उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी  इतर देशांना भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करणे टाळण्याचा दिला सल्ला


देशातील ऐक्य, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्यासाठी कलम 370 केले रद्द : उपराष्ट्रपती

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली;

सुषमा जींनी अंगीकारलेली मूल्ये आणि आदर्श कायमच प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी तरुण राजकारण्यांना सुषमा स्वराज यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचे केले आवाहन

सुषमाजी भारतीय संस्कृतीचे प्रतिक होत्या : उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी पंजाब विद्यापीठाने आयोजित केलेले पहिले सुषमा स्वराज मेमोरियल व्याख्यान दिले

Posted On: 06 AUG 2020 6:15PM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज शेजारील देशांसह इतर देशांना देखील भारताच्या अंतर्गत बाबींविषयी भाष्य करणे टाळा असा सल्ला देत भारताचे ऐक्य, अखंडता सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले असे प्रतिपादन केले.

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पंजाब विद्यापीठाने आयोजित केलेल्या सुषमा स्वराज मेमोरियल व्याखानमालेत उपराष्ट्रपतींनी हे निदर्शनास आणून दिले की, भारत हा संसदीय लोकशाही असलेला देश आहे आणि संसदेत सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतरच कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इतर देशांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी त्यांच्या देशातील मुद्द्यांकडे लक्ष द्यावे असे नायडू म्हणाले.

सुषमा स्वराज यांचे निधन होण्यापूर्वी कलम 370 बाबत सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून स्वराज यांनी नेहमीच भारताची भूमिका कार्यक्षमतेने तसेच आपल्या मधुर वाणीने व शांतपणे मांडली आहे. पण त्याचबरोबर देशाची भूमिका त्या अगदी ठामपणे मांडायच्या.

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना नायडू यांनी त्यांचे वर्णन एक आदर्श भारतीय महिला असे केले. त्या एक सक्षम प्रशासक होत्या ज्यांनी आपल्या प्रत्येक पदावर अविचल छाप सोडली आहे.

तरुण राजकारण्यांनी त्यांना एक आदर्श म्हणून पहावे आणि त्यांच्या गुणांचे अनुकरण करावे असे आवाहन करीत नायडू म्हणाले की सुषमा जी एक विलक्षण व्यक्ती होत्या, एखादा मित्र असो, समर्थक असो किंवा एक जनसमुदाय कोणीही एखादी विनंती केली तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. “सुषमा स्वराज सात वेळा लोकसभेवर आणि विधानसभेवर तीन वेळा निवडून गेल्या यातूनच त्यांची लोकप्रियता दिसून येते,” असे ते म्हणाले.

त्यांच्या गुणांचा उल्लेख करताना ते म्हणाले की त्यांची बुद्धी, मानवी स्वभाव आणि कोणत्याही समस्येला उत्तर देण्याची तत्परता ही त्या परराष्ट्रमंत्री असताना सोशल मीडियावर दिसून येत होती. उपराष्ट्रपती म्हणाले की, कोट्यवधी देशवासियांच्या त्या आवडत्या नेत्या होत्या आणि अलीकडच्या काळातील लोकप्रिय भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणूनही लोकप्रिय होत्या.

स्वराज एक हुशार  वक्त्या  होत्या त्यांनी 1996 मध्ये लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान 'भारतीयता' चे प्रभावी वर्णन केले होते असे उपराष्ट्रपती म्हणाले. भाषेची शुद्धता, शब्दांची निवड आणि विचारांची स्पष्टता याच काही बाबींमुळे त्या लोकप्रिय वक्त्या बनल्या.

त्या एक भावनाप्रवण देशभक्त होत्या आणि नेहमीच स्पष्टपणे आपल्या विचार मांडायच्या असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून स्वराज यांचे वर्णन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की त्या आधुनिक विचारसरणीचे आणि पारंपारिक मूल्यांचे योग्य मिश्रण होत्या. सुषमा स्वराज या त्यांच्या कुटूंबातील सदस्यासारख्याच होत्या; कशाप्रकारे त्या रक्षाबंधनासाठी त्यांच्या निवासस्थानावर जायच्या आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधायच्या या सर्व आठवणींना त्यांनी उजाळा दिला. “काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात हा सण जेव्हा उत्साहात साजरा केला तेव्हा मी भावनिक झालो होतो,” असेही ते पुढे म्हणाले.

सुषमा स्वराज यांच्या सन्मानार्थ दरवर्षी  मेमोरियल व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविल्याबद्दल पंजाब विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटना आणि कायदे विभागाचे कौतुक करताना उपराष्ट्रपतींनी मेमोरियल व्याख्याने किंवा सन्मानार्थ कार्यक्रम केवळ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच नव्हे तर तरुण पिढीला महान पुरुष आणि स्त्रियांच्या गुणांचे अनुकरण करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी असतात याचे स्मरण करून दिले.

पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राज कुमार, तसेच सुषमा स्वराज यांच्या कन्या बंसुरी स्वराज, आदी यावेळी उपस्थित होते.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

 



(Release ID: 1643838) Visitor Counter : 116