• Sitemap
  • Advance Search
Infrastructure

पीएमएवाय-यू : गृहनिर्माण, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाची गाथा

Posted On: 16 SEP 2026 1:05PM

 

प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (पीएमएवाय-यू)  हे शहरी भागात सर्वांसाठी घरे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवले जाणारे महत्वाकांक्षी शहरी गृहनिर्माण अभियान आहे. याअंतर्गत देशभरातील पात्र शहरी कुटुंबांना मूलभूत नागरी सुविधांसह पक्की घरे उपलब्ध करून दिली जातात. ही मोहीम प्रामुख्याने शहरे आणि नगरांमधील ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), एलआयजी (कमी उत्पन्न गट) आणि एमआयजी (मध्यम उत्पन्न गट) श्रेणीतील कुटुंबे आणि झोपडवस्तीवासीयांवर लक्ष केंद्रित करते. पीएमएवाय-यू अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणीला मिळालेले यश लक्षात घेता, 2024 मध्ये पुनर्रचित पीएमएवाय-यू 2.0 सुरू करण्यात आले. महिला आणि इतर असुरक्षित शहरी गटांना लाभ देऊन समावेशकतेवर अधिक भर दिला जात आहे. जिओ-टॅगिंग आणि रिअल-टाइम डॅशबोर्ड सारख्या तंत्रज्ञान-सक्षम प्रणालींनी पारदर्शकता आणि देखरेख मजबूत केली आहे.

 

शहरी आकांक्षाचा पाया

सुरक्षित आणि पक्के घर हा सन्मानजनक जीवनाचा पाया आहे. यामुळे कुटुंबांना स्थिरता आणि संरक्षण मिळते, तसेच अधिक चांगल्या संधींचा पाठपुरावा करण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. दर्जेदार घरांची उपलब्धता केवळ राहणीमानच सुधारत नाही, तर आरोग्य, शिक्षण, आर्थिक सुरक्षा आणि सर्वांगीण कल्याणातही मोलाची भर घालते. शहरी भागातील लाखो कुटुंबांसाठी, कायमस्वरूपी घर म्हणजे केवळ निवारा नव्हे, तर उज्ज्वल आणि अधिक सुरक्षित भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग आहे.

समावेशक विकासाला चालना देण्यात गृहनिर्माणाची परिवर्तनकारी भूमिका ओळखून, जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (पीएमएवाय-यू) सुरू करण्यात आली. या अभियानांतर्गत परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला शहरी विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. गेल्या काही वर्षांत, या योजनेने व्याप्ती, नाविन्यपूर्ण उपाययोजना आणि ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे अशा घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून या योजनेने गृहनिर्माण क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे.

पीएमएवाय-यू : शहरी गृहनिर्माण गरजांना राष्ट्रीय प्रतिसाद

'प्रधानमंत्री आवास योजना-शहरी' (पीएमएवाय-यू) अंतर्गत देशभरातील पात्र शहरी कुटुंबांना मूलभूत नागरी सुविधांसह सर्व प्रकारच्या हवामानात टिकणारी पक्की घरे उपलब्ध करून दिली जातात. ही योजना प्रामुख्याने झोपडपट्टीतील रहिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि मध्यम-उत्पन्न गट (एमआयजी) यांच्या गृहनिर्माणाच्या गरजांवर लक्ष केंद्रित करते. या योजनेअंतर्गत, परवडणाऱ्या घरांची उभारणी आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य दिले जाते. या मोहिमेचा मूळ कालावधी मार्च 2022 पर्यंत होता. तथापि, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विनंतीवरून आणि मंजूर प्रकल्पांची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी, योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आला. तसेच, पीएमएवाय-यू च्या अंमलबजावणीतून मिळालेले ज्ञान आणि अनुभवांच्या आधारे आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन, या योजनेत सुधारणा करण्यात आली आणि सप्टेंबर 2024 मध्ये ‘पीएमएवाय-यू 2.0’ म्हणून सुरू करण्यात आली. ही योजना शहरी भागात अधिक प्रतिसादात्मक आणि समावेशक दृष्टिकोनासह "सर्वांसाठी घरे" ही संकल्पना पुढे नेत आहे.

