Economy
सेवांशी संबंधित समस्यांबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Posted On:
09 OCT 2026 4:55PM
• हेलिकॉप्टरमधून प्रवासी वाहतूक
प्रश्न 1. सीट-शेअरिंग तत्त्वावर हेलिकॉप्टरमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठी प्रस्तावित सूट ही, इकॉनॉमी क्लासमधील हवाई प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या विद्यमान सवलतीव्यतिरिक्त आहे का?
उत्तर. होय, विशिष्ट विमानतळांवरून सुरू होणाऱ्या किंवा तिथेच थांबणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील हवाई प्रवासी वाहतुकीसाठी असलेली विद्यमान जीएसटी सवलत सुरू राहील. याव्यतिरिक्त, अशा विमानतळांवरून/कडे जाणाऱ्या सीट-शेअरिंग तत्त्वावरील हेलिकॉप्टर प्रवासी वाहतुकीसाठीसुद्धा ही सवलत लागू होईल.
प्रश्न 2. चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवांनाही ही सवलत लागू होईल का?
उत्तर. नाही, चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवांना प्रस्तावित सवलतीचा लाभ मिळणार नाही. प्रस्तावित सवलत केवळ सीट-शेअरिंग तत्त्वावरील हेलिकॉप्टर प्रवासी वाहतुकीसाठी लागू होत आहे, जी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवांपेक्षा वेगळी आहे.
प्रश्न 3. हेलिपॅडवरून/कडे जाणाऱ्या हेलिकॉप्टर प्रवासी सेवांना या सवलतीचा लाभ मिळेल का?
उत्तर. होय. भारतीय वायुयान अधिनियम, 2024 अंतर्गत 'विमानतळ' या व्याख्येत हेलिपॅडचा समावेश होतो. त्यानुसार, निर्दिष्ट ठिकाणांवरून/ठिकाणांपर्यंत सीट-शेअरिंगच्या तत्त्वावर हेलिकॉप्टरमधून होणारी प्रवासी वाहतूक (ज्यामध्ये हेलिकॉप्टर हेलिपॅडवरून उड्डाण करत असेल त्याचाही समावेश आहे) या सवलतीमध्ये समाविष्ट असेल.
• परदेशी शिपिंग लाइनच्या भारतीय आस्थापनेद्वारे सेवांची आयात
प्रश्न 4. परदेशी शिपिंग लाइनच्या परदेशातील मुख्य कार्यालय/आस्थापनेकडून तिच्या भारतीय आस्थापनेला मोबदल्यासह सेवांची आयात केली जात असल्यास, प्रस्तावित सवलत उपलब्ध आहे का?
उत्तर. नाही. अशा सेवा विनामोबदला पुरवल्या जात असल्यास, सदर प्रस्तावित सवलत केवळ परदेशी शिपिंग लाइनच्या परदेशातील मुख्य कार्यालय/आस्थापनेकडून तिच्या भारतीय आस्थापनेला सेवांच्या आयातीच्या बाबतीतच लागू आहे. मोबदला घेऊन पुरवलेल्या सेवांवर लागू असलेल्या तरतुदींनुसार कर आकारला जाईल.
प्रश्न 5. प्रस्तावित सवलतीच्या उद्देशांसाठी “परदेशी कंपनी” म्हणजे काय?
उत्तर. “परदेशी कंपनी” याचा अर्थ कंपनी कायदा, 2013 च्या कलम 2(42) अंतर्गत दिल्याप्रमाणे आहे.
प्रश्न 6. पूर्वीच्या कालावधीसाठी जीएसटी दायित्वावर काय प्रक्रिया केली जाईल?
उत्तर. पूर्वीच्या कालावधीसाठी, अशा व्यवहारांवरील जीएसटी प्रक्रिया “जसे आहे तसे” या तत्त्वावर नियमित केली जाईल, कारण ही सवलत संबंधित अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपासून लागू होईल. याचा अर्थ असा की करदात्यांनी पूर्वीच्या कालावधीसाठी आधीच स्वीकारलेली कर स्थिती मान्य केली जाईल. तसेच ज्या प्रकरणांमध्ये जीएसटी भरला गेला आहे, अशा रकमेचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
प्रश्न 7. परदेशी शिपिंग लाईन्ससाठी असलेली सवलत परदेशी एअरलाइन्सच्या प्रक्रियेशी समानता आणते का?
