वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियुष गोयल यांनी भारतीय गुणवत्ता परिषदेचा घेतला आढावा
गुणवत्ता भारताचे भविष्य निश्चित करेल : मंत्री
दर्जेदार उत्पादने आणि सेवांच्या आधारे आत्मनिर्भर भारत वृद्धिंगत होईल
गुणवत्ता प्रमाणन तर्कसंगत, पारदर्शक, विश्वसनीय आणि कोणत्याही गैरव्यवहारापासून मुक्त असावे
Posted On:
12 JUN 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2020
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, गुणवत्ता भारताचे भविष्य निश्चित करेल. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज भारतीय गुणवत्ता परिषदेच्या कामगिरीचा आढावा घेताना गोयल म्हणाले की, दर्जेदार स्वदेशी उत्पादने आणि सेवांच्या आधारे आत्मनिर्भर भारत वृद्धिंगत आणि समृद्ध होईल. ते म्हणाले की, गुणवत्तेची जाण सामान्य माणसाच्या पातळीपर्यंत झिरपणे आवश्यक आहे आणि दर्जेदार संस्कृती आपल्या जीवनातील सर्व बाबींमध्ये आत्मसात केली पाहिजे आणि जोपासली पाहिजे.
भारतीय गुणवत्ता परिषद, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत (DPIIT) कार्यरत ना नफा तत्वावरील एक स्वायत्त संस्था आहे, जी एक मान्यता संरचना स्थापन करण्याचा आणि राष्ट्रीय गुणवत्ता अभियान सुरु करून भारतात गुणवत्ता आंदोलन पसरविण्यासाठी अधिकृत आहे. क्यूसीआयचे ध्येय मुख्यत्वे राष्ट्राचे आणि नागरिकांचे हित जोपासण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व कार्यक्षेत्रांत गुणवत्तेच्या मानकांचे पालन करण्यावर भर देण्यासाठी सर्व भागधारकांना सामील करून, देशभरातील दर्जेदार चळवळीचे नेतृत्व करणे आहे.
मागील काही वर्षात झपाट्याने होत असलेला विस्तार आणि क्षेत्र आणि शाखांमधील उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात केलेला विकास याबद्दल क्यूसीआयचे कौतुक करताना मंत्री म्हणाले की, ही घौडदौड अशीच अविरत सुरु राहिली पाहिजे. ते म्हणाले की, लॉकडाऊन कालावधींत क्यूसीआयने अनेक उपक्रम राबविले आहेत, परंतु खरे आव्हान आणि संधी तर कोविड नंतरच्या काळात आहेत. गोयल यांनी सांगितले की, भविष्यकाळ नवीन निकषांसह, नवीन जीवन शैलीची सुरुवात करणार आहे. मानवी जीवनाचा कोणताच पैलू मग तो सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणताही असो तो नवीन निकाषांपासून अलिप्त राहू शकणार नाही. नवीन निकष शिक्षण, आरोग्य, बाजारहाट, सेवांसह सर्वच क्षेत्रांत नवीन गुणवत्तेच्या मानकांची मागणी करतील. कोविड नंतरच्या कालावधीत इतर देशांमध्ये विकसित झालेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून विविध पैलू आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्याचा भारतात अवलंब करावा असे आवाहन त्यांनी क्यूसीआयला केले. तसेच त्यांनी क्यूसीआयला देशातील कौशल्यामध्ये असलेल्या दरीचे विश्लेषण करून ही दरी भरून काढण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले. मंत्री म्हणाले की, भविष्यात सरकारी क्षेत्रात ऑफलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी उभारलेल्या मोठ्या प्रशिक्षण पायाभूत सुविधांची गरज भासू शकणार नाही आणि ऑनलाइन प्रशिक्षण अधिक प्रभावी आणि परवडणारे देखील सिद्ध होऊ शकेल.
गुणवत्तेचे मूल्यांकन आणि प्रमाणीकरण तर्कसंगत, पारदर्शक, विश्वासार्ह आणि कोणत्याही हेराफेरी किंवा गैरप्रकारांपासून मुक्त असले पाहिजे यावर मंत्र्यांनी भर दिला. गुणवत्तेचे मानक उच्च श्रेणीचे आणि अंमलबजावणीयोग्य असावेत. ते म्हणाले की, जीएम पोर्टलवरील सर्व उच्च मूल्याची उत्पादने गुणवत्ता प्रमाणित आहेत याची खात्री करण्यासाठी क्यूसीआय आणि जीएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) यांनी एकत्र आले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, आतिथ्य, वाहतूक, पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, एमएसएमई क्षेत्रातील दर्जेदार निकष तातडीने विकसित करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. गोयल यांनी क्यूसीआयला खासगी क्षेत्राला देखील दर्जेदार मानके व पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
* * *
S.Thakur/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631214)
Visitor Counter : 267