युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

एनएसएनआयएस पतियाळा आणि सीएसएस-एसआरआयएचईआर यांच्याकडून स्थानिक पातळीपर्यंत क्रीडाक्षेत्र मजबूत करण्यासाठी स्पोर्टस फिजीओथेरपी, स्पोर्टस न्युट्रीशन अभ्यासक्रमाची सुरुवात

Posted On: 03 AUG 2020 5:14PM by PIB Mumbai

 

क्रीडा विज्ञान स्थानिक पातळीवरील क्रीडापटूंपर्यंत पोहोचावे या हेतूने एनएसएनआयएस पतियाळा आणि सीएसएस-एसआरआयएचईआर (अभिमत विद्यापीठ), चेन्नई यांनी संयुक्तरित्या क्रीडा विज्ञान विषयातील सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याविषयी परस्पर सामंजस्य करार केला आहे. क्रीडा विज्ञानातील पात्र युवा खेळाडूंना याच विषयात आणखी कौशल्य प्राप्त करुन देण्याची संधी मिळावी, हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात, स्पोर्ट फिजीओथेरपी आणि क्रीडा पोषण (स्पोर्टस न्युट्रीशन) या अभ्यासक्रमांची ऑनलाईन सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 3 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश सुरु झाले आहेत. या अभ्यासक्रमाचा उद्देश, स्थानिक पातळीवर प्रशिक्षणात क्रीडा विज्ञान वापरण्यासाठी समुदाय प्रशिक्षक आणि विकास-स्तर प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे हा आहे.

या अभ्यासक्रमासाठी लेखी प्रवेश परीक्षेसाठी मास्टर्स इन फिजीओथेरपी (ऑर्थो /स्पोर्ट) हा पात्रता निकष आहे. फिजीओथेरेपी पदवीधारक ज्यांना क्रीडा संस्था, क्रीडा संघ आणि क्लब यातील तीन वर्षांचा अनुभव आहे, तेसुद्धा यासाठी अर्ज करु शकतात. क्रीडा पोषण अभ्यासक्रमासाठी, अन्न आणि पोषण, अॅप्लाईड न्युट्रीशन, पब्लिक हेल्थ न्युट्रीशन, क्लिनिकल न्युट्रीशन अँड डायटेटीक्स, फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल किंवा स्पोर्टस न्युट्रीशन याविषयातील पदव्युत्तर पदवी असावी. याविषयांपैकी कोणत्याही विषयातील पदवीधारक, आणि ज्यांना नामांकित क्रीडा संस्था, क्लब किंवा राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील संघासोबत काम करण्याचा अनुभव आहे ते प्रवेशपरीक्षेसाठी पात्र आहेत.

सहा महिन्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाणार आहे, यात स्पोर्ट फिजीओथेरेपी आणि स्पोर्टस न्युट्रीशन याविषयीच्या सर्व महत्वाच्या पैलूंचा समावेश असणार आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कोविडनंतर दोन आठवड्याची शारिरीक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. अंतिम प्रमाणपत्रासाठी सहभागितांचे मूल्यांकन ऑनलाइन प्रश्नमंजुषा आणि लेखी परीक्षेच्या आधारे केले जाईल.  

तळागाळापर्यंतच्या प्रशिक्षकांसाठी क्रीडा विज्ञान विषयाचे महत्त्व सांगताना, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (शैक्षणिक) कर्नल आर एस बिश्नोई म्हणाले, “नवीन क्रीडा विज्ञान अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील क्रीडा परिसंस्थेला अधिक तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन मजबूत करायचे आहे. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर हे व्यावसायिक प्रशिक्षक स्थानिक पातळीवरील सामुदायिक प्रशिक्षक आणि विकास प्रशिक्षकांसह कार्य करण्यास सक्षम असतील आणि कनिष्ठ खेळाडूंना अधिक चांगले प्रशिक्षण प्रदान करतील. दुसऱ्या टप्प्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण व्यायाम शरीरविज्ञान, स्पोर्टस बायोमेकानिक्स, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग, क्रीडा मानसशास्त्र या अभ्यासक्रमांची सुरुवात करणार आहे."

कोर्सच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलताना सीएसएस-एसआरआयएचईआरचे संचालक प्रा. अरुणमुगम म्हणाले की, या अभ्यासक्रमांमध्ये स्पोर्टस फिजीओथेरेपी आणि क्रीडा पोषण या विषयातील नवीनतम आंतरराष्ट्रीय पद्धतींचा समावेश आहे. तळागाळापर्यंत क्रीडा विज्ञान पोहोचवल्यामुळे व्यावसायिक प्रशिक्षकांना खेळाडूंच्या आवश्यकतांची चांगली जाण होईल. सर्वोत्कृष्ट भारतीय प्रशिक्षक आणि परदेशी तज्ज्ञ हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत.

अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असतील, पात्र उमेदवारांसाठी 16 ऑगस्ट 2020 रोजी लेखी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. 24 ऑगस्ट 2020 पासून अभ्यासक्रमाचा प्रारंभ होईल.

******

M.Iyangar/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643181) Visitor Counter : 103