ग्रामीण विकास मंत्रालय

पुनर्रचित प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत, घरबांधणीचा कालावधी 114 दिवसांपर्यंत कमी; 1.10 कोटी घर बांधून पूर्ण; 1.46 भूमिहीनांना घरांचा लाभ

Posted On: 24 JUL 2020 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

 
‘वर्ष 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर 2016 रोजी पुनर्रचित ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण चा शुभारंभ केला. या अंतर्गत, वर्ष 2022 पर्यंत मूलभूत सुविधायुक्त 2.95 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्यांची तीन पातळ्यांवर निवड केली जाते. यात सामाजिक-आर्थिक जात आधारित जनगणना 2011, ग्रामसभा आणि जिओ तागिंग यांचा समावेश आहे. या तीन स्तरीय निवडीमुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. घरांसाठीच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारची मदत थेट पोहचावी यासाठी थेट लाभ हस्तांतरणासह इतर योजनांचा आधार घेतला जातो. त्या त्या भागातील भौगोलिक परीस्थितीचा अभ्यास करुन त्यानुसार घरांची रचना ठरवली जाते. उपग्रहांच्या मदतीने घरबांधणीच्या कामांवर देखरेख ठेवली जाते. यासाठी गावातील गवंड्याना प्रशिक्षित केले जाते.

या सर्व उपाययोजनांमुळे बांधकामाची गती वाढली असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.10 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. 1.46 लाख बेघर लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. NIPFP च्या अध्ययनात, या वाढलेल्या गतीविषयी निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यानुसार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत, जी घरे पूर्ण होण्यासाठी आधी 314 दिवसांचा कालावधी लागत होता, त्याला आता केवळ 114 दिवस लागतात.

राज्यांच्या सहभागातून, मार्च 2022 पर्यंत, 2.95  कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641092) Visitor Counter : 141