भूविज्ञान मंत्रालय

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Posted On: 29 JUL 2020 2:33AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

हवामान, महासागर, किनारीआणि नैसर्गिक संकटे या संदर्भात सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक- आर्थिक लाभ यासाठी देशाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय कटीबद्ध आहे. सजीव आणि निर्जीव महासागर संसाधने यांचा शोध आणि अंटार्क्टिक, आर्क्टिक, हिमालय आणि दक्षिण महासागर संशोधन यासाठी नोडल एजन्सी म्हणूनही  मंत्रालय काम करते.

भू प्रणाली विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रख्यात संशोधक आणि अभियंते यांच्या योगदानाला योग्य मान्यता आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी महिला आणि युवा संशोधकांना प्रोत्साहनदेणे हा या मंत्रालयाचा उद्देश आहे.    

या वर्षी जीवन गौरव सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रा अशोक साहनी यांना भू रचनाशास्त्र, वर्टेब्रेटपेलियोन्टोलॉजी आणि बायोस्ट्रेटिग्राफी क्षेत्रातल्या लक्षणीय योगदानासाठी देण्यात येत आहे.

महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विशाखापट्टणम इथल्या सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक  डॉ. व्ही. व्ही. एस. सरमा, आणि गोव्यातल्या नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ. एम. रवीचंद्रन यांना देण्यात येत आहे. हिंदी महासागराचे जैवरसायन शास्त्र समजून घेण्यासाठी डॉ. सरमा यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. डॉ. रविचंद्रन यांनी भारतीय आर्गो प्रकल्प तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आघाडीची भूमिका बजावली आहे तसेच महासागर  डाटा एकत्रीकरणाची  आणि कार्यान्वित महासागर सेवांसाठी मॉडेलिंगची अंमलबजावणी  केली आहे.

वातावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार तिरुवनंतपुरम इथल्या वैज्ञानिक एसएफ - व्हीएसएससी,डॉ एस सुरेशबाबू यांना देण्यात येणार आहे. वातावरणीय स्थिरता आणि हवामानावरील काळ्या कार्बन एरोसोलचा किरणोत्सर्गी प्रभाव जाणून घेण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भू विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या भू शास्त्र विभागाच्या एन व्ही चलपथी राव यांना देण्यात येणार आहे. त्यांनी मांटल पेट्रोलॉजी आणि जियोकेमिस्ट्री यावर संशोधन केले आहे.

महासागर तंत्रज्ञान यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी चेन्नईच्या महासागर तंत्रज्ञान राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ एम ए आत्मानंद यांची निवड झाली आहे. खोल समुद्र तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी अग्रगण्य कार्य केले आहे.

महिला वैज्ञानिकासाठीचा अन्ना मणी पुरस्कार गोव्याच्या सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञानसंस्थेच्या जेष्ठ वैज्ञानिक डॉ लीदिता डी एस खंडेपारकर यांना प्रदान करण्यात येईल. मरीन बायोफिल्म आणि त्याची महासागरातील समर्पकता यामध्ये त्यांचे लक्षणीय योगदान आहे.

युवा संशोधक पुरस्कार, कानपूरच्या भारतीय तंत्रसंस्थेचे डॉ इंद्र शेखर सेन आणि अहमदाबाद इथल्या फिजिकल रिसर्च लाबोरेटरीचे डॉ अरविंद सिंगयांना पृथ्वी प्रणाली विज्ञान या क्षेत्रातल्या लक्षणीय योगदानासाठी देण्यात येणार आहे.

 

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642007) Visitor Counter : 211