उत्तर. होय. ही सवलत परदेशी शिपिंग लाईन्स आणि परदेशी एअरलाइन्सच्या जीएसटी प्रक्रियेत समानता आणते, जेव्हा त्यांच्या भारतीय आस्थापनांना त्यांच्या परदेशी आस्थापनांकडून अशा सेवा मिळतात, ज्या विहित अटींच्या अधीन राहून विनामोबदला प्रदान केल्या जातात.
• इलेक्ट्रिक वाहन (EV) प्रवासी वाहतूक / भाडे सेवा
प्रश्न 8. प्रवासी/मालवाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतूक सेवा आणि (ऑपरेटरसह) इलेक्ट्रिक वाहनांच्या भाडे सेवांवरील जीएसटी आकारणी, पूर्वी पारंपरिक मोटार वाहने वापरणाऱ्या संबंधित सेवांपेक्षा वेगळी होती का?
उत्तर. प्रवासी वाहतूक सेवा आणि (ऑपरेटरसह) वाहनांच्या भाडे सेवांसाठीच्या पूर्वीच्या जीएसटी तरतुदींमध्ये, विहित दर पर्याय अशा प्रकरणांशी जोडलेले होते, जिथे इंधनाचा खर्च विचारात घेतला जात असे. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी वापरली जाणारी वीज "इंधन" मानली जात नसल्यामुळे, ईव्ही-आधारित प्रवासी वाहतूक आणि भाडे सेवांसाठी तेच दर पर्याय उपलब्ध नव्हते. यामुळे, अन्यथा समान असलेल्या सेवांवर, केवळ वाहन पारंपरिक इंधनावर चालते की विजेवर, या एकाच गोष्टीच्या आधारावर भिन्न जीएसटी आकारणी होत असे.
प्रश्न 9. इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्या ऑपरेटरसह प्रवासी वाहतूक आणि भाडे सेवा; आणि पारंपरिक वाहने वापरणाऱ्या ऑपरेटरसह प्रवासी वाहतूक आणि भाडे सेवा यांच्या जीएसटी आकारणीमधील तफावत दूर केली जात आहे का?
उत्तर. होय, प्रस्तावित बदलामुळे इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्या प्रवासी वाहतूक आणि भाडे सेवा (ऑपरेटरसह), ज्यामध्ये बॅटरी चार्जिंगचा खर्च मोबदल्यात समाविष्ट आहे, यांच्या जीएसटी आकारणीला, पारंपरिक वाहने वापरणाऱ्या संबंधित सेवांच्या जीएसटी आकारणीशी संरेखित केले जात आहे, ज्यामध्ये इंधनाचा खर्च मोबदल्यात समाविष्ट आहे. त्यानुसार, ईव्ही (EV) वापरणाऱ्या अशा सेवांसाठी लागू होणारे जीएसटी दर, संबंधित पारंपरिक-वाहन सेवांसाठी लागू होणाऱ्या दरांप्रमाणेच असतील.
प्रश्न 10. प्रस्तावित जीएसटी दर इलेक्ट्रिक वाहनांच्या वस्तू म्हणून भाडेपट्टा सेवांना (म्हणजे ऑपरेटरशिवाय) देखील लागू होतो का?
उत्तर. नाही. यामुळे ऑपरेटरशिवाय वाहने भाडेपट्ट्याने देण्याच्या/लीजवर देण्याच्या सेवांच्या सध्याच्या जीएसटी आकारणीमध्ये कोणताही बदल होत नाही. अशा सेवांवर मूळ वस्तूंना लागू असलेल्या दरानुसार कर आकारला जाईल.
