शिक्षण मंत्रालय

‘भारतात शिका’ कार्यक्रमांतर्गत भारतात पहिल्यांदाच INDSAT परीक्षेचे आयोजन


बारा देशांतील पाच हजार विद्यार्थी परीक्षेत सहभागी

Posted On: 23 JUL 2020 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2020


‘भारतात शिका’ या कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काल पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भूतान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधील सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत EdCIL (भारत) मर्यादित या सार्वजनिक उपक्रमाने आणि एसआयआय या अंमलबजावणी संस्थेने या परीक्षेसाठी नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता केली. 

‘भारतात शिका’ या कार्यक्रमांतर्गत निवडक भारतीय विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेश तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी Ind-SAT ही परीक्षा घेतली जाते. भारतात शिकण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता जोखण्याच्या उद्देशाने या परिक्षेची रचना करण्यात आली आहे. Ind-SAT परीक्षेतील गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमांतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.     

भारतातील उच्च शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आशियाई तसेच आफ्रिकी देशांमध्ये Ind-SAT परीक्षेचे आयोजन प्रस्तावित असल्याचे वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात सांगितले होते. यावर्षी प्रायोगिक तत्वावर 12 देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यात इतरही देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.  

‘भारतात शिका’ हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यक्रम असून त्याअंतर्गत परदेशी विद्यार्थी भारतातील निवडक अशा 116 उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात. इयत्ता बारावी अथवा शालांत परीक्षेतील गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. गुणानुक्रमे पहिल्या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर इतर काही विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत दिली जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात, 2018-19 साली सुमारे 780 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर दुसऱ्या वर्षी ही विद्यार्थी संख्या 3200 वर पोहोचली. 


* * *

U.Ujgare/M.Pange/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640866) Visitor Counter : 208


Read this release in: Tamil , English , Hindi , Manipuri