संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दोन दिवसीय संरक्षण परिषद 2020 गुजरातचे उद्घाटन केले
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2020 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2020
आपल्या अर्थव्यवस्थेचा ठळक विकास तसेच मानवता हे मूल्य केंद्रस्थानी ठेवत केलेले दीर्घकालीन तात्विक नेतृत्व तसेच वैशिष्टपूर्ण भू-स्थान यामुळे भारत जागतिक सत्ताकारणात महत्वाचा देश म्हणून उद्याला येत आहे असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. कॉन्फेडेरशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) गुजरात आणि भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक संघटना (SIDM) यांच्या संयुक्त विद्यमाने भरलेल्या संरक्षण आणि हवाई साहित्य उत्पादक क्षेत्र यावरील ‘संरक्षण परिषद 2020 गुजरात’चे आज व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते.
मजबूत संरक्षण सिद्धतेमुळे आपल्या देशात गेल्या दोन दशकात झालेल्या आर्थिक भरभराटीला बळकटी येते तसेच व्यापारमार्ग किंवा संरक्षण यावर अवलंबून असणाऱ्या महत्वाच्या आर्थिक संबधांचे संरक्षण होते असेही श्रीपाद नाईक पुढे म्हणाले. “संरक्षण क्षेत्राबद्दल केंद्र सरकारची स्पष्ट दूरदृष्टी आणि या क्षेत्रातील मुबलक संधी यामुळे या क्षेत्राकडे आज मोठ्या कंपन्याच नाहीत तर कित्येक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय आकर्षित झाले आहेत. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक नामी संधी यादृष्टीने ते याकडे बघत आहेत. या क्षेत्राच्या वाढीमुळे या क्षेत्रात कौशल्याधारित नोकऱ्या वाढून, देशाला आवश्यक असणारे रोजगारक्षेत्र रुंदावत आहे” असेही संरक्षण राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
इतर क्षेत्रातील मंदावलेली किंवा साचलेली कर्ज व्यवस्था यामुळेही शाश्वत व्यवसायाची हमी देणाऱ्या संरक्षण उद्योगाकडे त्यांचा ओढा वाढत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्यांना उत्पादने पुरवणाऱ्या जवळपास 8000हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSMEs) उद्योग या क्षेत्रात आहेत असं आपल्याला कळल्याचेही त्यांनी नमूद केले. जास्तीत जास्त MSME या क्षेत्रात येऊन हा पाया विस्तारायला हवा असंही ते म्हणाले.
गुजरातचे वैशिष्ट्य नमूद करतानाच श्रीपाद नाईक म्हणाले की , गुजरात हे राज्य उत्तम पायाभूत सुविधा असलेले राज्य आहे तसेच संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आणि तयार उत्पादन पोहोचवण्याची उत्कृष्ट व्यवस्था या राज्यात आहे. या राज्याला लाभलेला सोळाशे किलोमीटरचा सागरी किनारा व त्यावरील उत्तम प्रकारे जोडलेली बंदरे आणि MSME तंत्रज्ञान कंपन्या यामुळे संरक्षण क्षेत्राला हवी ती पुरवठा साखळी इथे तयार होते. याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था तंत्रज्ञान ,डिझाईन ,संशोधन आणि विकास आणि पायाभूत सुविधांचे जाळे आणि जागतिक स्तराची जहाज बांधणी तसेच दुरुस्ती उद्योग यामुळे त्याला बळकटी मिळते असेही ते म्हणाले.
मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तसेच वाढत्या संरक्षण क्षेत्राच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी गुजरातमध्ये राज्य सरकारने संरक्षण आणि हवाई औद्योगिक धोरण अंगीकारले आहे , त्यानुसार संरक्षण उत्पादनाचे प्रभाग आखण्यात आले आहेत.
त्या परिषदेमुळे सरकारी वरिष्ठ स्तरावरील प्रतिनिधी , महत्वाच्या उद्योग आणि शैक्षणिक संस्था एकत्र येतील . महत्वाच्या संरक्षण व्यवसायिक धोरणांबद्दल चर्चा होईल, संबंधित कल्पना ,दृष्टिकोन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होईल. संरक्षण व्यवस्थेसाठी उत्पादन आणि पूर्णपणे स्वदेशी संरक्षण व्यवस्था यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञान विषयक संधींचा आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या दूरदृष्टीवर आधारित सकारात्मकतेला संरक्षण क्षेत्रात चालना देणे हा या परीषदेचा उद्देश आहे.
M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1634620)
आगंतुक पटल : 214