Farmer's Welfare
राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM)
"भारतातील कृषी व्यापाराचा डिजिटल कायापालट"
Posted On:
13 APR 2026 4:37PM
ठळक वैशिष्ट्ये
- मार्च 2026 पर्यंत 23 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधील 1,656 मंडया एकात्मिक करण्यात आल्या आहेत.
- मार्च 2026 पर्यंत 1.80 कोटींहून अधिक शेतकरी, 2.73 लाख व्यापारी आणि 4,724 शेतकरी उत्पादक संस्थांची (FPOs) e-NAM या मंचावर नोंदणी झाली आहे.
- 2016 ते मार्च 2026 दरम्यान 13.25 कोटी मेट्रिक टन मालाचा एकत्रित व्यापार झाला असून त्याचे एकूण मूल्य ₹4.84 लाख कोटी इतके नोंदवले गेले आहे.
- व्यापाराचे मूल्य 2024 मधील ₹3.19 लाख कोटींवरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹4.84 लाख कोटींपर्यंत वाढले आहे, जे व्यापारात झालेली वाढ आणि अधिक सखोल बाजार सहभाग दर्शवते.
- मार्च 2026 पर्यंत, अलीकडील काळात 204.76 लाख मेट्रिक टन कृषी उत्पादनाचा व्यापार झाला असून, तो शाश्वत परिचालनात्मक वेग दर्शवतो.
- e-NAM ऍपद्वारे मोबाईल-आधारित किंमत माहिती सेवांतर्गत 247 वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तावना

शेती हा दीर्घकाळापासून भारताच्या सामाजिक-आर्थिक संरचनेचा एक पायाभूत स्तंभ राहिला आहे, जो देशातील निम्म्याहून अधिक कार्यबळाला आधार आणि त्याच्या विकासाच्या वाटचालीला आकार देत आहे. भारतातील कृषी विपणन ऐतिहासिकदृष्ट्या कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) आराखड्यांतर्गत स्थापन केलेल्या नियमन व्यवस्था असलेल्या मंडयांच्या जाळ्याद्वारे विकसित झाले आहे, ज्यामुळे विविध प्रदेशांमध्ये कृषी वस्तूंच्या संरचित आणि संघटित देवाणघेवाणीला चालना मिळाली आहे.
2016 पूर्वी, कृषी व्यापार मुख्यत्वे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील या मंडया प्रणालींपुरताच मर्यादित होता, जिथे प्रत्येक बाजारपेठेचे नियंत्रण स्वतःच्या नियामक संरचनेद्वारे केले जात असे. एक विकेंद्रित मॉडेल म्हणून, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी (एपीएमसी) स्थानिक व्यापाराला बळकटी दिली, परंतु आंतर-राज्य बाजार एकत्रीकरण आणि व्यापक बाजार उपलब्धताविषयक काही मर्यादाही दिसून आल्या. कृषी उत्पादनाचा विस्तार आणि विविधता वाढत असताना, बाजारपेठा उपलब्ध करून देणारी, कार्यक्षमता सुधारणारी आणि पारदर्शक किंमत निश्चिती सुनिश्चित करणारी अधिक एकात्मिक बाजार संरचना असण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.
या संदर्भात, सरकारने एप्रिल 2016 मध्ये कृषी उत्पादनांसाठी एक एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्यासाठी अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापार मंच म्हणून 'राष्ट्रीय कृषी बाजार' (e-NAM) सुरू केला. आधीपासून अस्तित्वात असलेल्या मंडयांचे डिजिटल एकत्रीकरण करून, e-NAM देशभरातील शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांसाठी अखंड ऑनलाइन व्यापार, पारदर्शक किंमत निश्चिती आणि व्यापक बाजार उपलब्धता सुनिश्चित करत आहे.
एक देश, एक बाजार: e-NAM चे डिजिटल इंजिन
e-NAM च्या डिजिटल परिसंस्थेत वेब पोर्टल, मोबाईल ऍप्लिकेशन, समर्पित हेल्पलाइन, मानवी सहाय्य पायाभूत सुविधा आणि एआय-वापर करणारी गुणवत्ता मूल्यांकन प्रणाली यांचा समावेश असलेली एक बहुस्तरीय रचना आहे. e-NAM शेतकऱ्यांना खरेदीदारांच्या अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण गटापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्यामुळे योग्य किंमत मिळण्याच्या संधी बळकट होतात. हे औपचारिक डिजिटल पेमेंट प्रणालीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे कृषी विपणन परिसंस्थेमध्ये अधिक आर्थिक समावेशकतेसह व्यवहारातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
e-NAM वेब पोर्टल: एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डिजिटल कृषी विपणन
e-NAM पोर्टल (enam.gov.in) कृषी मालाच्या इलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी मंडयांना एका एकीकृत राष्ट्रीय बाजार मंचाशी अखंडपणे जोडून, या व्यवस्थेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डिजिटल कृषी विपणन सुलभ करते. त्याचे विस्तारणारे जाळे वाढते बाजार एकत्रीकरण दर्शवते; ज्यामध्ये जोडलेल्या मंडयांची संख्या 2024 मधील 1,389 वरून वाढून मार्च 2026 पर्यंत 1,656 झाली आहे, जिची व्याप्ती 23 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे.