• मोटार वाहन भाडेपट्ट्यामधील वैधानिक आणि अनुषंगिक वसुली
प्रश्न 11. वाहन लीजिंग व्यवस्थेमध्ये लीज देणाऱ्याने (lessor) लीज घेणाऱ्याकडून (lessee) वसूल केलेल्या नोंदणी शुल्क, रस्ता कर, विमा, फास्टॅग शुल्क आणि इतर वैधानिक किंवा पूरक खर्चांवर कोणता जीएसटी दर लागू होईल?
उत्तर. लीजिंग व्यवस्थेमध्ये लीज देणाऱ्याने लीज घेणाऱ्याकडून वसूल केलेले नोंदणी शुल्क, रस्ता कर, विमा, फास्टॅग शुल्क आणि इतर वैधानिक किंवा पूरक खर्च हे वाहनाच्या लीजिंगच्या एकत्रित पुरवठ्याच्या मूल्याचा भाग असतील आणि त्यावर लीजिंग सेवेसाठी लागू असलेल्या जीएसटी दराने कर आकारला जाईल.
• ईसीओ-सक्षम वाहतूक आणि वितरण सेवा
प्रश्न 12. जीटीए (GTA) द्वारे वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवांसाठी जीएसटी दर काय असतील, जिथे अशा वस्तू ईसीओ (ECO)द्वारे पुरवल्या/मागवल्या जातात?
उत्तर. ज्या प्रकरणांमध्ये जीटीए (GTA) द्वारे वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवा अशा वस्तूंशी संबंधित आहेत, ज्या ईसीओ (ECO) द्वारे पुरवल्या/मागवल्या जातात, तिथे आयटीसी (ITC) शिवाय 5% किंवा आयटीसी (ITC) सह 18% दराने जीएसटी (GST) लागू होईल आणि अशा सेवांसाठी नोंद क्र. 21अ अंतर्गत सवलतीचा लाभ उपलब्ध होणार नाही.
प्रश्न 13. ज्या ईसीओ (ECO) मार्फत वस्तूंची ऑर्डर दिली जाते/पुरवठा केला जातो, तो ईसीओ अशा वस्तूंच्या जीटीए (GTA) द्वारे होणाऱ्या वाहतुकीच्या सेवेसाठी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 9(5) अंतर्गत जीएसटी भरण्यास जबाबदार असेल का?
उत्तर. नाही. ईसीओ मार्फत पुरवठा केलेल्या/ऑर्डर केलेल्या वस्तूंशी संबंधित सेवा पुरवली गेली असली तरी जीटीए द्वारे होणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवेसाठी ईसीओ सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 9(5) अंतर्गत जीएसटी भरण्यास जबाबदार नाही. अशा प्रकरणांमध्ये, लागू असलेला जीएसटी भरण्यास जीटीए जबाबदार असेल.
प्रश्न 14. सदर सेवा ईसीओ द्वारे मागवलेल्या/पुरवलेल्या वस्तूंशी संबंधित नसतील तर अधिसूचना क्र. 12/2017-सीटीआर च्या नोंद 21अ मधील प्रस्तावित बदलाचा, जीटीए द्वारे वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवांवरील कर आकारणीवर परिणाम होईल का ?
उत्तर. नाही. प्रस्तावित बदलामुळे, अधिसूचना क्र. 12/2017-सीटीआर च्या नोंद 21अ अंतर्गत, ईसीओ द्वारे मागवलेल्या किंवा पुरवल्या नसलेल्या वस्तूंच्या संदर्भात, जीटीए द्वारे वस्तूंच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या सवलतीवर परिणाम होणार नाही.
प्रश्न 15. वितरण सेवा ईसीओ द्वारे पुरवलेल्या/मागवलेल्या वस्तूंशी संबंधित असेल, तर अशा सेवेच्या पुरवठ्यासाठी लागू होणारा जीएसटी दर काय असेल?
उत्तर. अशा सेवांवर आयटीसी शिवाय 5% दराने जीएसटी आकारला जाईल.
