रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने बनवलेल्या सर्वात शक्तिशाली 12000 अश्वशक्तीच्या स्वदेशी इंजिनाचे यशस्वी परिचालन


उच्च शक्तीचे इंजिन बनवणा-या जगातल्या प्रतिष्ठित देशांच्या समुहामध्ये भारत सहाव्या क्रमांकाचा देश बनला;  स्वदेशी इंजिन बनवणे, भारतीय रेल्वेच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी

Posted On: 19 MAY 2020 10:50PM by PIB Mumbai

 

बिहारमधल्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रा.लि. (एमईएलपीएल) मध्ये पहिल्या स्वदेशी 12000 अश्वशक्तीच्या रेल्वे इंजिनीची निर्मिती करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून या इंजिनाचे काल पहिल्यांदा व्यावसायिक स्तरावर यशस्वी संचालन करण्यात आले. 

या इंजिनाला ‘डब्ल्यूएजी12 क्रमांक 60027’असे नाव आणि नंबर देण्यात आला आहे. या इंजिनाचा पहिला प्रवास दुपारी 2.08 मिनिटांनी दीनदयाळउपाध्याय रेल्वे स्थानकातून सुरू झाला. या मालवाहू गाडीला एकूण 118 वाघिणी जोडण्यात आल्या होत्या. पूर्व रेल्वेच्या धनबाद विभागातून लांबपल्ल्याची ही  मालवाहू गाडी पहिल्यांदा धावली. या मालवाहू गाडीने देहरी ऑन-सोन, गढवा रोड या मार्गावरून बरवाडीहपर्यंत प्रवास केला.

भारतीय रेल्वेच्या दृष्टीने या इंजिनाचे संचालन म्हणजे गर्वाचा, अभिमानाचा क्षण आहे. कारण स्वदेशामध्ये उच्च अश्वशक्तिच्या इंजिनाची निर्मिती करणा-या सहा प्रतिष्ठित देशांच्या समूहामध्ये आता भारतही सहभागी झाला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचे संचालन भारताने केले आहे. या इंजिनाची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आली आहे. मधेपुरा इथला इंजिन निर्मिती कारखाना हा गुणवत्ता आणि सुरक्षा यांच्या दृष्टीने सर्वोच्च मानकांचा विचार करून स्थापण्यात आला आहे. तसेच सर्वात मोठा एकीकृत हरित क्षेत्र असलेला कारखाना आहे. यामध्ये 120 इंजिनांचे उत्पादन करण्याची क्षमता असून एकूण 250 एकर क्षेत्रामध्ये कारखाना उभारण्यात आला आहे.

नव्याने तयार करण्यात आलेले इंजिन अत्याधुनिक आयजीबीटी आधारित असून  3- फेज ड्राइव्ह आणि 9000 किलोवॅट (12000अश्वशक्ती) ऊर्जेचे इलेक्ट्रिक इंजिन आहे. हे इंजिन 706 केएनच्या जास्तीज जास्त संकर्षणासाठी सक्षम आहे. 150 मध्ये 1च्या ग्रेडियंटमध्ये 6000 टी ट्रेन चालू करण्यास आणि चालविण्यास सक्षम आहे. 22.5 टनांचे एक्सल लोडचे दोन बो-बो डिझाइनचे इंजिन 120 किमी प्रतितास वेगाने 25 टनांपर्यंत उन्नत करता येणार आहेत. या इंजिनचा वापर ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ साठी वापर करण्यात येणार असल्यामुळे आगामी काळात कोळसा मालवाहतुकीच्या दृष्टीने हे इंजिन ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. या इंजिनामध्ये बसवण्यात आलेल्या सॉफ्टवेअर आणि अँटेनामुळे जीपीएसच्या मदतीने आणि मायक्रोव्हेव लिंक माध्यमातून इंजिनाच्या प्रवासावर बारिक नजर ठेवता येणार आहे.