लाभार्थी कुटुंब- निकष

पीएमएवाय-यू अंतर्गत लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुले आणि / किंवा अविवाहित मुलींचा समावेश आहे. या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर (सर्व प्रकारच्या हवामानात टिकणारे घर) नसावे. कुटुंबातील प्रौढ उत्पन्न मिळवणारा सदस्य, मग त्याची वैवाहिक स्थिती काही असो, एक स्वतंत्र कुटुंब मानला जातो. यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता आवश्यक आहे:

  • त्याच्या किंवा तिच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर नसावे.
  • विवाहित जोडप्याच्या बाबतीत, पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक अथवा दोघे संयुक्तपणे एकाच घराचा लाभ घेऊ शकतात. हे या योजनेअंतर्गत असलेल्या कौटुंबिक उत्पन्नाच्या पात्रतेच्या अटींवर अवलंबून असेल. पात्र लाभार्थी या अभियानाच्या चार स्तंभांपैकी केवळ एकाच घटकाअंतर्गत लाभ घेऊ शकतो.
  • ज्यांच्याकडे 21 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाचे पक्के घर आहे, अशा व्यक्तींच्या घराचा 30 चौरस मीटरपर्यंत विस्तार करून ते सुधारित करण्याचा विचार या योजनेअंतर्गत केला जाऊ शकतो. जर जागा किंवा इतर अडचणींमुळे हे शक्य नसेल, तर संबंधित व्यक्ती पीएमएवाय (यू) अंतर्गत अन्य ठिकाणी घर मिळवू शकते.

पीएमएवाय - शहरी 2.0: पुढील टप्प्याची उभारणी

पीएमएवाय-यू 2.0. भारताच्या परवडणाऱ्या घरांच्या मोहिमेचा पुढचा टप्पा असून, तो पीएमएवाय-यू ने रचलेल्या मजबूत पायावर आधारित आहे. देशातील 1 कोटी अतिरिक्त शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि ही योजना 2024 ते 2029 या कालावधीत ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत, पात्र कुटुंबांना शहरी भागात परवडणारी घरे बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी प्रति युनिट 2.50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. पीएमएवाय-यू 2.0 पात्र लाभार्थ्यांना भाडेतत्वावर परवडणारी घरे उपलब्ध करण्याच्या तरतुदीला देखील समर्थन देते, यामुळे शहरी भारतात विविध प्रकारच्या घरांची गरज पूर्ण करायला सहाय्य होते.  पीएमएवाय-यू 2.0 योजना ईडब्ल्यूएस, एलआईजी आणि एमआयजी अंतर्गत समाविष्ट कुटुंबांसाठी खुली आहे. लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचे निकष खालीलप्रमाणे आहेत:  

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) कुटुंबे: वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत.

  • कमी उत्पन्न गटातील (एलआयजी) कुटुंबे: वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये.

  • मध्यम उत्पन्न गटातील (एमआयजी) कुटुंबे: वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपये.

 

प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय-यू) 2.0 चे चार विभाग

पीएमएवाय-यू च्या अनुभवावर आधारित, शहरी भारतातील विविध गृहनिर्माण गरजा पूर्ण करण्यासाठी पीएमएवाय-यू 2.0 मध्येही चतुर्विध दृष्टिकोन अवलंबण्यात आला आहे.

लाभार्थी-आधारित वैयक्तिक घराचे बांधकाम (बीएलसी)

लाभार्थी-आधारित वैयक्तिक घराचे बांधकाम घटकांतर्गत पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंबांना 2.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करतो. या मदतीतून ते त्यांच्या स्वतःच्या उपलब्ध जमिनीवर, कमाल 45 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळाची नवीन पक्के घर बांधू शकतात.

भागीदारीतील परवडणारी घरे (एएचपी)

एएचपी घटकांतर्गत पात्र ईडब्ल्यूएस लाभार्थ्यांना पक्के घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक किंवा खाजगी संस्था 30-45 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळाची परवडणारी घरे बांधतात. घराच्या खरेदी किमतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून एकत्रितपणे प्रति घर 2.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

परवडणारी भाड्याची घरे (एआरएच)

एआरएच घटकांतर्गत अल्प-मुदतीच्या निवासाची गरज आहे किंवा जे घरे खरेदी करण्यास किंवा बांधण्यास असमर्थ आहेत अशा शहरी नागरिकांना परवडणारी, सन्मानजनक आणि स्वच्छ भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध करून दिली जातात. या घटकात ईडब्ल्यूएस आणि एलआयजी लाभार्थ्यांचा समावेश असून त्यात स्थलांतरित, बेघर, औद्योगिक कामगार, काम करणाऱ्या महिला, बांधकाम कामगार, शहरी गरीब आणि निराश्रित व्यक्तींसह फेरीवाले, रिक्षाचालक, कंत्राटी कर्मचारी इत्यादींचाही समावेश आहे. घरे राहण्यायोग्य बनवण्यासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, आरोग्य केंद्रे इत्यादी आवश्यक पायाभूत सुविधा देखील अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.

