शिक्षण मंत्रालय

सीबीएसईने तयार केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सायबरसुरक्षा, 21व्या शतकातील कौशल्ये आणि सिद्धांत याविषयांवरील तीन पुस्तिकांचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांकडून प्रकाशन

Posted On: 20 MAY 2020 10:35PM by PIB Mumbai

 

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षणाच्या मूल्याधारित जागतिक मानकांचा अंगिकार करण्यासाठी तयार केलेल्या तीन पुस्तिकांचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रकाशन केले.  ‘सायबर सिक्युरिटी- अ हँडबुक फॉर स्टुडंट्स ऑफ सेकंडरी अँड सिनियर सेकंडरी स्कूल्स’ ही पुस्तिका नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी या पुस्तिकांचे प्रकाशन करताना दिली. सध्याच्या काळात इंटरनेट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सायबर सुरक्षाविषयक धोक्यांना तोंड द्यावे लागते, अशा विदयार्थ्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन करणारी ही पुस्तिका असल्याचे त्यांनी सांगितले.

इन पर्सू ऑफ एक्सलन्स- अ हँडबुक फॉर प्रिन्सिपल्स” ही पुस्तिका शाळांच्या प्राचार्यांसाठी तयार केली असून त्यांना बोर्डाची प्रणाली आणि इतर उपयुक्त माहिती देण्यात येणार आहे, असे पोखरियाल म्हणाले. यामुळे सीबीएसई प्रशासन आणि शाळांदरम्यान अधिक चांगला समन्वय निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी स्किल्सः अ हँडबुक” या पुस्तिकेच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील कौशल्यांबाबत सीबीएसई प्रत्येकामध्ये जागरुकता निर्माण करेल आणि त्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करण्यासाठी प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.

देशातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमधील सर्व संबंधितांना लाभ देण्यासाठी सीबीएसईने केलेल्या प्रयत्नांचे पोखरियाल यांनी कौतुक केले. या पुस्तिका सायबर सुरक्षेविषयी जास्त जागरुकता निर्माण करण्यामध्ये, क्षमतावृद्धी करण्यामध्ये आणि नेतृत्वाचा अनुभव देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा पोखरियाल यांनी व्यक्त केली.

*****

B.Gokhale/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625587) Visitor Counter : 181