रसायन आणि खते मंत्रालय

एप्रिल-जून 2020 या काळात उर्वरकांची 111.61 लाख टन इतकी विक्रमी विक्री

Posted On: 03 JUL 2020 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020

 

कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या लॉकडाउनच्या काळात, केंद्रीय रसायने व उर्वरक मंत्रालयाच्या उर्वरक विभागाने, शेतकरी वर्गाला, फर्टिलायझर म्हणजेच उर्वरकांची विक्रमी विक्री केली.

एप्रिल-जून 2020 या काळात POS म्हणजे विक्रीकेंद्रांवरून 111.61 लाख टन उर्वरके शेतकऱ्यांना विकली गेली. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 61.05 लाख टन इतका होता. त्या तुलनेत यावर्षी 82.81% अधिक विक्री झाली आहे.

या काळात 64.82 लाख टन युरिया (गेल्यावर्षीपेक्षा 67% अधिक), 22.46 लाख टन डायअमोनिअम फॉस्फेट (गेल्यावर्षीपेक्षा 100% अधिक) आणि 24.32 लाख टन काँप्लेक्स म्हणजे जटिल उर्वरके (गेल्यावर्षीपेक्षा 120% अधिक) शेतकऱ्यांना विकण्यात आली.

लॉकडाउनमुळे हालचाली व प्रवासावर अनेक निर्बंध असूनही, उर्वरक विभाग, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारे आणि बंदरे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशात उर्वरकांचे उत्पादन व पुरवठा, दोन्ही सुरळीतपणे सुरू राहू शकले.

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना पर्याप्त प्रमाणात उर्वरके उपलब्ध करून देण्याचा निश्चय, रसायन व उर्वरक मंत्रालयाने केला होता. त्यानुसार उचललेल्या पावलांचेच हे फलित होय.

केंद्रीय रसायन व उर्वरक मंत्री श्री. डी.व्ही.सदानंद गौडा यांनी याबद्दल सांगितले की, "खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या उर्वरकांचा साठा व पुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष आहे. राज्य सरकारांना पर्याप्त साठे पुरवण्यात आले आहेत. राज्यांच्या कृषिमंत्र्यांच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना उर्वरकांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे."

30 जून रोजी उर्वरके भरून 73 मालगाड्यांनी कारखान्यातून किंवा बंदरांमधून प्रस्थान ठेवले. एका दिवसातील ही उर्वरकांची सर्वात मोठी वाहतूक आहे. एका मालगाडीत एका वेळी 3000 टन उर्वरके वाहून नेली जातात.

शेतीक्षेत्रास लॉकडाउनची झळ बसू नये यासाठी भारत सरकारने अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यान्तर्गत उर्वरकांचे कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.

कारखाने, रेल्वेस्थानके व बंदरे येथे उर्वरकांचे उत्पादन व वाहतूक प्रचंड प्रमाणात सुरू ठेवतानाच, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली जात आहे. कामगार आणि सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि अन्य आवश्यक संरक्षक सामुग्री पुरविण्यात येत आहे.


* * *

B.Gokhale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636256) Visitor Counter : 241