Posted On:
11 MAY 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2020
कोविड-19च्या विरोधातील लढ्यामध्ये भारत अतिशय खंबीर आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत आहे असे, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञान आणि आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची नवी सुरुवात, नवी चालना’ या डिजिटल परिषदेमध्ये बोलत होते. तंत्रज्ञान विकास मंडळ या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वैधानिक शाखेच्या आणि सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड सारख्या महामारीच्या विरोधात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केलेल्या कामगिरीची डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रशंसा केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रयत्न या एकंदर व्यवस्थेच्या सहकार्याच्या वृत्तीचे दर्शन घडवतात, असे ते म्हणाले. या महामारी विरोधात लढण्यासाठी त्यावरील उपाययोजनांच्या शोधार्थ भारत सरकार, विविध संस्था, शास्त्रज्ञ, स्टार्ट अप्स, उद्योगपती आणि उद्योग अथक प्रयत्न करत आहेत. कोविड-19 आजारावर तातडीचे आणि लागू करता येण्याजोगे उपाय शोधण्यासाठी आपले वैज्ञानिक, आपले उद्योजक आणि आपल्या विविध संस्थांचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याबाबत आपण त्यांची प्रशंसा केलीच पाहिजे, असे हर्षवर्धन म्हणाले. त्यामुळेच नवे शोध लागत आहेत, उद्योगांच्या भागीदाऱ्या होत आहेत आणि संशोधनाला चालना मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. अतिशय कमी कालावधीत देशाला अनेक संशोधकांना नवे टेस्टिंग किट्स, संरक्षक उपकरणे, श्वसन सहाय्यकारी उपकरणे विकसित करण्यासाठी तैनात करता आले, असे त्यांनी नमूद केले.
कोविड-19 तंत्रज्ञानाशी संबंधित तंत्रज्ञान क्षमतांचा आराखडा तयार करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या कोविड-19 कृती दलाची विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांनी उपस्थितांना माहिती दिली. आमच्या सरकारने ‘ मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला अतिशय भक्कम पाठबळ दिले आहे आणि त्यामुळे अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्टार्ट अप्सना कोविड-19 चाचण्या, मास्क, सॅनिटायजर्स, पीपीई आणि व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या यावर्षीच्या संकल्पनेबाबत बोलतांना ते म्हणाले की, आपल्याला या आपत्तीमुळे निर्माण झालेला आर्थिक परिणाम कमी करण्याची आणि स्वयंपूर्णता या नव्या मंत्राचा वापर करून भक्कम उभारी घेण्याची तयारी करण्याची गरज आहे.
अशा प्रकारे आपल्याला तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राला बळकटी देण्याच्या नव्या संधींचा शोध घेण्याचा विचार करता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांचे विशेष व्याख्यान या परिषदेत आयोजित करण्यात आले. संपूर्ण जग परिस्थिती सावरण्यासाठी प्रयत्न करत असताना नव्या युगातील तंत्रज्ञान, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वैद्यकीय आणि उत्पादक तंत्रज्ञान यांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडवू शकते आणि भविष्यात विशेषतः कोविड-19 पश्चात कालावधीमध्ये आपल्या वर्तनात कोणते बदल करू शकते याकडे सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी लक्ष वेधले. आपल्या समोर असलेल्या भविष्यासाठी आणि अतिशय सुसज्ज संशोधन विकास मनुष्यबळासाठी आणि भारताला भविष्यातील आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
विज्ञान तंत्रज्ञान विभागाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, असे सांगत या विभागाचे प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी कोविड-19 च्या खडतर परिस्थितीत समोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या संस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.
या आपत्तीमुळे अनेक क्षेत्रात संशोधन आणि विकासाला चालना दिली असल्यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक भागीदारीने संशोधन आणि विकासाला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. उल्लेखनीय शोधनिबंध, नवनिर्मितीकारक प्रतिकृती, स्टार्ट अप्स आणि उद्योगांमध्ये वाढ होत आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी राष्ट्रीय मोहीमा, कार्यक्रम आणि योजनांची तातडीने अंमलबजावणीची गरज आहे. ज्या ठिकाणी पूर्वीपासून तंत्रज्ञान उपाय उपलब्ध नसतील त्या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासावर अधिक चांगल्या प्रकारे भर दिला पाहिजे. तो अधिक लक्ष्य केंद्रित, परिणामकारक आणि उद्योगांशी अतिशय जवळचा संबंध असलेला असला पाहिजे. आता मिळालेल्या धड्यांचा उपयोग आपल्याला यापुढील काळात शाश्वत विकास, हवामानबदल, उद्योग 4.0, सूक्ष्मजीव प्रतिबंध इत्यादींसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी या महामारीला तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर उचललेल्या पावलांची आणि भविष्यातील आव्हानांची माहिती दिली. भारताने या आव्हानाला ज्या प्रकारे तोंड दिले आहे त्याची डॉ. स्वामीनाथन यांनी प्रशंसा केली. सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी, सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर, टीडीबीचे सचिव डॉ. नीरज शर्मा हे देखील या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी हर्षवर्धन यांनी ज्या कंपन्यांना टीडीबीने तंत्रज्ञानाचे पाठबळ दिले आहे त्या कंपन्यांच्या व्हर्चुअल प्रदर्शनाचे यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी उद्घाटन केले. अनेक संघटना आणि कंपन्यांकडून या डिजिटल बीटूबी लाउंजच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचे दर्शन घडवण्यात आले.
अशा प्रकारे या परिषदेच्या माध्यमातून वैज्ञानिक, तंत्रज्ञान विशेषज्ञ, सरकारी अधिकारी , मुत्सद्दी, जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगातील इतर मान्यवरांना, संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय उद्योग आणि शिक्षण संस्थांना जागतिक आरोग्यविषयक आपत्ती आणि त्यावरील उपाययोजनांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका आणि विविध उपाययोजनांबाबत परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आणले आहे. या परिषदेमध्ये औषधे व वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्याधुनिक सामग्री- नव्या तंत्रज्ञानाची क्षितिजे, शाश्वत भविष्य आणि जागतिक आर्थिक नेतृत्वासाठी जागतिक नवनिर्मिती आणि तंत्रज्ञान आघाडी याविषयीची तांत्रिक सत्रे होणार आहेत.
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com