व्याज अनुदान योजना (आयएसएस)

आयएसएस घटकांतर्गत पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत पात्र गृहकर्जांवर व्याज अनुदान प्रदान दिले जाते. 1 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर मंजूर आणि वितरित केलेली गृहकर्जे या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी लाभार्थी घर खरेदी, पुनर्खरेदी किंवा बांधकामासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. पाच वर्षांपेक्षा जास्त कर्ज कालावधी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना कमाल 1लाख 80 हजार रुपयांपर्यंत व्याज अनुदान मिळते.

 

पीएमएवाय-यू आणि पीएमएवाय-यू 2.0 ची प्रमुख उपलब्धी

पीएमएवाय-यू चा प्रवास मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे दर्शन घडवतो. 2005 ते 2014 दरम्यान, पूर्वीच्या योजनांअंतर्गत केवळ सुमारे 8 लाख शहरी घरे पूर्ण झाली होती. मात्र, 9 ऑगस्ट 2026 पर्यंत, पीएमएवाय-यू आणि पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत 1.25 कोटी घरे मंजूर झाली आहेत. यापैकी, 1 कोटींहून अधिक घरे पूर्ण करून देशभरातील लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

शहरी गृहनिर्माणाचा समान आणि समावेशक लाभ

शहरी विकासाचे खरे यश हे त्याचे फायदे किती व्यापकप्रमाणात सर्वांपर्यंत पोहोचतात यावर अवलंबून असते. त्यामुळे शहरांमध्ये आणि नगरांमध्ये राहणाऱ्या गरजू आणि असुरक्षित कुटुंबांना सहाय्य देत, या अभियानाच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशकतेला स्थान देण्यात आले आहे.

या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महिला आहेत. पीएमएवाय-यू अंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या नावे घरांची मालकी किंवा सह-मालकी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तरतुदीमुळे महिलांची आर्थिक सुरक्षा मजबूत झाली आहे आणि घरातील निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण झाली आहे.

हे अभियान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि तृतीयपंथी व्यक्तींना गृहनिर्माणाच्या संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देते. विविध लाभार्थी गटांच्या गरजा पूर्ण करून पीएमएवाय-यू ने शहरी विकास अधिक न्याय्य आणि सुलभ बनविण्यात मदत केली आहे.

पीएमएवाय-यू 2.0 विविध लाभार्थी गटांना लक्ष्यित सहाय्य देऊन ही वचनबद्धता कायम राखली आहे. 9 ऑगस्ट 2026 पर्यंत, या योजनेअंतर्गत सुमारे 18.38 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेत घरमालकीच्या संधी आणि गरजू समुदायांसाठी विशेष उपाययोजना यांचा समावेश आहे.

  • मंजूर झालेल्या 18.38 लाख घरांपैकी 14.40 लाख घरे लाभार्थी-आधारित वैयक्तिक घराचे बांधकाम या घटकांतर्गत येतात.
  • भागीदारीतील परवडणारी घरे या घटकांतर्गत 2.48 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत.
  • व्याज अनुदान योजना या घटकांतर्गत 1.36 लाख घरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे या घटकाअंतर्गत 13,046 निवासी घरे मंजूर करण्यात आली आहेत.
  • पीएमएवाय-यू आणि पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या 1.25 कोटी घरांपैकी 1 कोटी घटकांतर्गत घरे महिलांना (कुटुंबप्रमुख महिलेच्या नावाने किंवा संयुक्त मालकीमध्ये) वाटप करण्यात आली आहेत.

या कामगिरीतून गृहनिर्माणाचा लाभ सर्वाधिक गरजूंपर्यंत पोहोचवण्यावर अभियानाचा सातत्यपूर्ण भर स्पष्ट होतो. परवडणारी घरे आणि सर्वसमावेशकता यांचा समन्वय साधत पीएमएवाय-यू अधिक समतोल आणि सक्षम शहरी समुदायांच्या निर्मितीस हातभार लावत आहे.

