शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी प्रोग्रामिंग आणि डेटा विज्ञान मधील जगातील पहिल्या ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने केले उद्घाटन


अडथळे दूर करून दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटीतर्फे पहिला ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम; अर्जदार कोणत्याही अभ्यास शाखेचा असू शकतो

Posted On: 30 JUN 2020 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2020

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रोग्रामिंग आणि डेटा विज्ञान मधील जगातील पहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास (आयआयटी मद्रास) यांनी तयार केला आहे; एनआयआरएफ ने जाहीर केलेल्या भारत क्रमवारी 2020 मध्ये आयआयटी मद्रास अव्वल स्थानी आहे. हा पदवी कार्यक्रम दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या आणि कोणत्याही कॅम्पसमधील युजी अभ्यासक्रमासाठी आपले नाव नोंदलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. आयआयटी, मद्रासचे संचालक, संचालक मंडळाचे संचालक डॉ. पवनकुमार गोएंका, आणि आयआयटी मद्रासचे प्राध्यापक, एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे, एमएचआरडीचे अतिरिक्त सचिव, राकेश रंजन आणि मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित होते.   

डेटा विज्ञान हे वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक असून 2026 पर्यंत या क्षेत्रात रोजगाराच्या 11.5 दशलक्ष संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा स्वीकार वेगाने होत आहे. या क्षेत्राच्या आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग करत आहेत आणि आयआयटीचा आवाका विस्तृत करण्यासाठी सर्वसमावेशक आणि किफायतशीर शैक्षणिक मॉडेल तयार करत आहे. 

 

उपस्थितांना संबोधित करतांना पोखरीयाल यांनी प्रोग्रामिंग आणि डेटा विज्ञान मधील जगातील पहिल्या ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल आयआयटी मद्रासच्या चमुचे अभिनंदन केले. मंत्र्यांनी सांगितले की 2020 मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यर्थ्यांची तुकडी अर्ज करण्यास पात्र आहे. पदवीधर आणि कार्यरत व्यावसायिक देखील या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. पोखरियाल म्हणाले की, ही एक अनोखी भेट आहे जी वय, कोणतीही शाखा किंवा भौगोलिक स्थानाचे सर्व अडथळे दूर करून आणि कुशल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या डेटा विज्ञान यामधील जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास सुकर करते.

मंत्री म्हणाले की आयआयटी मद्रासला निरंतर नाविन्याचा ध्यास आणि यशस्वीतेचा समृद्ध इतिहास आहे आणि एनआयआरएफच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करून सांघिक प्रतिभा, ध्येय आणि दृष्टीकोनातून सातत्याने हे अधोरेखित केले आहे. विश्लेषणातून असे दिसून आले आहे की दरवर्षी 7 ते 7.5 लाख भारतीय विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी परदेशात जातात आणि यामुळे आमच्या देशाची प्रतिभा तसेच महसूल देशाबाहेर जातो. देशाला स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी असे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि अनोखे अभ्यासक्रम भारतात आणण्याचे ध्येय आणि दृष्टीकोन आयआयटी मद्राससारख्या संस्थांमध्ये आहे. या आव्हानात्मक काळातही, जेव्हा संपूर्ण देश कोविड-19 विरुद्ध लढा देत आहे आणि प्रत्येकाला घरी राहणे बंधनकारक आहे, तेव्हा आयआयटी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी नाविन्यपूर्ण गोष्टी साध्य करत आहेत.

पोखरीयाल म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी सध्या भारतात कोठेही वेगळ्या ऑन-कॅम्पस कार्यक्रमासाठी प्रवेश घेतला आहे ते कोणत्याही व्यावसायिक किंवा इतर अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द न करता या पदवी कार्यक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. जे नियोक्ते आपल्या कर्मचार्‍यांचे कौशल्य वृद्धिंगत करू इच्छितात ते देखील नोकरीचा वेळ वाया न घालवता या पर्यायाचा विचार करू शकतात. ते पुढे म्हणाले की हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, फायदेशीर क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो, कार्यरत व्यावसायिकांना करिअरची संधी उपलब्ध करुन देतो आणि विद्यार्थ्यांना आयआयटी मद्राससारख्या मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी मिळविण्याची संधीही प्रदान करतो.

या पदवी कार्यक्रमाबद्दल आयआयटी मद्रास टीमचे अभिनंदन करताना धोत्रे म्हणाले की आजच्या जगात शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विद्यार्थी आणि व्यावसायिकांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि वेळ आणि स्थानाच्या मर्यादेत कार्य करण्यासाठी त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे हे आणखी आव्हानात्मक झाले आहे. ते म्हणाले की, डेटा विज्ञान आणि प्रोग्रॅमिंग हे उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विकासाचे क्षेत्र आहे आणि या महत्त्वपूर्ण क्षेत्रात ऑनलाइन पदवी उपलब्ध झाल्यामुळे आता आयआयटी मद्रास आणखी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल.

हा कार्यक्रम अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून दिला जाईल आणि जेथे डिजिटल साक्षरतेचा प्रसार कमी आहे अशा भारतातील अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आकर्षित करेल आणि करियरच्या प्रवासात त्यांना पुढे मार्गक्रमण करण्यास मदत करेल. ऑनलाइन लर्निंग मंचावर शिकण्याचा अनुभव हा वर्गातील नियमित शिक्षणासारखाच असावा हे सुनिश्चित करण्यासाठी, या कार्यक्रमामध्ये इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच अध्यापक, साप्ताहिक असाइनमेंट्स आणि वैयक्तिक  पर्यवेक्षण परीक्षांचे व्हिडिओ असतील. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा डेटा व्यवस्थापित करण्याचे कौशल्य, अर्थव्यवस्थेची अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी नमुन्यांची कल्पना, मॉडेलची अनिश्चितता समजुन प्रभावी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अंदाज तयार करण्यात मदत करणारे मॉडेल्स तयार करेल.

फाऊंडेशनल कार्यक्रम , डिप्लोमा कार्यक्रम आणि डिग्री कार्यक्रम या तीन वेगळ्या टप्प्यात हा अनोखा ऑनलाइन कार्यक्रम असेल. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचे आणि आयआयटी मद्रासकडून अनुक्रमे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळविण्याचे स्वातंत्र्य असेल. पात्रतेच्या आधारे इच्छुक उमेदवारांना एक फॉर्म भरावा लागेल आणि पात्रता परीक्षेसाठी 3,000 रु. नाममात्र शुल्क भरावे लागेल. शिक्षार्थ्यांना 4 विषयांची  (गणित, इंग्रजी, सांख्यिकी आणि संगणकीय विचार) 4 आठवड्यांची अभ्यास सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. हे विद्यार्थी ऑनलाईन व्याख्यान (लेक्चर) ऐकतील, ऑनलाइन असाइनमेंट सादर करतील आणि 4 आठवड्यांच्या शेवटी वैयक्तिक पात्रता परीक्षा देतील. आयआयटीच्या ठराविक प्रवेश प्रक्रियेच्या मर्यादित संख्येच्या-कॅम्पस जागांच्या विरुद्ध, या कार्यक्रमात पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी (एकूणच 50% गुणांसह) फाऊंडेशन अभ्यासक्रमाला नोंदणी करण्यास पात्र असतील. 

कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी  www.onlinedegree.iitm.ac.in वर लॉग इन करा.

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635427) Visitor Counter : 208