प्रश्न 16. ईसीओ द्वारे पुरवलेल्या वितरण सेवांसाठी लागू होणारा जीएसटी दर काय असेल आणि अशा प्रकरणांमध्ये जीएसटी भरण्यास कोण जबाबदार असेल?
उत्तर. डिलिव्हरी सेवा प्रदाता नोंदणीसाठी पात्र नसेल, तर आयटीसी (ITC) शिवाय 5% दराने जीएसटी (GST) लागू होईल आणि सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 9(5) च्या तरतुदींनुसार ईसीओ (ECO)असा जीएसटी भरण्यास जबाबदार असेल.
डिलिव्हरी सेवा प्रदाता नोंदणीसाठी पात्र असेल, तर डिलिव्हरी सेवांसाठी लागू असलेल्या तरतुदींनुसार, अशा सेवांवरील जीएसटी डिलिव्हरी सेवा प्रदात्याद्वारे आयटीसी (ITC) शिवाय 5% दराने देय असेल.
प्र. 17. प्रस्तावित बदलांमुळे वैयक्तिक ट्रक मालक/चालकांद्वारे मालाच्या वाहतुकीच्या सेवांवरील जीएसटी आकारणीवर परिणाम होईल का?
उत्तर. नाही. या बदलांमुळे वैयक्तिक ट्रक मालक/चालकांद्वारे मालाच्या वाहतुकीच्या सेवांवरील जीएसटी आकारणीवर परिणाम होत नाही.
वापरकर्त्यांकडून टोल गोळा करण्याचा आणि तो योग्य ठिकाणी लावण्याचा अधिकार प्रदान करणे
प्र. 18. टोल-ऑपरेट अँड ट्रान्सफर (TOT) मॉडेल अंतर्गत महामार्ग प्रकल्पांसाठी सवलतदाराने केलेल्या आगाऊ पेमेंटच्या संबंधात प्रस्तावित सवलतीचा काय परिणाम होईल?
उत्तर. प्रवेश, वापर, संचालन, टोल गोळा करणे, मागणी करणे आणि योग्य तो कर आकारणे यांसारखे विशेष अधिकार प्रदान करून सेवा भाड्याने देण्यावर सूट उपलब्ध होईल, जिथे सवलतदाराद्वारे अशा सेवा मिळवण्यासाठी आगाऊ रक्कम भरली जाते. त्यामुळे, टीओटी (TOT) मॉडेल अंतर्गत अशा प्रकल्पांमध्ये आगाऊ भरणा केलेली रक्कम या सवलतीमध्ये समाविष्ट असेल.
प्रश्न 19. (प्रश्न क्र. 19 मध्ये नमूद केलेल्या) विशेष अधिकार प्रदान करण्याच्या सेवा, टोल भरून पूल/रस्त्यावर प्रवेश देण्याच्या सेवांपेक्षा वेगळ्या आहेत का?
उत्तर. होय, दोन्ही वेगवेगळ्या सेवा आहेत. टोल शुल्कासाठीची नंतरची सेवा अधिसूचना क्रमांक 12/2017 – सीटी (दर) च्या नोंद क्र. 23 अंतर्गत आधीच सूटपात्र आहे.
प्रश्न 20. सवलतदाराने दिलेली रक्कम आगाऊ नसून नियतकालिक असल्यास जीएसटीचा काय परिणाम होईल?
उत्तर. प्रश्न क्रमांक 19 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष अधिकार प्रदान करण्याच्या सेवा मिळवण्यासाठी सवलतदाराने केलेल्या अशा नियतकालिक देयकांवर देखील सूट उपलब्ध असेल.
प्रश्न 21. असे अधिकार (प्रश्न क्र. 19 मध्ये नमूद केल्याप्रमाणे) खाजगी संस्थेद्वारे प्रदान केले गेले असतील तर सूट उपलब्ध आहे का?
उत्तर. नाही, सूट केवळ अशा प्रकरणांमध्येच उपलब्ध असेल जिथे असे अधिकार सरकार, स्थानिक प्राधिकरण, शासकीय प्राधिकरण किंवा सरकारी संस्थेद्वारे प्रदान केले गेले असतील.