 

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंमलबजावणी आणि देखरेख

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी गृहनिर्माणाच्या अंमलबजावणीला नवे परिमाण मिळाले आहे. पीएमएवाय-यू अंतर्गत डिजिटल डॅशबोर्ड, जिओ-टॅगिंग आणि एकात्मिक देखरेख प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाधारित साधनांमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक झाली असून प्रकल्पांच्या देखरेखीतही सुधारणा झाली आहे.

  • एकीकृत वेब पोर्टल: पीएमएवाय-यू 2.0 चे एकीकृत वेब पोर्टल हे शहरी भागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी एकल डिजिटल व्यासपीठ म्हणून काम करते. हे पोर्टल पात्र लाभार्थ्यांना गृहनिर्माण सहाय्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते तसेच अर्जांची प्रक्रिया आणि त्यांचा मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देते. हे पोर्टल लाभार्थी, शहरी स्थानिक संस्था , राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांसारख्या प्रमुख घटकांना एकाच व्यासपीठावर आणते. तसेच, हे पोर्टल बांधकामाच्या विविध टप्प्यांवर घरांचे ‘जिओ-टॅगिंग’ करण्यास आणि निधी वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करते, ज्यामुळे योजनेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षम देखरेख सुनिश्चित होते.
  • पीएमएवाय-यू डॅशबोर्ड: हा डॅशबोर्ड प्रमुख कामगिरी निर्देशकांवरील प्रगतीची माहिती रिअल-टाइममध्ये देतो, जो राज्ये, केंद्रशासित प्रदेश, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था/अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, खासदार आणि आमदार, लाभार्थी आणि सर्व संबंधित हितधारकांसाठी उपलब्ध आहे. यामुळे माहितीपूर्ण आणि डेटा-आधारित निर्णय घेणे शक्य होते आणि अंमलबजावणीच्या प्रभावी देखरेखीसाठी मदत होते.
  • जिओ-टॅगिंग: प्रकल्पांचा मागोवा ग्राउंडिंग, पायाभरणी, सुपरस्ट्रक्चर, फिनिशिंग आणि बाह्य विकास, आणि पूर्णता अशा पाच टप्प्यांमध्ये घेतला जातो. या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या देखरेखीमुळे मोठे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतात आणि गुणवत्तेचे निकष पूर्ण करतात याची खात्री पटते .
  • तंत्रज्ञान उप-अभियान (टीएसएम): हे अभियान जलद आणि उच्च-गुणवत्तेच्या गृहनिर्मितीसाठी आधुनिक, पर्यावरणपूरक आणि अभिनव बांधकाम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते. टीएसएम अंतर्गत ‘ग्लोबल हाउसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज – इंडिया’ (GHTC-India) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जगभरातील 54 प्रमाणित तंत्रज्ञानांची निवड करण्यात आली, जी मुख्य प्रवाहातील, जागतिक स्तरावर सिद्ध झालेली आणि आपत्ती-रोधक तंत्रज्ञान म्हणून ओळखली जातात. GHTC-India अंतर्गत निवडलेल्या सहा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून देशातील सहा ठिकाणी ‘लाइट हाउस प्रोजेक्ट्स’  उभारण्यात आले आहेत.
  • तंत्रज्ञान आणि नवोन्मेष उप-अभियान (टीआयएसएम): टीएसएम च्या प्रगतीच्या आधारे , पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत ‘तंत्रज्ञान आणि नवोन्मेष उप-अभियान’ (टीआयएसएम) घरांच्या बांधकामात नवोन्मेषाला चालना देते. हे अभियान शाश्वत गृहनिर्माणासाठी अभिनव रचना, गुणवत्ता हमी आणि ‘हरित इमारत’ मानकांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते. टीआयएसएम विविध भौगोलिक-हवामान क्षेत्रांमध्ये हवामानाशी सुसंगत लेआउट्स आणि इमारत आराखड्यांना सहाय्य करते.
  • तंत्रज्ञान नवोन्मेष अनुदान (टीआयजी): पीएमएवाय-यू 2.0 अंतर्गत एएचपी प्रकल्पांसाठी अतिरिक्त ‘तंत्रज्ञान नवोन्मेष अनुदान’ (टीआयजी) प्रदान करते.  हे अनुदान GHTC-India अंतर्गत अधिसूचित केलेल्या नवोन्मेषी आणि पर्यायी तंत्रज्ञानाच्या वापरास सहाय्य करते.

