पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 56 सीएनजी केंद्रांचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रार्पण


CGD जाळे लवकरच 72% देशवासीयांना सामावून घेणार-प्रधान

Posted On: 29 MAY 2020 6:24PM by PIB Mumbai

 

पर्यावरणस्नेही अशा काॅम्पप्रेड नॅचरल गॅस (CNG)  अर्थात अतिदाबाखालील नैसर्गिक वायूच्या वापराची देशातील व्याप्ती वाढवत आज, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका ऑनलाईन सोहळ्याद्वारे  48 CNG स्थानकांचे राष्ट्रार्पण व अन्य 8 CNG स्थानकांचे उदघाटन केले. गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, पंजाबराजस्थान, तेलंगण, आणि उत्तरप्रदेश अशा 11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही स्थानके पसरलेली असून त्यावर सार्वजनिक व खासगी मिळून 11 संस्थांची मालकी आहे.

देशातील वायुनलिकांचे जाळे विस्तारित करण्यात भागीदारी असणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक करत श्री.प्रधान म्हणाले  की, "CGD  म्हणजेच शहरी वायू वितरणाचे जाळे लवकरच देशातील 72% जनतेला सामावून घेईल, आणि 53% भौगोलिक क्षेत्रावर त्याचा विस्तार असेल." देश आता 'वायु-आधारित' अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. PNG स्थानकांची संख्या 25 लाखांवरून 60 लाखांवर गेली आहे. औद्योगिक प्रकारच्या वायुजोडण्यांची संख्या 28 हजारांहून 41 हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर, CNG  वरील वाहनांची संख्या 22 लाखांवरून 34 लाख झाली आहे. सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कंपन्याही देशात वायूचा वापर करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात उत्साहपूर्ण सहभाग घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

उर्जेच्या बाबतीत कार्यक्षमता, परवडण्याजोग्या दरात उपलब्धता, सुरक्षितता आणि सर्वांसाठी उपलब्धता या पैलूंवर सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले. 'लवकरच अशी व्यवस्था येईल ज्यामध्ये ग्राहकांना एकाच ठिकाणी पेट्रोल, डिझेल, CNG, LNG ( द्रवीकृत नैसर्गिक वायू), आणि LPG अशी सर्व इंधने मिळू शकतील' अशा शब्दात त्यांनी याबाबतचा दूरगामी दृष्टिकोन मांडला. सरकारने यापूर्वीच डिझेलच्या फिरत्या गाड्या सुरु केल्या असून पेट्रोल आणि LNG  साठीही त्या सुविधेचा विस्तार करण्याचा सरकारचा मानस आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात लोकांना इंधन घरपोच मिळू शकेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

"ऊर्जेचा वापर करण्याच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो" असे सांगून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर म्हणाले की, "एकूण ऊर्जेपैकी 15% हिस्सा वायुद्वारे प्राप्त करून घेण्यासाठी भारताचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. देशात जसजसे आर्थिक घडामोडी व व्यवहारांचे आणि उपभोगाचे प्रमाण वाढते तसतशी ऊर्जेची मागणी वाढत जाणे क्रमप्राप्त आहे". वायुरूप इंधन हे पर्यावरणस्नेही, ऊर्जा-कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने, सरकार त्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत  जाईल, असेही कपूर म्हणाले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, वायू-कंपन्या आणि अन्य भागीदारांनीही या आभासी उद्घाटन समारंभात भाग घेतला.

देशभरातील लॉकडाउनमुळे सदर स्थानकांवरील कामाच्या शेवटच्या टप्प्यावर परिणाम झाला होता. मात्र, गेल्या महिन्यात निर्बंध काहीसे शिथिल झाल्यावर पुन्हा वेगाने काम सुरु झाले. सुरक्षा आणि सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून काम पूर्ण झाले. आता देशाच्या CNG  नेटवर्कमध्ये या स्थानकांची भर पडल्यामुळे देशात दररोज 50,000 वाहनांमध्ये CNG  भरण्याची क्षमता उत्पन्न झाली आहे.

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627680) Visitor Counter : 263