रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा 12 मे 2020 पासून श्रेणीबद्ध पद्धतीने अंशतः सुरु होणार


विशेष गाड्यांच्या पंधरा जोड्या (तीस गाड्या) चालविल्या जाणार

या सेवा श्रमिक विशेष व्यतिरिक्त असतील.

सध्या सुरू झालेल्या विशेष गाड्यांमध्ये फक्त वातानुकूलित वर्ग म्हणजेच प्रथम, द्वितीय व तृतीय एसी असतील.

आयआरसीटीसी संकेतस्थळाद्वारे केवळ ऑनलाइन ई-तिकिट मिळेल.

जास्तीत जास्त आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) जास्तीत जास्त 7 दिवसांचा असेल.

प्रवाशांना स्वतःचे खाद्यपदार्थ आणि प्यायचे पाणी नेण्यास प्रोत्साहित केले जाते.

स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचेल.

गाडीमध्ये चादर, रग्ज, आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांना स्वत: चादर आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या हालचालीसाठी तसेच रेल्वे स्थानकात प्रवाशांची ने-आण करणार्‍या वाहन चालकास ई-तिकीटाच्या आधारे परवानगी असेल.

Posted On: 11 MAY 2020 7:05PM by PIB Mumbai

 

 रेल्वे मंत्रालयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि गृह मंत्रालय (एमएचए) यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतला आहे की भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा 12 मे 2020 पासून श्रेणीबद्ध पद्धतीने सुरु करण्यात येईल. जोडपत्रात नमूद केलेल्या तपशीलांनुसार विशेष गाड्यांच्या  पंधरा जोड्या  (तीस गाड्या) चालवल्या जातील. (लिंक खाली दिलेली आहे)

अडकलेल्या लोकांसाठी 1 मे 2020 पासून चालविण्यात येत असलेल्या विशेष श्रमिक गाड्यांव्यतिरिक्त ही सेवा आहे.

सर्व मेल / एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द असतील.

सध्या सुरू झालेल्या या विशेष गाड्यांमध्ये फक्त वातानुकूलित वर्ग म्हणजेच प्रथम, द्वितीय व तृतीय एसी असतील. ‘विशेष गाड्यांसाठी’चे तिकिटाचे दर हे नियमित वेळापत्रकानुसार असलेल्या राजधानी गाड्यांइतकेच (खानपान शुल्क वगळता) लागू असतील.

केवळ ऑनलाईन ई-तिकीट आयआरसीटीसी संकेतस्थळाद्वारे किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन ई-तिकीट काढता येईल. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘दलालामार्फत (आयआरसीटीसी दलाल आणि रेल्वे दलाल दोघे) तिकिट आरक्षित  करण्यास मनाई आहे. जास्तीत जास्त आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) जास्तीत जास्त 7 दिवसांचा असेल.

केवळ पुष्टी केलेले ई-तिकिट आरक्षित केले जातील. आरएसी / प्रतीक्षा यादीचे तिकिट आणि तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून दिलेली तिकिटे ग्राह्य धरली जाणार नाहीत. अनारक्षित तिकीट, तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ आरक्षणाला परवानगी नाही. कोणत्याही अनारक्षित तिकिटांना (यूटीएस) परवानगी दिली जाणार नाही.

तिकिटाच्या भाड्यात कोणतेही खानपान शुल्क समाविष्ट केले जाणार नाही. आगाऊ जेवण आरक्षित करण्याची तसेच ई-खानपान सेवेची तरतूद नसेल. तथापि, आयआरसीटीसी पैसे घेऊन मर्यादित खाद्यपदार्थ आणि सीलबंद पाण्याच्या बाटल्या पुरविण्याची तरतूद करेल. या संदर्भातील माहिती तिकिट आरक्षणाच्यावेळी प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

प्रवाशांना स्वतःचे खाद्यपदार्थ आणि प्यायचे पाणी नेण्यास प्रोत्साहित केले जाते. पैसे आकारून कोरडे खाण्यास तयार अन्न आणि बाटलीबंद पाणी गाड्यांमध्ये मागणीनुसार दिले जाईल.

सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी केली जाईल आणि केवळ रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश करण्याची / चढण्याची परवानगी आहे.

या विशेष सेवांनी प्रवास करणारे प्रवासी खालील खबरदारी बाळगतील.

(अ) केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.

(ब)  सर्व प्रवाशांनी गाडीत चढताना तसेच प्रवासादरम्यान चेहऱ्यावर मास्क घातलेले असावेत.

(क) स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचणे आवश्यक आहे. केवळ रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

(ड)  प्रवाशांनी स्थानकावर तसेच रेल्वेमध्ये सुरक्षित अंतर नियमांचे पालन केले पाहिजे.

(ई)  त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर तेथील राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन प्रवाशांना करावे लागेल.

गाडी सुटण्याच्या आधी 24 तासांपर्यंत ऑनलाईन आरक्षण रद्द करण्याची परवानगी असेल. गाडी सुटण्यापूर्वी 24 तासापेक्षा कमी कालावधीत आरक्षण रद्द करण्याची परवानगी नाही. आरक्षण रद्द करण्याचे शुल्क भाड्याच्या 50 टक्के असेल.

प्रवासी समोरासमोर येऊ नयेत म्हणून रेल्वे स्थानकात शक्य तितकी आत-बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे ठेवण्याच्या सूचना रेल्वे परिमंडळाना देण्यात आल्या आहेत. सुरक्षित शारीरिक अंतर नियम आणि सुरक्षा, संरक्षण तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना रेल्वे परिमंडळाना दिल्या जातील.

सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करुन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गाडीमध्ये चादर, रग्ज, आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांना स्वत: चादर आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी एसी कोचमधील तापमान योग्य प्रकारे नियमित केले जाईल.

फलाटावर कोणतेही स्टॉल / बूथ उघडले जाणार नाहीत. कोणत्याही गाडीच्या बाजूने विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रवासादरम्यान कमी सामान नेण्याचा सल्ला प्रवाशांना दिला आहे.

गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांना तसेच रेल्वे स्थानकात प्रवाशांची ने-आण करणार्‍या वाहन चालकास पुष्टी केलेल्या ई-तिकीटाच्या आधारे स्थानकावर परवानगी असेल.

जोडपत्राची लिंक

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623063) Visitor Counter : 328