उपराष्ट्रपती कार्यालय

वैचारिक दृष्टीकोन आणि व्यक्तिमत्त्वात कोणतीही तडजोड न करता अनेक दशके राजकारणात राहिलेले जयपाल रेड्डी हे एक दुर्मिळ राजकीय नेते -उपराष्ट्र्पती


त्यांचे वक्तृत्व, साधेपणा आणि नम्रपणामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील- उपराष्ट्रपती

Posted On: 28 JUL 2020 9:18PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की त्यांचे वक्तृत्व, साधेपणा, नम्रपणा  आणि तत्त्वांप्रति अतूट बांधिलकी यासाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल.

जयपाल रेड्डी यांनी लिहिलेल्या “दहा विचारसरणी  - कृषीवाद आणि उद्योगवाद यामधील  एक महान विषमता” या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असलेल्या  'पडी भावजालू' या  तेलगू पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करताना  उपराष्ट्रपतींनी या दिवंगत नेत्याचे राजकीय क्षेत्रात लोकप्रिय असलेले दुर्मिळ राजकीय नेते असे  वर्णन केले.

वैचारिक दृष्टीकोन आणि व्यक्तिमत्त्वात कोणतीही तडजोड न करता अनेक दशके ते राजकारणात राहिले असे उपराष्ट्र्पती म्हणाले.

जयपाल रेड्डी यांच्याशी  दीर्घकाळ संबंध राहिल्याचे सांगताना  उपराष्ट्रपती म्हणाले की, आंध्र प्रदेश विधानसभेत एकाच बाकावर बसण्यापासून राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते होण्यापर्यंतच्या काळात दोघांमध्ये  एक विशेष बंध  होते.

वेगवेगळ्या पक्षांचे आणि विचारधारेचे असले तरी त्यांच्या मैत्रीत  कधीही अडथळा निर्माण झाला नाही, असे ते म्हणाले

रेड्डी यांच्या भाषणांमधील लोकाभिमुख  तात्विक दृष्टिकोन अधोरेखित करताना  उपराष्ट्रपतींनी ते  एक विश्लेषक असल्याचे म्हटले , ज्यांनी साहित्य, तत्वज्ञान आणि विविध देशांच्या आर्थिक सिद्धांतांचा सखोल अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या आधारे राजकारणाकडे  पाहिले.

आमदार म्हणून रेड्डी यांनी केलेल्या कामांप्रति त्यांचा प्रामाणिकपणा आणि गांभीर्याबद्दल  बोलतांना नायडू म्हणाले की, विधानसभा किंवा संसदेत बोलण्यापूर्वी ते या मुद्द्यांचा सखोल अभ्यास  आणि तार्किक निरीक्षणासह तयारीनिशी येत.“म्हणूनच ते आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखले जात होते”, असे ते पुढे म्हणाले.

लोकशाहीपासून भांडवलवाद , पर्यावरणवाद आणि जागतिकीकरणापर्यंतच्या विविध पैलूंशी  संबंधित असलेल्या या पुस्तकाबद्दल बोलताना नायडू यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले कि रेड्डी यांनी राष्ट्रवादाला महत्त्व दिले.

जयपाल रेड्डी यांनी पुस्तकात व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाचे त्यांनी समर्थन केले.  प्राचीन काळापासून देशाच्या विशिष्ट भूगोलाने  कवी आणि तत्त्वज्ञांवर भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर भर देण्यासाठी प्रभाव पाडला आहे. वैदिक काळापासून आतापर्यंत भारत नेहमीच एक सांस्कृतिक अस्तित्व असल्याचे मानले जाते, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

आपल्या प्रिय मित्रांसोबत असलेल्या आपल्या वैयक्तिक संबंधांचे स्मरण करताना नायडू म्हणाले, “जयपाल यांनी जेव्हा इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिले तेव्हा ते मला वैयक्तिकरित्या भेटले आणि त्यांनी ते पुस्तक मला भेट दिले. परंतु मला दुःख होत आहे  की आज जेव्हा आपण ते आमची  मातृभाषा तेलुगूमध्ये प्रकाशित करत आहोत  तेव्हा ते  आपल्याबरोबर नाहीत.”

सर्वोच्च न्यायालयाचे  माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर  वाय.व्ही. रेड्डी, माकपचे सरचिटणीस  सीताराम येचुरी, दिवंगत एस. जयपाल रेड्डी यांच्या पत्नी लक्ष्मी आणि पुस्तकाचे तेलुगु भाषांतरकार  के. भास्करम पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

*****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641935) Visitor Counter : 152