• कर भरण्याची वेळ आणि परिचालन व देखभाल सेवांचे मूल्यांकन
प्रश्न 22. परिचालन आणि देखभाल सेवांच्या(O&M) कर भरण्याच्या वेळेबाबत आणि मूल्यांकनाबाबत प्रदान केलेल्या विशेष प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे?
उत्तर. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या (CGST Act) कलम 148 अंतर्गत प्रदान केलेली विशेष प्रक्रिया अशा नोंदणीकृत व्यक्तीला लागू होते जी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक प्राधिकरण, शासकीय प्राधिकरण किंवा शासकीय घटकासोबत TOT सवलत करारांतर्गत सवलतधारक असते, जिथे सवलतधारकाला रस्ता किंवा महामार्गांचे परिचालन आणि देखभाल (O&M) सेवा पुरवणे आवश्यक असते आणि अशा सेवांचा खर्च संबंधित सवलतधारकाने भरलेल्या आगाऊ सवलत शुल्कातून समायोजित केला जातो.
प्रश्न 23. टीओटी मॉडेलअंतर्गत प्रदान केल्या जाणाऱ्या ओ अँड एम (O&M) सेवांचे मूल्यांकन आणि करआकारणीयोग्यतेसाठी ही विशेष प्रक्रिया का विहित करण्यात आली आहे?
उत्तर. टोल-ऑपरेट-ट्राान्सफर (TOT) प्रकल्पात, जिथे सवलतधारकाने सवलत देणाऱ्या प्राधिकरणाला दिलेला आगाऊ मोबदला हा सवलतधारकाद्वारे प्रदान करावयाच्या परिचालन आणि देखभाल(O&M) सेवांसाठी येणाऱ्या अपेक्षित खर्चासाठी समायोजित केला जातो, तेथे O&M सेवांचे मूल्य सामान्यतः निश्चित करण्यायोग्य नसते.
प्रश्न 24. अशा O&M सेवांच्या संदर्भात GST भरण्याची दायित्वे कधी निर्माण होतात?
उत्तर. सवलतधारकाने गोळा केलेल्या टोलच्या रकमेसाठी ठेवलेल्या एस्क्रॉ खात्यातून (Escrow Account) O&M सेवांसाठी झालेला खर्च ज्या कर कालावधीत वजा केला जातो/आकारला जातो, त्याच कर कालावधीत सवलतधारकाने GST भरणे आवश्यक आहे.
प्रश्न 25. ज्या ओ अँड एम (O&M) सेवांवर GST देय आहे, त्याचे मूल्य कसे निश्चित केले जाते?
उत्तर. ओ अँड एम (O&M) सेवांचे मूल्य निश्चित करण्यासाठी प्रस्तावित केलेली पद्धत सवलतधारकाने O&M सेवांसाठी केलेल्या नियतकालिक वास्तविक खर्चाशी जोडलेली आहे, जो खर्च सवलत देणाऱ्या प्राधिकरणाकडे (NHAI) ठेवलेल्या एस्क्रॉ खात्यातून वजा केला जातो/ आकारला जातो.
उदाहरणार्थ, जर सवलतधारकाने O&M सेवांसाठी प्रत्यक्षात 100 रुपये खर्च केले असतील आणि विशिष्ट कर कालावधीत तीच रक्कम एस्क्रॉ खात्यातून वजा केली गेली असेल, तर लागू दराने 100 रुपयांवर GST भरला जाईल.
प्रश्न 26. सवलत कालावधीच्या सुरुवातीलाच संपूर्ण ओ अँड एम (O&M) घटकावर GST भरणे आवश्यक आहे का?
उत्तर. नाही. प्रस्तावित अधिसूचनेअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये, संबंधित कर कालावधीत एस्क्रॉ खात्यातून आकारण्यात आलेल्या/ वजा केलेल्या प्रत्यक्ष O&M खर्चाच्या मर्यादेपर्यंत, CGST कायद्याच्या कलम 148 खालील विशेष प्रक्रियेनुसार O&M सेवांवर GST भरणे आवश्यक असेल.
