गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय युवा परिषद 2023- "भारताच्या शहरांच्या मुशीतून निघालेली युवा शक्ती म्हणजे बावनकशी सोने"

Posted On: 14 MAR 2023 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

राष्ट्रीय युवा परिषद 2023 तरुणांना एकत्र येऊन हवामान बदल, भविष्यातील कामाच्या संधी आणि लोकशाहीमधील तरुण, यासारख्या विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, अशी प्रशंसा केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप एस. पुरी यांनी केली आहे.     

नगर विकास क्षेत्रामधील तरुणांच्या नवोन्मेषाचा अंतर्भाव असलेल्या अनेक ज्ञानाधारित उत्पादनांचे पुरी यांनी अनावरण केले. राष्ट्रीय युवा परिषद 2023 (एनवायसी 2023) चे आयोजन करण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, राष्ट्रीय नगर विकास संस्था आणि युवाशक्ती यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करतानाच   युवा शक्तीमुळे भारत 2047 पर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्मार्ट सिटी मिशन आणि सरकारी विभागांमधील अग्रगण्य नवोन्मेष यामधील तरुणांची महत्वाची भूमिका विषद करताना पुरी म्हणाले की, भारताच्या शहरी लोकसंख्येचे राहणीमान सुलभ व्हायला मदत करण्यासाठी चाकोरीबाहेरच्या उपाययोजना लागू करण्यासाठी, त्यांना विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहन देत  जोपासना करण्यात आली.तरुणांना ठराविक लक्ष्य साधणारे शिक्षण आणि सहकार्याच्या संधी देणाऱ्या आणि त्यांचा व्यावसायिक विकास आणि रोजगारक्षमता वाढवणाऱ्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) आणि इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप प्रोग्राम (ISCF) या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

टूलीप ने केंद्र सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये अशाच प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत आणि सरकारी यंत्रणां दरम्यान नवोन्मेषाची देवाणघेवाण सुलभ केली आहे.

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली, राष्ट्रीय नगर विकास संस्थेने , गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी मिशनच्या सहयोगाने  आयोजित केलेल्या  राष्ट्रीय युवा परिषद 2023 ला संबोधित करताना ते बोलत होते. U20 आणि Y20 च्या प्राधान्य क्षेत्रांवर विचारमंथन करण्यासाठी आणि उद्याचे उज्ज्वल नेतृत्व घडवण्यासाठी या परिषदेने आज इथे युवा विचारवंतांना एकत्र आणले आहे.  

त्यापूर्वी, गृह निर्माण आणि नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर यांनी, देशाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान देणाऱ्यापैकी एक असलेल्या आपल्या ‘युवा शक्ती’च्या सामर्थ्यावर भर देत, ‘नशा मुक्त भारताच्या’ दिशेने काम करण्याची गरज अधोरेखित केली.

विविध मान्यवर, विविध संस्थांमधील युवा आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत, 2021 आणि 2022 च्या NIUA-NMCG विद्यार्थी प्रबंध स्पर्धेतील विजेत्यांची सादरीकरणे आणि    CPIN चर्चा सत्र झाले. तसेच, "असमान जगात समान भविष्य निर्माण करणे" आणि "युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी माध्यमांची भूमिका" या विषयावर पॅनेल चर्चा सत्र झाले. 

या परिषदेतील प्रश्नमंजुषा आणि वादविवाद स्पर्धा, चर्चा सत्र, हवामान कॅफे आणि विचार प्रवर्तक  चर्चा यामधून, तरुणांना लोकशाही कार्यपद्धती समजून घ्यायला मदत झाली. या दोन दिवसांच्या  परिषदेत 10 पेक्षा जास्त संकल्पनेवर आधारित आणि विशिष्ट विषयावर आधारित सत्र, 50 पेक्षा जास्त वक्ते, 100 पेक्षा जास्त शहरी नेते, 300 पेक्षा जास्त प्रदर्शने आणि केस स्टडी, 500 पेक्षा जास्त हवामान बदल क्षेत्रातील नेते यांचा समावेश होता. विज्ञान भवन येथे झालेल्या या परिषदेला 3000 पेक्षा जास्त सहभागींनी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली.

समारोप सत्राला संबोधित करताना भारताच्या अध्यक्षतेखालील G20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी, सर्वांसाठी भरभराटीचे आणि समान भविष्य सुनिश्चित करण्यासाठी युवा-सुलभ दृष्टीकोन  अंगीकारणे महत्वाचे आहे, याचा पुनरुच्चार केला.   

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906832) Visitor Counter : 351


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu