विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या समस्यांमधून निर्माण झालेल्या डिजिटल परिवर्तनाच्या संधीवर विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी प्रकाश टाकला

Posted On: 11 AUG 2020 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020


भविष्य हे सर्वार्थाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाचे असेल त्यामुळे कोविड-19 ने देशाला रोखण्याऐवजी त्या बदलाचा भाग होण्याची संधी उपलब्ध  करून दिली आहे असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले. कोविड-19 काळातील  डिजिटल परिवर्तन या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.

“डिजिटल तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर देशाला नवीन उंचीवर नेऊ शकेल आणि पंतप्रधानांचे ‘आत्मनिर्भर भारताचे’ स्वप्न साकार होईल,” असा विश्वास प्राध्यापक शर्मा यांनी व्यक्त केला. सार्वजनिक उपक्रमांच्या स्थायी परिषदेने (एससीओपीई) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते म्हणाले कि डेटा हा नवीन मंत्र आहे आणि आपल्या प्रगतीसाठी डेटाचा वापर करणे आपल्याला आवश्यक आहे.

प्राध्यापक शर्मा यांनी स्पष्ट केले की कोविड-19 च्या अगोदर आपल्याकडे उज्ज्वल भविष्य होते परंतु विषाणूने सर्व काही होत्याचे नव्हते केले आहे. प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येकाच्याच जीवनावर याचा कल्पनातीत परिणाम झाला आहे. कामगारांची उपलब्धता असो, पुरवठा साखळी असो वा रसद; या सर्वच बाबींवर त्यामुळे परिणाम झाला आहे. तथापि, आव्हान जितके अधिक कडवे तितकेच मोठे यश प्राप्त होईल आणि आपण सध्या काय करीत आहोत आणि आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करण्याची ही फार चांगली वेळ आहे.

डिजिटल, सायबर डिजिटल क्षेत्रात बऱ्याच संधी निर्माण झाल्या आहेत हे त्यांनी स्पष्ट केले. “आमच्याकडे प्रचंड युवाशक्ती आहे आणि तिचा उपयोग सर्व संबंधितांनी त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्याची ही उत्तम संधी आहे,” यावर प्रा. आशुतोष शर्मा यांनी भर दिला.

या महामारीमुळे उद्योगधंद्यांवर कमालीचा तणाव असून त्यांनी तंत्रज्ञान आणि डिजिटलकरण याचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. व्यवसायातील गरजा भागविण्यासाठी विविध क्षेत्रातील कंपन्या डिजिटल तंत्रज्ञानातील गुंतवणूकीला चालना देत आहेत. नवीन व्यवसाय वातावरणात कार्यान्वयनासाठी विविध क्षेत्र डिजिटल  तंत्रज्ञानाचा लाभ कसा घेऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी एससीओपीईने हे वेबिनार आयोजित केले होते.

वेबिनारमधील विषयांमध्ये कोविडमधील डिजिटल अर्थव्यवस्था, डिजिटल समस्या आणि मुख्य क्षेत्रांवर पडणारा प्रभाव, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर उदयोन्मुख डिजिटल संकल्पना आणि डिजिटल प्राधान्यक्रमांचा समावेश होता.

आयओसीचे अध्यक्ष एस. एम. वैद्य, एनएलसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एससीओपीओईचे अध्यक्ष राकेश कुमार, केपीएमजी इंडियाचे भागीदार सुशांत राबरा आणि भागीदार मानस मजूमदार यांचा या वेबिनारमध्ये समावेश होता.


* * * 

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645073) Visitor Counter : 192