प्रश्न 27. हा विशेष नियम किंवा प्रक्रिया रस्ते किंवा महामार्गांच्या प्रत्येक ओ अँड एम (O&M) कंत्राटाला लागू होते का?
उत्तर. नाही, ही विशेष प्रक्रिया केवळ अशाच ठिकाणी लागू होते जिथे नोंदणीकृत व्यक्ती ही टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) सवलत कराराअंतर्गत सवलतधारक आहे आणि सवलत कालावधीत रस्ता किंवा महामार्गाची O&M सेवा पुरवणे आवश्यक आहे, तसेच जिथे O&M खर्च सवलतधारकाने सवलत देणाऱ्या प्राधिकरणाला दिलेल्या आगाऊ रकमेतून समायोजित केला जातो.
विशिष्ट सेवांच्या पुनर्विक्रेत्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट
प्रश्न 28. ज्या काही विशिष्ट सेवांवर 5% दराने (विना ITC) कर आकारला जातो आणि जिथे पुरवठ्याच्या पुढील टप्प्यांवर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) सध्या ब्लॉक आहे, अशा सेवांच्या पुनर्विक्रेत्याला ITC मिळण्याची परवानगी दिली जाईल का?
उत्तर. होय. 5% दराने करपात्र असलेल्या विशिष्ट सेवांच्या बाबतीत, जिथे समान श्रेणीची इनपुट सेवा ही समान श्रेणीची आउटपुट सेवा पुरवण्यासाठी वापरली जाते, तेथे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ब्लॉक असल्यामुळे होणारा करावरील कराचा प्रभाव रोखण्यासाठी अशा सेवांच्या पुनर्विक्रेत्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळण्याची परवानगी दिली जाईल.
प्रश्न 29. अशा कोणत्या सेवा आहेत ज्यांवरील इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वरील बंदी हटवली जाणार आहे?
उत्तर: ही सवलत खालील पुनर्विक्री (reselling) सेवांना लागू होईल
- प्रति युनिट प्रति दिवस 7,500 रुपयांपर्यंतच्या हॉटेलमध्ये वास्तव्याच्या सेवा;
- रेस्टॉरंट आणि आउटडोअर केटरिंग सेवा; आणि
- म/फिटनेस सेवा.जि
प्रश्न 30. जेथे GST 5% दराने (विना ITC) लागू आहे, तेथे आता असे सर्व इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळण्याची परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे का?
उत्तर: नाही, प्रवासी वाहतूक, टूर ऑपरेटर सेवा आणि मोटार वाहन भाड्याने देण्याच्या सेवांसाठी जशी परवानगी देण्यात आली आहे, तशाच प्रकारे केवळ समान श्रेणीतील इनपुट सेवेशी संबंधित मर्यादित इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळण्याची परवानगी दिली जाईल.
सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड संघटनेने(SPFO) उपलब्ध केलेल्या सेवा
प्रश्न 31. SPFO साठी कोणत्या सेवांवर सवलत देण्यात आली आहे?
उत्तर: EPFO आणि CMPFO साठी सध्या उपलब्ध असलेल्या सवलतींच्या धर्तीवर, सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट, 1966 द्वारे नियंत्रित व्यक्तींसाठी 'सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड स्कीम'चे प्रशासन करण्यासाठी सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (SPFO) पुरवलेल्या सेवांवर करसवलत देण्यात येत आहे.
संशोधन आणि विकास सेवा
प्रश्न 32. GST सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कार्य संशोधन आणि विकास (R&D) स्वरूपाचे आहे की सल्लागार स्वरूपाचे आहे, हे कसे ठरवले जाईल?
