आदिवासी विकास मंत्रालय
सिकल सेल आजार आणि व्यवस्थापनाबाबत ग्रामीण/ आदिवासी भागात जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता- अर्जुन मुंडा
Posted On:
19 JUN 2020 7:58PM by PIB Mumbai
देशात सिकल सेल आजाराबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे आदिवासी व्यवहारमंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले आहे.
जागतिक सिकल सेल दिवसाच्या पार्श्वभूमीवर फिक्की, आदिवासी व्यवहार मंत्रालय, अपोलो रुग्णालय आणि नोवार्टिस यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिकल सेल परिसंवाद या वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. भारतात सिकल सेल आजाराला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना शोधण्यासाठी आणि हाताळणी करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
सिकल सेलशी संबंधित उपयुक्त माहिती आणि प्रत्यक्षातील आकडेवारी गोळा करण्यासाठी सरकारने एक नवे पोर्टल सुरू केले असून या आजाराबाबतच्या जनजागृतीला चालना देणारा घटक म्हणून ते काम करेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या पोर्टलवर नोंदणीची सोय असून त्यावर प्रत्यक्ष स्थानावरील त्या त्या वेळी असलेल्या स्थितीची आकडेवारी उपलब्ध असेल, तसेच या आजाराबाबतची आणि सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देखील उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले.
सिकल सेल बाबतच्या जागरुकतेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की आज ग्रामीण भागात लोक कोविड-19 बाबत दक्ष आहेत कारण त्यांच्यात या आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झालेली आहे. अगदी तशाच प्रकारे आता आपल्याला ग्रामीण आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करावी लागेल. मंत्रालयाने देखील कृती संशोधन प्रकल्प सुरू केला असून त्या अंतर्गत योगसाधना आधारित जीवनशैलीचा पुरस्कार केला पाहिजे आणि हा आजार झालेल्या रुग्णाच्या समस्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
या संदर्भात त्यांनी राज्यांच्या अधिक सहभागाचे आवाहन केले. या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांचा आदिवासी मंत्रालय विचार करत आहे आणि आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सिकल सेल आजाराने केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरच परिणाम होत नाही तर अर्थव्यवस्थेलाही झळ पोहोचते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रुग्णांची तपशीलवार माहिती जमा करण्यासाठी, तपासण्यांचे प्रमाण वाढवून योग्य उपचार देण्यासाठी राज्यांनी अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना मुंडा यांनी केली. आपली भावी पिढी या आजारापासून मुक्त असेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आज या आजाराबाबत समाजामध्ये एक प्रकारची लांच्छनाची भावना आहे . आपल्याला ती केवळ कमी करायची नाही तर या आजाराला तोंड देण्याच्या अधिक चांगल्या उपाययोजना शोधायच्या आहेत, यावर त्यांनी भर दिला. सरकारचा सिकल सेल कार्यक्रम राबवण्याच्या एकंदर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी उद्योग आणि इतर संबंधितांना पुढे येण्याचे आवाहन केले.
फिक्कीच्या अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी यावेळी उपस्थित होत्या. या आजाराच्या हाताळणीसाठी फिक्की आवश्यक ते सर्व पाठबळ देत राहील, असे त्यांनी सांगितले. भारतीय समाजातील उपेक्षित घटकांवर विशेष भर देत देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याच्या विविध उपाययोजना फिक्कीकडून हाती घेतल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
समाजामध्ये या आजाराबाबत जागरुकता वाढवण्याचा, जागतिक पातळीवर या आजारामुळे निर्माण झालेल्या ताणाचा आणि भारतातील स्थितीचा आढावा घेण्याचा या वेबिनारचा उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या.
सिकल सेल हा आजार म्हणजे आनुवंशिकतेने निर्माण झालेला रक्तदोष म्हणजे भारतातील अनेक आदिवासी समूहांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्थांवर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो. एकीकडे अनेक किफायतशीर उपाययोजनांमुळे या आजारामुळे होणाऱ्या समस्यांच्या आणि मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असली तरी भारतातील आदिवासी भागात त्यांची उपलब्धता मर्यादित आहे.
या वेबिनारमध्ये मल्टिपल फेसेस ऑफ सिकल सेल डिसिज या पॅनेल डिस्कशनचे आयोजन देखील करण्यात आले. यामध्ये एम्सच्या हेमॅटोलॉजीचे प्राध्यापक डॉ. तुलिका सेठ, कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या ब्लड सेल विभागाच्या राष्ट्रीय वरिष्ठ सल्लागार विनिता श्रीवास्तव, डेहराडूनच्या गॅप हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री प्रा. आर एन के बामेजाई, बाहरिन सिकल सेल सोसायटीचे अध्यक्ष झकेरिया इब्राहीम अल काधीम, ओदिशामधील सिकल सेल इन्स्टिट्युटचे प्रकल्प समन्वयक डॉ. पी के मोहंती, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन, ग्लोबल अलायन्स सिकल सेल डिसीज ऑर्गनायजेशनच्या सीईओ लॅनरे तुनीज अजायी सहभागी झाले होते.
या वेबिनारमध्ये स्टेपिंग आऊट ऑफ शॅडोज- कॉम्बॅटिंग सिकल सेल डिसिज इन इंडिया या नोवार्टिस च्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
****
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632706)
Visitor Counter : 673