विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
फुफ्फुसाच्या, स्तनाच्या आणि यकृताच्या कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करणाऱ्या इनऑरगॅनिक- ऑरगॅनिक हायब्रिड संयुगाचे आयएनएसटीकडून संश्लेषण
कर्करोगावरील उपचारांच्या भावी धातुंसहितऔषधांसाठी एक आश्वासक घटक म्हणून पॉलिऑक्सिमेटॅलेट्स( पीओएम)चा उदय
आयएनएसटीच्या चमूने केलेल्या या संयुगाच्या संश्लेषणामुळे ट्युमर प्रतिबंधक उपचारांची नवी दालने खुली होणार
Posted On:
29 JUN 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2020
मोहालीच्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी( आयएनएसटी) या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेने कर्करोग प्रतिबंधक संशोधनात महत्त्वाची कामगिरी केली आहे. स्तन, फुफ्फुसे आणि यकृताच्या कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करू शकेल अशा प्रकारच्या नव्या असेंद्रीय- सेंद्रीय संकरित संयुगाचे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी संश्लेषण केले आहे. यामुळे धातु मिश्रित औषधांच्या नव्या उपचारांची दालने खुली होणार आहेत.
फॉस्फोमॉलिब्डेट क्लस्टरवर आधारित हे घन संयुग म्हणजे फॉस्फोमॉलिब्डिक आम्लाचा असेंद्रिय क्षार असून तो पॉलिऑक्सिमेटॅलेट्स परिवाराचा सदस्य आहे. ट्युमर म्हणजे अर्बुद प्रतिबंधक क्षमता असलेला घटक म्हणून तो यापूर्वी ओळखला जात होता. डॉ. मोनिका सिंग आणि डॉ. दीपिका शर्मा यांच्या चमूने कर्करोगाच्या पेशींना नष्ट करणाऱ्या संयुगाच्या यंत्रणेचा आराखडा तयार केला. डाल्टन ट्रान्झॅक्शन्स या शोधपत्रिकेमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
पॉलिऑक्सिमेटॅलेट्स( पीओएम) म्हणजे इनऑरगॅनिक मेटल ऑक्साईड्सची नव्याने उदयाला आलेली श्रेणी असून गेल्या दशकात त्यांच्या रचना आणि गुणधर्मातील विविधता यामुळे जैविक व्यवहारांसाठी एक आश्वासक रसायन म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
या संयुगाने कर्करोगाच्या पेशी कशा प्रकारे नष्ट केल्या जातात या प्रक्रियेच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी सिंग यांच्या वैज्ञानिक चमूने जलौष्णिक पद्धतीने संश्लेषण केले. सोडियम मॉलिब्डेट, फॉस्फोरिक ऍसिड आणि बायपायरिडिन यांचे जलीय मिश्रण तयार करून पीच फोरच्या ऍसिटेट बफर द्रावणात ते 72 तास 160 अंश सेल्सियस तापमानावर तापवले. या संयुगाची स्तनांचा कर्करोग(एमसीएफ-7), फुफ्फुसांचा कर्करोग( ए549) आणि यकृताचा कर्करोग(एचईपीजी2) या पेशींचा एमटीटी ऍसे( पेशी चयापचय क्रियेचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या) या नेहमीच्या पद्धतीने नाश करण्याची क्षमता परीक्षा नळीत तपासण्यात आली. या संयुगाची विविध कर्करोग पेशींचा नाश करण्याच्या क्षमतेची तुलना नेहमी वापरल्या जाणाऱ्या केमोथेरेपी उपचारातील घटक मेथोट्रेक्सेट( टीसीआय) यांच्याशी एमटीटी ऍसे पद्धतीने करण्यात आली.
स्तनांचा कर्करोग (एमसीएफ-7), फुफ्फुसांचा कर्करोग( ए549) आणि यकृताचा कर्करोग(एचईपीजी2) या पेशींचा मृत्यू(नाश) होत असताना त्या रचनेचा, एलेक्सा फ्लुओर 488 ऍनेक्सिन व्ही/ मृत पेशी अपोप्टॉसिस किट वापरून अभ्यास करण्यात आला. पेशी विभागणीवर संश्लेषित घटकांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी स्तनांचा कर्करोग(एमसीएफ-7), फुफ्फुसांचा कर्करोग( ए549) आणि यकृताचा कर्करोग(एचईपीजी2) या पेशींच्या पेशीचक्राचे फ्लो सायटोमेट्री प्रक्रियेने विश्लेषण करण्यात आले. परीक्षा नळीतील चाचण्यांमध्ये असे दिसून आले की हा संकरित घनपदार्थ मानवी पेशींसाठी कमी घातक आहे आणि त्याची ट्युमर प्रतिबंधक क्षमता नेहमी वापरल्या जाणाऱ्या केमोथेरपी उपचारपद्धतीमधील मेथोट्रेक्सेट(एमटीएक्स) प्रमाणेच आहे. गेल्या काही दशकात पॉलिऑक्सिमेटॅलेट्स( पीओएम) कर्करोग प्रतिबंधक उपचारांमध्ये भावी धातुक औषधींमधील आश्वासक घटक म्हणून उदयाला आले आहेत. आयएनएसटीने केलेल्या या संयुगाच्या संश्लेषणामुळे टुयमर प्रतिबंधक उपचारांची नवी दालने खुली होऊ शकणार आहेत.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635181)
Visitor Counter : 199