नवीन स्वदेशी इंजिन पारंपरिक ‘ओएचइ’ रेल्वेलाईनसह ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’आणि अतिउंचीवरच्या ‘ओएचइ’ रेल्वेलाईनवरही धावण्यास सक्षम आहे. इंजिनाच्या दोन्ही बाजूला वातानुकूलित ड्रायव्हर कॅब आहेत. इंजिनामध्ये पुनरूत्पादक बे्रकिंग सिस्टम सज्ज आहे. त्यामुळे गाडी चालत असतानाही पुरेशी ऊर्जेची बचत करणे शक्य होणार आहे. या अश्वशक्ती इंजिनामुळे मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग वाढणार आहे. तसेच अत्याधिक वापर होणा-या रेल्वे रूळांवर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रा.लि. (एमईएलपीएल) मध्ये येत्या 11 वर्षांत 800 अत्याधुनिक 12000 अश्वशक्ती क्षमतेची इलेक्ट्रिक फ्रेट इंजिनांची निर्मिती करण्यात येणार आहे. जगातल्या सर्वात शक्तीशाली इलेक्ट्रिक इंजिनांपैकी एक असलेल्या या इंजिनांमुळे मालगाड्यांचा वेग वाढणार आहे. त्याचबरोबर देशभरामध्ये पहिल्यापेक्षा अधिक वेगाने, सुरक्षित आणि मोठ्या वजनी मालगाड्यांची वाहतूक होवू शकणार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीची कोंडी कमी होईल. तसेच पुर्नउत्पादन ब्रेकिंगमुळे ऊर्जेच्या वापरात बचत होणार आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बिहारमधल्या मधेपुरा इथं 120 इंजिनांच्या निर्माणाची क्षमता असणारा एक कारखान्याबरोबरच टाउनशिप वसवण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे देशामध्ये 10,000 पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होत आहेत. कंपनीच्यावतीने या प्रकल्पासाठी 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

मधूपुरातल्या या रेल्वे इंजिन कारखान्यामुळे या भागात इतरही सामाजिक- आर्थिक विकासाला गती दिली जात आहे. सामाजिक दायित्वाअंतर्गत मधेपुरा इथल्या स्थानिक लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेने देशभरामध्ये माल वाहतूक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रा.लि. (एमईएलपीएल) बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. यामध्ये प्रकल्पासाठी  खरेदी- देखभाल करण्याचा  समावेश आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत या प्रकल्पामध्ये मोठी  गुंतवणूक करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये प्रारंभ झाला, मात्र अधिकृत उद्घाटन दि. 10 एप्रिल, 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याआधीच म्हणजेच मार्च 2018 मध्ये ‘प्रोटोटाइप लोकोमोटिव्ह’ वितरित करण्यात आले होते. डिझाइनसंबंधीच्या विषयांवर तोडगा काढून वाघिणींसह संपूर्ण इंजिनाचे पुन्हा एकदा डिझाइन करण्यात आले. या इंजिनाचे पाहणी आरडीएसओ यांनी मधेपुरा कारखान्यात केली. यानंतर दि. 16 नोव्हेंबर 2019 रोजी कारखान्यातून या वाघिणी आणि इंजिन्सला बाहेर काढण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय आरडीएसओ यांनी 132 किमी प्रतितास या वेगापर्यंत वेगवेगळ्या गतींच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये वाघिणींचे, इंजिनाचे कंपन, दोलन यांचे परीक्षण करण्यात आले. या सर्व चाचण्यांमध्ये हे इंजिन यशस्वी ठरले. त्यानंतर या रेल्वे इंजिनाने दि. 18 मे, 2020 रोजी दीनदयाळ उपाध्याय स्टेशन ते शिवपूर या दरम्यान आपला पहिला व्यावसायिक प्रवास केला. या संपूर्ण इंजिनाच्या डिजाईनचे काम चार ते सहा महिने, अशा विक्रमी कमी काळात पूर्ण करण्यात आले आहे. प्रारंभी आलेल्या अडचणी आणि अलिकडच्या काळात कोविड-19 महामारीचा झालेला प्रकोप पाहता भारतीय रेल्वेने उत्कृष्ट कार्य करून आपल्या कामात उत्साह कायम ठेवला. तसेच इंजिन निर्मितीमध्ये येणा-या अडचणी पार केल्या. मधेपुरा कारखान्यामध्ये काम पुन्हा सुरू करण्यासाठी बिहार सरकारकडून परवानगी मिळवण्यात यश मिळवले, त्यामुळे या इंजिनाचे काम होवू शकले.

                                                                       ***** 

B.Gokhale/ S.Bedekar/P.Ko

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625346) Visitor Counter : 290