कृषी मंत्रालय

लॉकडाउन सुरू झाल्यापासून कृषी बाजारपेठेत दुप्पट आवक


गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये मंडईमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक;

16 मार्चच्या तुलनेने कांद्याची आवक सहापट वाढली बटाटा आणि टोमॅटो यांची आवक दुप्पट

डाळी आणि बटाटा पिकांच्या काढणीचे काम जवळपास पूर्ण; ऊस, गहू आणि रब्बी हंगामातल्या कांद्याचे पीक उत्तम असून पूर्णतेच्या मार्गावर

Posted On: 23 APR 2020 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  एप्रिल 2020

 

भारत सरकारच्या वतीने कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने लॉकडाउनच्या काळामध्ये कृषी कामे व्यवस्थित पार पाडता यावीत यासाठी अनेक उपाय एप्रिल राबविण्यात येत आहेत. कृषी विभागाने राबवलेल्या योजनांची ताजी माहिती पुढील प्रमाणे आहे –

  1. देशभरातल्या 2587 प्रमुख कृषी बाजारपेठांपैकी, 1091 बाजारपेठांचे कामकाज लॉकडाउन काळाच्या आधी- दि.26 मार्च 2020 पर्यंत सुरू होते. या संख्येमध्ये वाढ होवून दि. 21 एप्रिल, 2020 पासून 2069 कृषी बाजारपेठांचे कामकाज सुरू झाले आहे.
  2. 16 मार्च,2020 च्या तुलनेमध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो यासारख्या भाज्यांची आवक दि. 21 एप्रिल, 2020 रोजी अनुक्रमे 622 टक्के, 187 टक्के आणि 210 टक्के वाढल्याचे दिसून आले आहे.
  3. रब्बी हंगाम-2020 मध्ये सध्या डाळी, तेलबिया यांना किमान समर्थन मूल्य देवून देशातल्या 20 राज्यांमध्ये खरेदी सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत नाफेड, एफसीआय यांनी 1,73,064.76 मेट्रिक टन डाळींची आणि 1,35,993.31 मेट्रिक टन तेलबियांची खरेदी केली आहे. यासाठी 1447.55 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. तर त्याचा लाभ 1,83,989 शेतकरी बांधवांना झाला आहे.
  4. आगामी पावसाळ्याचा लाभ घेण्यासाठी राज्यांनी राष्ट्रीय बांबू अभियानाअंतर्गत उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये उत्तराखंडमधल्या पिथोरागड जिल्ह्यात बांबूच्या रोपवाटिकेत रोपे तयार करण्यात आली आहेत. यावेळी रोपे तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांना मास्क, भोजन आदि सुविधा देण्यात आल्या. गुजरातमधल्या साबरकांठा आणि वंसदा या जिल्ह्यांमध्येही बांबूच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. आसाममधल्या कामरूप जिल्ह्यातल्या दिमोरिया ब्लॉकमधल्या 520 शेतकरी बांधवांनी 585 हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांनी काम सुरू केले आहे.
  5. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) या योजनेचा लॉकडाउन काळात दि. 24मार्च, 2020 पासून आजपर्यंत सुमारे 8.938 कोटी शेतकरी परिवारांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभार्थींना आत्तापर्यंत 17,876.7 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

दि. 22 एप्रिल, 2020 रोजी पिकांच्या काढणीची स्थिती: 

गहू - देशातल्या गहू पिकवणा-या प्रमुख राज्यांमध्ये कापणीची स्थिती अतिशय उत्साहवर्धक आहे. विविध राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात 98-99 टक्के गव्हाची कापणी झाली आहे. तर राजस्थानात 88-89 टक्के, उत्तर प्रदेशात 75-78 टक्के, हरियाणामध्ये 40-45 टक्के, पंजाबात 35-40 टक्के, आणि इतर राज्यांमध्ये 82 ते 84 टक्के गव्हाच्या कापणीचे काम झाले आहे.

डाळी - जवळपास सर्व राज्यांमध्ये डाळींच्या पिकाची कापणी-काढणी पूर्ण झाल्याचा अहवाल आहे.

ऊस - राज्यांनी दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये उसाच्या काढणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये 92 ते 98 टक्के ऊस काढणीचे काम झाले आहे. तर उत्तर प्रदेशामध्ये 80 ते 85 टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

बटाटा - बटाट्याची काढणी पूर्ण झाली असून आता त्याची साठवण प्रक्रिया करण्यात येत आहे.

कांदा - अल्पभूधारक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातल्या रब्बी कांदा पिकाची काढणी जवळपास पूर्ण केली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करणारे शेतकरी सध्या काढणीच्या कामात गुंतले आहेत. साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या कांद्याची काढणी सुरू राहील.

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 


(Release ID: 1617782) Visitor Counter : 241