उत्तर: संशोधन आणि विकास सेवांना सल्लागार सेवांपासून वेगळे करण्यासाठी, आयकर कायदा, 1961 च्या कलम 35 च्या उप-कलम (1) च्या खंड (ii) किंवा (iii) अंतर्गत अधिसूचित केलेल्या संबंधित शासकीय संस्था , संशोधन संस्था, विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर पात्र संस्थेच्या प्रमुखांवर एक प्रमाणपत्र जारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केलेले काम हे संशोधन आणि विकासाच्या (R&D) स्वरूपातील आहे आणि सल्लागार स्वरूपाचे नाही, याची माहिती प्रमाणपत्रातून मिळेल. तसेच, क्षेत्र अधिकाऱ्यांनी अशा संशोधन आणि विकास सेवांवरील कराच्या सवलतीच्या दाव्यासाठी हे प्रमाणपत्र मुख्य आधार म्हणून स्वीकारावे, असे प्रस्तावित आहे.
ही यंत्रणा संशोधनाला पाठबळ देण्यासाठी आणि सवलतीचा लाभ घेताना अनुपालन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
प्रश्न 33. संशोधन आणि विकास सेवांसाठी सवलतीचा दावा केला जातो अशा प्रत्येक प्रकरणात स्वयं-प्रमाणन सादर करणे आवश्यक आहे का?
उत्तर. जेव्हा जेव्हा अशा सवलतीचा दावा केला जातो, तेव्हा संबंधित शासकीय संस्था, संशोधन संस्था, विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर पात्र संस्थेच्या प्रमुखांनी स्वयं-प्रमाणन जारी करणे आवश्यक आहे. तथापि, हे प्रमाणपत्र मासिक विवरणपत्रासोबत सादर करण्याची आवश्यकता नाही. हे प्रमाणपत्र संबंधित संस्था/संघटना/घटकाने आपल्या नोंदींमध्ये जतन करून ठेवणे आवश्यक आहे. कर अधिकाऱ्यांकडून छाननी, लेखापरीक्षण , तपास इत्यादी दरम्यान मागणी केल्यासच ते सादर करणे आवश्यक आहे.
प्रश्न 34. संशोधन आणि विकास उपक्रमांच्या संदर्भात स्वयं-प्रमाणन सादर करण्यासाठी कोणताही विशिष्ट नमुना विहित करण्यात आला आहे का?
उत्तर. अशा स्वयं-प्रमाणनासाठी कोणताही विशिष्ट नमुना विहित केलेला नाही.
कॉफी क्युअरिंग सेवा
प्रश्न 35. कॉफी क्युअरिंग म्हणजे काय?
उत्तर. कॉफी कायदा, 1942' नुसार, क्युअरिंग म्हणजे कच्च्या कॉफीला बाजारात विकण्यासाठी तयार करण्याच्या उद्देशाने तिच्यावर पल्पिंग( गर काढणे) व्यतिरिक्त केलेल्या यांत्रिक प्रक्रिया होय. कॉफी क्युअरिंगमध्ये कॉफीच्या बिया सुकवणे, टरफले काढणे, साफसफाई, वर्गवारी , प्रतवारी आणि पॉलिश करणे यांसारख्या प्रक्रियांचा समावेश असू शकतो.
प्रश्न 36. कॉफी क्युअरिंगची प्रक्रिया सध्याच्या कर सवलतीअंतर्गत येत नाही का?
उत्तर. सध्याच्या सवलतीअंतर्गत, शेतमालावर केल्या जाणाऱ्या सुकवणे, साफसफाई, क्युअरिंग, वर्गवारी आणि प्रतवारी यांसारख्या विशिष्ट प्रक्रियांना त्या शेतावर पार पाडल्या गेल्या असल्यास करातून सूट आहे.
मात्र, हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे कॉफी क्युअरिंगची कामे साधारणपणे शेतात करता येत नाहीत आणि ती बहुधा कॉफी क्युअरिंग कारखान्यांमध्ये केली जातात. कॉफी बाजारात विकण्यायोग्य बनवण्यासाठी ही एक मध्यस्थ प्रक्रिया आहे आणि यामुळे कॉफीच्या बियांचे मूळ स्वरूप बदलत नाही. त्यामुळे, कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कॉफी क्युअरिंग सेवांसाठी विशेष कर सवलत दिली जात आहे
प्रश्न 37. या सवलतीची व्याप्ती काय आहे?
