भूविज्ञान मंत्रालय
21 जून 2020 रोजी दिसणार (31 ज्येष्ठ, शक संवत 1942) कंकणाकृती सूर्यग्रहण
Posted On:
16 JUN 2020 2:50PM by PIB Mumbai
21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल. देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 % भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरू मध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल.
कंकणाकृती ग्रहण कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरब, ओमान, पाकिस्तानसह भारत आणि चीनच्या उत्तर भागांमधून दिसेल. चंद्राच्या सावलीमुळे होणारे खंडग्रास ग्रहण आफ्रिका (पश्चिम आणि दक्षिण भाग वगळता) दक्षिण आणि पूर्व युरोप, आशिया (उत्तर आणि पूर्व रशिया वगळता) तसेच ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात काही ठिकाणी दिसेल.
सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.
ग्रहण लागलेल्या सूर्याला मोकळ्या डोळ्यांनी कधीही पाहू नये, अगदी थोडा वेळ सुद्धा असा सूर्य मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण काळात चंद्रामुळे सूर्याचा जास्तीत जास्त भाग झाकला गेल्यानंतर सुद्धा ग्रहण लागलेला सूर्य मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये. असे केल्यास डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. अंधत्वही येऊ शकते. अॅल्युमिनाईज्ड मायलर, काळे पॉलीमर, शेड क्र. 14 ची वेल्डींग काच किंवा दुर्बीणीतून ग्रहण लागलेल्या सूर्याची प्रतिमा कागदावर प्रक्षेपित करून पाहणे सुरक्षित आहे.
भारतातील विविध ठिकाणांहून हे ग्रहण केव्हा आणि कोणत्या अवस्थेत पाहता येईल, याचे तपशील असणारे कोष्टक सोबत जोडले आहे.
******
B.Gokhale/ M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631883)
Visitor Counter : 276