लाभार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव

‘पीएमएवाय-यू’ चा खरा प्रभाव शहरी भारतातील लाभार्थ्यांच्या जीवनात घडलेल्या परिवर्तनांतूनच उत्तमरित्या समजून घेता येतो. सुरक्षित घरामुळे लाभार्थ्यांची प्रतिष्ठा, स्थिरता आणि आत्मनिर्भरता  कशाप्रकारे बळकट झाली आहे, हे या यशोगाथांमधून दिसून येते.

स्वतःचे घर आणि संधींनी भरलेले भविष्य

आंध्र प्रदेशातील अड्डंकी येथे मंडलापु अनंतलक्ष्मी आपले पती आणि तीन मुलांसह एका छोट्या घरात राहत होत्या, ज्याचे छत तात्पुरत्या स्वरूपाचे होते. या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशींच्या पालनातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर चालत असे आणि स्वतःचे पक्के घर असणे ही त्यांच्यासाठी एक अशक्य गोष्ट वाटत होती. 'पीएमएवाय-यू' (PMAY-U) योजनेअंतर्गत मदत मिळाल्यावर, त्यांनी स्वतःहून घराचे बांधकाम केले आणि आर्थिक अडचणींवर मात केली. या नवीन पक्क्या घरामुळे सुरक्षित स्वच्छता सुविधा उपलब्ध झाल्या, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या दूर झाली आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि कुटुंबाला मुलांच्या भविष्यात गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळाली.

सततच्या दुरुस्तीपासून ते चिरस्थायी स्थिरतेपर्यंत

मेघालयातील नोंगपोह शहरात, लुसीबोन सिंगकली ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असून ती आपल्या वडील आणि बहिणींचा सांभाळ करते. ती एक आशा कार्यकर्ती आहे आणि अननसाची शेती देखील करते. ती एका कच्च्या घरात राहत होती जिथे विशेषतः पावसाळ्यात वारंवार दुरुस्तीची गरज भासत असे. या खर्चामुळे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर अनेकदा ताण येत असे आणि त्याचा परिणाम तिच्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारांवरही होत असे. ‘पीएमएवाय-यू’ योजनेची लाभार्थी बनल्यानंतर, लुसीबोनला एक कायमस्वरूपी, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित घर मिळाले, ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी झाला आणि कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य सुधारले. या बचतीमुळे तिच्या वडिलांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत झाली. कुटुंबाने पर्जन्यजल संचयन पद्धतीचा अवलंब केला आहे, फळझाडे लावली आहेत, एलपीजी जोडणी घेतली आहे आणि एलईडी दिव्यांचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या नवीन घरामुळे संपूर्ण कुटुंबाला मनःशांती मिळाली आहे.

‘सर्वांसाठी घरे’ हा दृष्टिकोन  पुढे नेणे

एखाद्या शहराची कथा ही तिथे राहणाऱ्या लोकांचीच कथा असते, जे त्याला आपले घर मानतात. जसजशी शहरी केंद्रे विस्तारतात आणि विकसित होतात, तसतसे ‘गृहनिर्माण’ हे सर्वसमावेशकता, संधी आणि जीवनमानाचा दर्जा दर्शवणारे एक प्रमुख लक्षण ठरते. ‘पीएमएवाय-यू’ चा प्रवास याच जाणिवेचे प्रतिबिंब आहे. या योजनेने लाखो लोकांपर्यंत घरांची उपलब्धता पोहोचवली आहे जे शहरी विकासाच्या प्रक्रियेत दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिले. या माध्यमातून, देशभरातील असंख्य कुटुंबांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत झाली आहे. नियोजन, देखरेख आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालींचा वापर केल्यामुळे या अभियानाला अधिक बळकटी मिळाली आहे. पीएमएवाय-यू 2.0 द्वारे, प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे सुरक्षित ठिकाण असावे ज्याला ते आपले घर म्हणू शकतील हे सुनिश्चित करण्याचे कार्य हे अभियान अविरतपणे करत आहे.

*** 

नितीन फुल्लुके / राजश्री आगाशे / श्रद्धा मुखेडकर / सुषमा काणे 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Explainer ID: 160161) आगंतुक पटल : 48
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Malayalam , हिन्दी , Bengali , Assamese , Telugu , Kannada