उत्तर. ही सवलत विशेषत्वाने कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कॉफी क्युअरिंगच्या सेवांसाठीच आहे. यात भाजणे किंवा इतर प्रक्रियांसाठी सवलत लागू होत नाही, ज्या कॉफी क्युअरिंगच्या स्वरूपात येत नाहीत.
प्रश्न 38. कॉफी इस्टेट/ मळ्यामध्येच कॉफी क्युअरिंगचे काम केले असल्यास ही सवलत मिळेल का?
उत्तर: होय. कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कॉफी क्युअरिंग सेवांवरील सवलत ही क्युअरिंग कॉफी इस्टेट/ मळ्यातच केले गेले आहे की वेगळ्या क्युअरिंग कारखान्यात, याच्याशी संबंध न ठेवता लागू होईल.
प्रश्न 39. कॉफी क्युअरिंग सेवांना मिळालेल्या या सवलतीचे मुख्य लाभार्थी कोण असतील?
उत्तर: कॉफी क्युअरिंग प्रक्रिया करणाऱ्याकडून कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या क्युअरिंग सेवांवरील सवलतीचा मुख्य फायदा कॉफी उत्पादक शेतकऱ्यालाच होईल, कारण यामुळे कॉफीवर प्रक्रिया करण्याचा त्यांचा खर्च कमी होईल.
बियाण्यांची साठवणूक आणि वखार (वेअरहाउसिंग) व्यवस्था
प्रश्न 40. बियाण्यांची साठवणूक किंवा वखार व्यवस्थेबाबत काय बदल करण्यात आला आहे?
उत्तर: पेरणीयोग्य असलेल्या बियाण्यांच्या साठवणूक किंवा वखार सेवांसाठी जीएसटीमधून विशेष सूट दिली जात आहे, मग अशी बियाणे 'शेतमाल' या व्याख्येत येतात की नाही याने फरक पडत नाही.
प्रश्न 41. या सवलतीमध्ये कोणत्या बियाण्यांचा समावेश होतो?
उत्तर: संबंधित अधिसूचनेच्या उद्देशासाठी परिभाषित केल्यानुसार ही सवलत केवळ पेरणीसाठी असलेल्या बियाण्यांनाच लागू होईल. पेरणीसाठी नसलेली बियाणे आणि बियाण्यांपासून बनवलेले प्रक्रियाकृत पदार्थ किंवा वापरासाठी, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही गैर-पेरणी वापरासाठी प्रक्रिया केलेली बियाणे यात समाविष्ट असणार नाहीत.
प्रश्न 42. साठवणूक किंवा वखार व्यवस्थेची ही सवलत फक्त कृषी बियाण्यांसाठीच उपलब्ध आहे की सर्व बियाण्यांना लागू आहे?
उत्तर: ही सवलत पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बियाण्यांसाठी उपलब्ध आहे आणि ती केवळ कृषी पिकांच्या बियाण्यांपुरती मर्यादित नाही. या उद्देशासाठी, अधिसूचना क्रमांक 12/2017-सेंट्रल टॅक्स रेटच्या परिच्छेद 2 मध्ये "बियाणे" (seeds) या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार, सदर व्याख्येत येणारी आणि पेरणीसाठी असलेली सर्व बियाणे या सवलती अंतर्गत समाविष्ट आहेत.
प्रश्न 43. पेरणीसाठीच्या बियाण्यांच्या साठवणूक/वखार सेवांना दिलेल्या सवलतीचे मुख्य लाभार्थी कोण असतील?
उत्तर: जीएसटी सवलतीचा हा फायदा पेरणीसाठीच्या बियाण्यांवर साठवणूक/वखार भाडे खर्च करणाऱ्या व्यापारी, शेतकरी आणि इतर व्यवसायांना मिळणे अपेक्षित आहे. या सवलतीमुळे अशा सर्व व्यक्तींचा साठवणूक/वखार व्यवस्थेचा खर्च कमी होईल.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 160547)
आगंतुक पटल : 103
Provide suggestions / comments