आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून वैद्यकीय व्यवसायातील उत्तम पद्धतींच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे आणि एनबीईच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फेलोशिप कार्यक्रमाच्या( एफपीआयएस) माहिती पुस्तकाचे प्रकाशन


एफपीआयएस कार्यक्रम भारताला वैद्यकीय शिक्षणामध्ये अग्रेसर बनवेल- डॉ. हर्षवर्धन

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा- खरे नायक असल्याची आरोग्यमंत्र्यांकडून प्रशंसा

Posted On: 01 JUL 2020 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज वैद्यकीय व्यवसायातील उत्तम पद्धतींच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (एनबीई)च्या  आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फेलोशिप कार्यक्रमाच्या( एफपीआयएस) माहितीपुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.

वैद्यकीय समुदायाने त्यांच्या व्यवसायात नैतिकतेचे पालन करण्याचा संकल्प करावा, असे डॉ. हर्षवर्धन यांनी वेब प्लॅटफॉर्मवरील या ई-बुक्सच्या प्रकाशनाच्या वेळी सांगितले. नॅशनल बोर्डच्या डिप्लोमेट्स अर्थात  प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांनी(डीएनबी) वैद्यकीय व्यवसायामध्ये नैतिक आणि व्यावसायिक सिद्धांतांचा अवलंब करावा यासाठी या  वैद्यकीय व्यवसायातील उत्तम पद्धतीच्या पुस्तिकेच्या माध्यमातून  त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्या सुरक्षिततेला सारख्याच प्रमाणात महत्त्व देण्याचा या पुस्तिकेचा उद्देश आहे. डीएनबीच्या निवासी प्रशिक्षण कार्यकाळात डॉक्टर म्हणून जडणघडण होत असताना एक चांगला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आपली भूमिका आणि जबाबदारी लक्षात घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी एफपीआयएस अर्थात फेलोशिप प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्सच्या 2020-21 या वर्षाच्या 42 प्रतिष्ठेच्या संस्थांमधील 11 वैशिष्ट्यांसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे देखील इलेक्ट्रॉनिक प्रकाशन केले. पहिल्यांदाच  सार्क देशांसह सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एमडी/एमएस पश्चात पातळीवरील आंतरराष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अशा प्रकारे सुरू करण्यात येत आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये देशाची प्रतिष्ठा उंचावण्यामध्ये हा कार्यक्रम प्रदीर्घ योगदान देईल, अशा शब्दात त्यांनी या नावीन्यपूर्ण प्रयत्नाची प्रशंसा केली.

एनबीईचे प्रमुख डीएनबी कार्यक्रम आधुनिक वैद्यक शास्त्रातील 82 विभागांमध्ये आणि सबस्पेशालिटींमध्ये देशातील 703 खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये  चालवले जात असून त्यामध्ये 29 विस्तृत डीएनबी कार्यक्रम, 30 सुपर स्पेशालिटी आणि 23 सबस्पेशालिटी कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी या अभ्यासक्रमाच्या स्वरुपाविषयी बोलताना दिली. तज्ञ डॉक्टरांची पोकळी भरून काढण्यासाठी एनबीई देशभरातील सरकारी/ सार्वजनिक उपक्रम/ महानगरपालिका/ खाजगी क्षेत्रातील रुग्णालयांना सध्याच्या पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय संसाधनांचा वापर करून पदव्युत्तर जागांमध्ये वाढ करून  डीएनबी कार्यक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आणि एक जुलै हा दिवस ज्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो त्या डॉ. बी. सी. रॉय यांना अभिवादन केले. अतिशय प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक, परोपकारी, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी, स्वातंत्र्य सैनिक आणि एक उत्तम डॉक्टर म्हणून प्रख्यात असलेले भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांची आज जयंती साजरी केली जात असताना आयोजित झालेल्या या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या दोन्ही संस्थांची फेलोशिप मिळवण्याची दुर्मिळ कामगिरी केली. डॉक्टर बनणे ही एक वैयक्तिक कामगिरी ठरते पण एक चांगला डॉक्टर बनणे हे सातत्यपूर्ण आव्हान असते. हाच एकमेव असा व्यवसाय आहे ज्यामध्ये एखाद्याचा रोजचा चरितार्थ चालतो आणि त्याचवेळी समस्त मानवतेची सेवा देखील करता येते, अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी वैद्यकीय व्यवसायाचे महत्त्व विषद केले. कोविड महांमारीच्या काळात डॉक्टरांनी केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तेच आपले खरे नायक आहेत, अशी प्रशंसा डॉ. हर्षवर्धन यांनी केली.

आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी देखील डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि  डॉक्टर आणि त्यांचे रुग्ण यांच्यातील विश्वासाच्या नात्यावर भर दिला. 2017 मध्ये राष्ट्रीय आरोग्य नीती जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या सर्वे संतु निरामयः या उद्दिष्टाच्या दिशेने आपल्या देशाला नेत असल्याबद्दल त्यांनी व संपूर्ण डॉक्टर समुदायाचे अभिनंदन केले.

नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसची एक शाखा म्हणून एनबीई अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची 1975 मध्ये स्थापना झाली आणि 1976 पासून राष्ट्रीय पातळीवर या मंडळाकडून पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांचे आयोजन केले जाते. 1982 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची स्वायत्त संघटना म्हणून या मंडळाची नोंदणी झाली. संपूर्ण भारतभर आधुनिक वैद्यकशास्त्रातील उच्च दर्जाच्या पदव्युत्तर परीक्षांचे आयोजन करणे, पात्रतेसाठी मूलभूत प्रशिक्षणांच्या गरजांची पूर्तता करणे, पदव्युत्तर प्रशिक्षणांचा अभ्यासक्रम तयार करणे आणि ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात येते त्या संस्थांना अधिस्वीकृती देणे हा यामागचा उद्देश होता. यामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमेट्स ऑफ नॅशनल बोर्ड( डीएनबी) असे म्हटले जाते. आरोग्य सचिव प्रीती सुदान, आरोग्य ओएसडी राजेश भूषण, एनबीईचे उपाध्यक्ष डॉ. डी. के शर्मा, एनबीईचे कार्यकारी संचालक प्रा. पवनींद्र लाल आणि मंत्रालयाचे आणि एनबीईचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635848) Visitor Counter : 241