचनबद्धता दाखवावी आणि सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा दृष्टिकोन केवळ देशाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नसून निर्यातीच्या उद्देशाने देखील समोर ठेवला आहे आणि एकत्रित प्रयत्नातूनच हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व बाबी विचारात घेऊन सरकारने आस्थापनांचे कॉर्पोरेटायजेशन, थेट परकीय गुंतवणुकीच्या मर्यादांमध्ये सुधारणा यांसारखी पावले उचलली आहेत आणि अलीकडेच आयातबंदीत समावेश असलेल्या वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी संरक्षण खरेदीसाठी आपल्याला जगात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा शोध घ्यावा लागत असे. पण आता आपल्या दृष्टीकोनात बदल झाला आहे. आता आपण अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती स्वतःच किंवा संयुक्त उपक्रमातून किंवा तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून कशी करायची याचा विचार करू लागलो आहोत, असे त्यांनी सांगितले. श्रीजन पोर्टलची निर्मिती करण्याबद्दल संरक्षण उत्पादन विभागाची त्यांनी प्रशंसा केली. यामुळे या उद्योगातील भागीदारांना संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यास मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेला अनुसरून संरक्षण उत्पादन विभागानेsrijandefence.gov.in हे संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियासाठी संधी निर्माण करणारे स्वदेशी उत्पादन निर्मितीचे पोर्टल तयार केले आहे. खाजगी क्षेत्राकडून स्वदेशी निर्मिती करण्यात येणाऱ्या उत्पादनांची आणि त्यांच्या सामग्रीची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.
या पोर्टलवर डीपीएसयू/ओएफबी/ एसएचक्यूंना ते आयात करत असलेल्या किंवा करणार असलेल्या आणि भारतीय उद्योगाकडून त्यांच्या क्षमतेनुसार किंवा संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून ज्यांची रचना होणार आहे, विकास होणार आहे आणि निर्मिती होणार आहे अशा सामग्रीचे प्रदर्शन करता येईल. भारतीय उद्योगांना यामध्ये आपले स्वारस्य दाखवता येईल. संबंधित डीपीएसयू/ओएफबी/ एसएचक्यू त्या वस्तूंच्या गरजेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्वे आणि प्रक्रियानुसार भारतीय उद्योगांशी संवाद साधू शकतील.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645945)
Visitor Counter : 257