कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोना नमुने चाचणी प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची चर्चा


कोविड व्यवस्थापनामध्ये इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जम्मू काश्मीरची कामगिरी चांगली- डॉ. सिंग

Posted On: 21 MAY 2020 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोना नमुने चाचणी प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत आज केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी चर्चा केली. जम्मू आणि काश्मीरचा आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर सरकारी  वैद्यकीय महाविद्यालये आणि एसकेआयएमएस यांचे प्रमुख आणि अध्यापक सदस्य यांच्याशी सुमारे दीड तास झालेल्या चर्चेमध्ये डॉ. जितेंद्र सिंग यांनी कोरोना नमुने चाचणी प्रक्रिया अधिक कालबद्ध करण्याची जनतेकडून होणारी मागणी पूर्ण करण्यावर आणि जे लोक आपले नमुने चाचणीसाठी देत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे अनावश्यक विलंब होणार नाही याची हमी देण्यावर भर दिला. जनतेने देखील अधिक जागरुक राहावे आणि नमुने तपासणीच्या वेळी अर्ज भरतांना आपले नाव, मोबाईल क्रमांक, इत्यादी तपशील अचूक द्यावा जेणेकरून चुकीच्या माहितीमुळे होणारा विलंब टाळता येईल, असे आवाहन सिंग यांनी केले. एका पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून अर्थपुरवठा आयुक्त(आरोग्य) अटल डल्लू यांनी सध्या विविध मानांकित चाचणी केंद्रामध्ये होत असलेल्या चाचण्यांच्या सद्यस्थितीची आणि आगामी काळात चाचण्यांच्या संख्येत होणाऱ्या वाढीच्या अंदाजाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

सुरुवातीला या चाचण्यांची संख्या 100 चाचण्या प्रतिदिन होती ती आता दिवसाला 1000 झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कालपासून आयसीएमआरचे ऍप सुरू झाल्यामुळे नमुन्यांच्या चाचण्यांचे अहवाल येण्याचा कालावधी तीन दिवसांपर्यंत कमी करता येऊ शकेल. केंद्र सरकारने दिलेल्या सक्रिय पाठबळामुळे आता पीपीई किट्स आणि एन-95 मास्कची कोणतीही टंचाई नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. याबाबत आणखी पाठपुरावा केल्यास चाचणीचा अहवाल येण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करता येऊ शकेल, याकडे डॉ. जितेंद्र सिंग यांनी लक्ष वेधले आणि प्रलंबित चाचण्यांच्या अहवालांचा निपटारा त्वरेने करण्याचे निर्देश दिले. यावेळी विलगीकरण केंद्रामधील सुविधांच्या मुद्यावर देखील चर्चा झाली. डॉ. जितेंद्र सिंग यांनी यावेळी विलगीकरणाच्या काळात आरोग्य सुविधांवर स्थानिक अधिकाऱ्यांनी भर देण्याची सूचना केली. आरोग्यविषयक निकषांचे काटेकोर पालन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. जनतेशी सातत्याने संवाद सुरू ठेवावा आणि विलगीकरणासंदर्भात आणि कोरोना व्यवस्थापनासंदर्भात त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जितेंद्र सिंग यांनी राज्यातील आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय समुदायाची प्रशंसा केली.

इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत जम्मू आणि काश्मीरने चांगली कामगिरी केली असून त्याबाबतच्या आकडेवारीतून ते सिद्ध होत आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जम्मू आणि काश्मीरमधील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जास्त आहे आणि  दर दिवशी होणाऱ्या चाचण्यांमध्ये हे राज्य सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन राज्यांमध्ये राहिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी इतर काही जणांनी आपले विचार व्यक्त केले. त्यामध्ये एसकेआयएमएसचे संचालक डॉ. अय्यंगार, प्रिन्सिपल गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, श्रीनगर चे डाॅ. सामिया, जम्मूच्या प्रिन्सिपल गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजचे डॉ. एन. सी. डिंग्रा यांचा समावेश होता. यावेळी इतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य देखील उपस्थित होते.   

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625906) Visitor Counter : 172