राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुलियाना येथे एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
20 NOV 2023 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (20 नोव्हेंबर 2023) ओदिशा मध्ये मयूरभंज जिल्ह्यातील कुलियाना येथे एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना राष्टपती म्हणाल्या की, त्यांच्या लहानपणी त्यांच्या घराजवळ शाळा नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी घरापासून लांब जावे लागले. त्या म्हणाल्या की त्या वेळी घराजवळ शाळा नसल्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू झाल्यामुळे आता स्थानिक मुलांना शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, शिक्षण ही आर्थिक आणि सामाजिक कल्याणाची गुरुकिल्ली आहे, आणि त्यांनी पालकांना असे आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे.
मुलांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील् सर्वसामान्यच होती. केवळ शिक्षणामुळे त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. शिक्षणामुळेच तुम्हाला यश मिळेल, आणि सुशिक्षित असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या विकासाबरोबरच देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीलाही हातभार लावू शकाल, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत सरकारने आदिवासी बहुल भागात रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, शिक्षण, आरोग्य यासारख्या इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध मंत्रालयांमार्फत बहुआयामी योजना सुरू केल्या आहेत. आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी देशभरात 700 पेक्षा जास्त एकलव्य मॉडेल निवासी शाळा स्थापन केल्या जात आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
त्या म्हणाल्या की, या शाळांमध्ये भारतातील 3.5 लाखांहून अधिक आदिवासी विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील आणि समाज आणि देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1978226)
आगंतुक पटल : 155