पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘‘देखो अपना देश’’ वेबिनार मालिकेमध्ये ‘‘ उत्तराखंड: सिंपली हेवन’’ हे 20वे सत्र सादर
Posted On:
18 MAY 2020 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2020
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘‘देखो अपना देश’’ वेबिनार मालिकेमध्ये उत्तराखंड राज्यातल्या पर्यटन क्षमतेविषयी माहिती देवून या राज्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली आहेत. दि. 16 मे रोजी सादर करण्यात आलेल्या या वेबिनारचे हे 20 सत्र होते. ‘‘उत्तराखंड: सिंपली हेवन’’असे शीर्षक या सत्राला देण्यात आले होते. त्यामध्ये उत्तराखंड राज्यातल्या केदार खंड म्हणजेच गढवाल क्षेत्र आणि मनू खंड म्हणजेच कुमाँऊ क्षेत्राविषयी माहिती देण्यात आली. या राज्यांमध्ये गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ, केदारनाथ, हेमकुंड साहिब आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली.
या वेबिनारचे सादरीकरण ख्यातनाम विद्वान, ऐतिहासिक खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय संबंध तज्ञ तसेच जेएनयूचे माजी प्राध्यापक डॉ. पुष्पेश पंत, प्रख्यात लेखक, प्रसिद्ध छायाचित्रकार आणि उत्तराखंडच्या इतिहासाचे जाणकार गणेश सैली आणि ऋषिकेश इथल्या अ स्पेन ॲडव्हेंचर्स चे व्यवस्थापकीय संचालक तसेच प्रमाणित प्रशिक्षक शशांक पांडे यांनी केले. या वेबिनारचे संचालन पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महा संचालिक रूपिंदर ब्रार यांनी केले. यावेळी उत्तराखंड राज्यात ॲडव्हेंचर टुरिझमला साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देता येतील अशी अनेक स्थळे आहेत. त्यांच्या क्षमतांवर वेबिनारमध्ये प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये ऋषिकेश आणि पिथोरागड इथं रिव्हर राफ्टिंग केले जाते. हिवाळी क्रीडा प्रकार तसेच स्किइंग करण्याची सुविधा औली इथं आहे. तर तेहरी धरण आणि कौसानी इथं पॅराग्लायडिंग करण्यात येते. चोपटा आणि पिंडारी ग्लॅशिअर इथं ट्रेकिंग करण्यासाठी अनेक स्थाने आहेत. ऋषिकेश इथं भारतामध्ये सर्वात उंच बंजी जंपिंग करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे या वेबिनारमध्ये अधोरेखित करण्यात आले.
साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद घेण्याबरोबरच उत्तराखंडमध्ये देशातले सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणजे जिम काॅर्बेट नॅशनल पार्क, राजाजी व्याघ्र अभयारण्य आणि युनेस्कोने घोषित केलेले हिमालय क्षेत्रातले जागतिक वारसा स्थळ - नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आहे. यामध्ये दुर्मिळ जातीचे वृक्ष, फुलं, वेली, पक्षी यांचे भंडार आहे.
उत्तराखंडमध्ये ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेण्याचीही सुविधा आहे. यामध्ये अपार संधी आहेत. ज्यांना स्थानिक लोकांमध्ये मिसळायला आवडते त्यांना ‘होम स्टे’चा उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. तसेच पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांची सेवा देणारी मंडळी असल्यामुळे उत्तराखंडच्या आदरातिथ्याचा अनुभव घेता येतो.
उत्तराखंड ही देवभूमी आहे, असं सांगून पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महा संचालिक रूपिंदर ब्रार यांनी या वेबिनारचा समारोप केला. या देवभूमीत सर्व प्रकारचे अनुभव पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे ठरावीत अशी ठिकाणे या राज्यात आहेत. पवित्र तीर्थस्थाने आणि मनमोहन निसर्ग, समृद्ध जैवविविधता तसेच साहसी क्रीडा प्रकार यांनी उत्तराखंडची सहल संस्मरणीय ठरते, असं त्यांनी नमूद केलं.
‘‘देखो अपना देश’’ या वेबिनार मालिकेचे प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती, तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ई-गव्हर्नन्स विभागाच्या सक्रिय समर्थनाने आयोजित करण्यात आली आहे.
ज्या दर्शकांना हे वेबिनार पाहता आले नाही, त्यांच्यासाठी सर्व सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured यावर आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाज माध्यमांच्या हँडलवर उपलब्ध आहेत.
यानंतरचे वेबिनार मंगळवार, दि.19 मे 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता सादर करण्यात येणार आहे. त्याचे शीर्षक ‘फोटोवॉकिंग भोपाल’’ असे आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
https://digitalindia-gov.zoom.us/webinar/register/WN_wLHXyRTGTrK3Vb-ljK8sxQ
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624906)