विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर प्रयोगशाळेकडून देशव्यापी उन्हाळी संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


सीएसआयआर प्रयोगशाळांमधील सुमारे 400 ज्येष्ठ वैज्ञानिक प्रशिक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार

या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या 400 विद्यार्थ्‍यांना आर्थिक अनुदान

Posted On: 04 JUN 2020 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2020

कोविड-19 महामारीमुळे आणि संपूर्ण देशभरामध्ये टाळेबंदी जारी करावी लागल्यामुळे देशामध्ये इतर क्षेत्राप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रामध्येही आलेली शिथिलता, साचलेपण कमी करून या सर्वांना कामामध्ये उत्साह वाटावा यासाठी नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एनईआयएसटी) ने एक योजना तयार केली आहे. आसाममधल्या जोरहाटस्थित सीएसआयआर -एनईआयएसटी यांनी देशव्यापी ग्रीष्मकालीन संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमाचे (सीएसआयआर-एसआरटीपी-2020) आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून  घोषणा सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी. मंडे कार्य करणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, यासाठी सीएसआयआरच्या 38 प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेल्या संशोधक, व्याख्याते, शिक्षक यांची मार्गदर्शक म्हणून मदत घेण्यात येणार आहे. ग्रीष्मकालीन प्रशिक्षण सत्र ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे सीएसआयआर -एनईआयएसटीचे संचालक डॉ. जी नरहरी शास्त्री यांनी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एका संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्‍यांना या उन्हाळी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी http://www.neist.res.in/srtp2020/ या संकेतस्थळावर जावून सर्व तपशीलवार माहिती पुस्तिका मिळवावी आणि ऑनलाईन अर्ज करावा. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दि. 28 मे 2020 रोजी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून नाव नोंदणीचा अखेरचा दिवस 5 जून, 2020 आहे.

जे विद्यार्थी बी.एससी, एम.एससी, एमसीए, बीटेक, बी.ई, एमसीए, एम.टेक. आणि एम.फार्मा यासारख्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम करीत आहेत, त्यांच्यासाठी या प्रशिक्षणाची रचना केली आहे. हे प्रशिक्षण विद्यापीठ अनुदान आयोग, एआयसीटीई, राज्य, केंद्रीय, खाजगी विद्यापीठे यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातल्या शिक्षकांना करता येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया उमेदवारांनी ज्या प्रकारे माहिती सादर केली आहे, त्या गुणवत्तेच्या आधारे पार पाडण्यात येणार आहे. अर्जदाराला तीन सीएसआयआर प्रयोगशाळांमधून एक संस्था निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरितीने पार पाडल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भूविज्ञान, औषधशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि वैद्यकशास्त्र अशा विविध विषयांवर ऑनलाईन व्याख्याने देण्यासाठी सीएसआयआरच्या प्रयोगशाळांमधले सुमारे 400 वरिष्ठ संशोधक कार्यरत असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या 400 विद्यार्थ्‍यांना आर्थिक अनुदानही देण्यात येणार आहे.

अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मुलांना आपल्या अभ्यासाच्या विषयातली अधिक वैज्ञानिक माहिती, ज्ञान घेण्याची प्रेरणा मिळेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी शिथिलता आली आहे, त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास मदत मिळेल, असे मत डॉ. शास्त्री यांनी व्यक्त केले.

(लेखन-बिजीत कुमार चौधरी, वरिष्ठ संशोधक, सीएसआयआर-एनईआयएसटी,जोरहाट, आसाम)

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629553) Visitor Counter : 245