नौवहन मंत्रालय

नौवहन मंत्रालयाने क्रूझ जहाजांसाठी बंदर सेवा शुल्क 60% ते 70% पर्यंत कमी केले


या निर्णयामुळे कोविड -19 महामारीच्या दुष्परिणामांपासून क्रूझ उद्योग आणि देशांतर्गत क्रूझ पर्यटनाला बळ मिळेल: मांडवीय

Posted On: 14 AUG 2020 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


नौवहन  मंत्रालयाने क्रूझ जहाजांसाठी दरांचे सुसूत्रीकरण  केले आहे. शिथिल करण्यात आलेल्या दराचा निव्वळ परिणाम म्हणजे बंदर शुल्कामध्ये त्वरित 60 % ते 70% कपात करण्यात येईल, ज्यामुळे  कोविड -19 महामारीच्या स्थितीत  अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याच्या सरकारच्या धोरणाच्या अनुषंगाने भारतातील क्रूझ  उद्योगाला दिलासा मिळेल.

क्रूझ जहाजांसाठीचे तर्कसंगत दर खालीलप्रमाणे आहेत:

  1. क्रूझ जहाजांसाठी सुरुवातीच्या 12 तासाच्या मुक्कामासाठी ('निश्चित दर ') सध्याच्या  $ 0.35 दराच्या ऐवजी  0.085 प्रति जीआरटी (ग्रॉस रजिस्टर्ड टनेज )   आणि प्रत्येक प्रवासी ('' हेड टॅक्स ) '' साठी  $5  शुल्क आकारले जाईल.  बंदराचे भाडे  , बंदराची थकबाकी, पायलट शुल्क,  प्रवासी शुल्क यासारखे इतर दर बंदराकडून आकारले जाणार नाहीत.
  2. 12 तासाच्या पुढील कालावधीसाठी, क्रूझ जहाजांवरील निश्चित शुल्क एसओआर (दरांचे वेळापत्रक) नुसार देय असलेल्या बर्थ हायर शुल्काइतके (क्रूझ जहाजांसाठी लागू असलेल्या 40% सवलतीसह ) असेल.
  3. तसेच , क्रूझ  जहाजांसाठी 
    1. वार्षिक 1-50 कॉल केल्यास  10% सूट 
    2. वार्षिक 51-100 कॉल केल्यास  20% सूट 
    3. 100  पेक्षा अधिक कॉलवर 30% सूट मिळेल

वरील तर्कसंगत दर एक वर्षाच्या कालावधीसाठी तत्काळ लागू होतील.

कोविड -19 मुळे अतिशय विपरित परिणाम झालेल्या क्रूझ शिपिंग व्यवसायाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून, क्रूझ शिपिंग आणि पर्यटन वाढीसाठी योग्य धोरणात्मक   वातावरण आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. 2014  पासून नौवहन मंत्रालयाच्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे भारतातील क्रूझ जहाजांकडून करण्यात  आलेल्या कॉलची संख्या 2015-16 मधील 128 वरून वाढून 2019-20 मध्ये 593 वर गेली आहे. या सुसुत्रीकरणामुळे  भारतीय बंदरांवरील क्रूझ फेऱ्या  पूर्णपणे थांबणार नाहीत हे सुनिश्चित व्हायला  मदत होईल.

केंद्रीय नौवहन  राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) मनसुख मांडवीय म्हणाले की, महासागर आणि नदी या दोन्ही क्रूझसाठी जागतिक बाजारपेठेच्या नकाशावर भारताला स्थान मिळवून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार  करण्यासाठी नौवहन मंत्रालयाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.  “कोविड -19 महामारीच्या प्रतिकूल आर्थिक परिणामांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागलेल्या क्रूझ पर्यटनासाठी ही मोठी मदत ठरेल. तसेच  मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवण्याची आणि भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्रात मोठ्या संख्येने प्रत्यक्ष आणि  अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची संधी यामुळे उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645830) Visitor Counter : 254