सुरुवातीपासूनच म्हणजे 2016 पासून, e-NAM मुळे कृषी व्यापारात लक्षणीय वाढ झाली आहे. 2016 ते मार्च 2026 या कालावधीत एकत्रितपणे, या मंचाने 13.25 कोटी मेट्रिक टन शेतीमालाचा व्यापार सुलभ केला आहे, ज्यातून एकूण 4.84 लाख कोटी रुपयांचे व्यापारी उत्पन्नाची निर्मिती झाली. यातूनच या मंचाची विस्तारत चाललेली व्याप्ती आणि यामधील वाढता सहभाग दिसून येत आहे.
शिवाय, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार प्रति मंडई 75 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते, ज्यामुळे मंडयांचे डिजिटल परिसंस्थेशी एकत्रीकरण बळकट होते आणि एकूण बाजार कार्यक्षमता सुधारते. ही वाढ या मंचाशी जोडल्या गेलेल्या हितधारकांच्या वाढत्या संख्येवरूनही दिसून येते. मार्च 2026 पर्यंत, या मंचावर 1.80 कोटींहून अधिक शेतकरी, 2.73 लाख व्यापारी आणि 4,724 शेतकरी उत्पादक संस्थांची (FPOs) नोंदणी झाली आहे, ज्यातून हा उपक्रम कशा प्रकारे विस्तारत चालला आहे ते दिसून येते.
हे पोर्टल कृषी व्यापाराच्या संपूर्ण जीवनचक्राला आधार देते, ज्यामध्ये डिजिटल गेट एंट्री, युनिक आयडेंटिफायरसह लॉट निर्मिती, गुणवत्ता तपासणी , स्पर्धात्मक ऑनलाइन बोली, रिअल-टाइम बिड ट्रॅकिंग, किंमत निश्चिती आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट इलेक्ट्रॉनिक पेमेंट यांचा समावेश होतो.

याव्यतिरिक्त, यामध्ये एका 'लाईव्ह डॅशबोर्ड'चा समावेश आहे जो वस्तू निहाय व्यापाराचे प्रमाण, मंडई-स्तरावरील किमतींचा कल, हितधारकांची नोंदणी आणि आंतर-राज्य व्यापाराचा ओघ यावर रिअल-टाइम माहिती प्रदान करतो, ज्यामुळे पारदर्शकता वाढते आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे शक्य होते.
e-NAM पोर्टलची प्रमुख डिजिटल वैशिष्ट्ये
- सिंगल-विंडो सेवा: मालाची आवक, गुणवत्ता तपासणी, बोली लावणे आणि पेमेंट, सर्व काही एकाच मंचावर.
- युनिक लॉट आयडी ट्रॅकिंग: गेट एंट्रीपासून ते अंतिम विक्रीपर्यंत प्रत्येक लॉटचा मोबाईलद्वारे मागोवा.
- लाईव्ह प्राईस डॅशबोर्ड: वस्तूंच्या रिअल-टाइम किमती, मंडयांमधील आवक आणि व्यापाराचे प्रमाण, जे सर्वांसाठी खुले आहे.
- 12 भाषांमधील इंटरफेस: हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, तेलगू, बंगाली, तमिळ, ओडिया आणि इतर.
- दुय्यम विक्री मॉड्यूल : आधीच खरेदी केलेल्या लॉटची मंचावर पुन्हा विक्री करण्याची व्यवस्था करते.
- आंतर-राज्य व्यापार सुविधा: राज्य एकीकृत परवाना व्यापाऱ्यांना राज्यांच्या सीमांपलीकडे बोली लावण्याची सुविधा देते.
क्लिक्सपासून पिकांपर्यंत: e-NAM आता गतिमान
ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू करण्यात आलेले e-NAM मोबाईल ऍप, व्यापार आणि बाजारपेठेशी संबंधित सेवा मिळवण्यासाठी एक सोपे आणि मोबाईल-फ्रेंडली इंटरफेस प्रदान करून वेब पोर्टलला पूरक ठरते. हे स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत या मंचाची पोहोच वाढवते, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि इतर हितधारकांना बाजारपेठेची माहिती मिळवणे आणि व्यापारात वेळेवर व कोठूनही सहभागी होणे शक्य होते. डिसेंबर 2025 पर्यंत, हे ऍप्लिकेशन 247 अधिसूचित वस्तूंसाठी विनामूल्य किंमत माहिती प्रदान करत आहे, ज्यामुळे माहितीपूर्ण आणि वेळेवर निर्णय घेणे सोपे झाले आहे.
या मंचाच्या प्रगतीमधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे 14 जुलै 2022 मध्ये प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म (पीओपी) चा प्रारंभ झाला होता. तंत्रज्ञान आधारित या ढाच्यामुळे एकीकृत डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून (e-NAM) ई-नाम मोबाईल अप्लिकेशनद्वारे सेवांचा विस्तृत पट एकीकृत झाला आहे. पीओपीद्वारे, वापरकर्ते,लॉजिस्टीक,गोदाम,गुणवत्ता हमी,वर्गवारी आणि पॅकेजिंग,कृषी इनपुट,वित्तीय आणि विमा सेवा,हवामान माहिती,पिक विषयक अंदाज यासारखे सल्लात्मक सहाय्य यासह कृषी मूल्य साखळीमधल्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय हा मंच ई कॉमर्स मंच आणि खाजगी कृषी बाजारपेठ कंपन्या यांना एकत्र आणणे शक्य करत असल्याने बाजारपेठ पोहोच अधिक व्यापक होते आणि संपूर्ण व्यापार आणि संलग्न सेवा बळकट होतात.
उपाययोजनांवर भर : ई- नाम परीसंस्थेमध्ये वापरकर्त्यांना बळ
ई-नाम, शेतकरी, व्यापारी आणि इतर संबंधिताना, समर्पित सहाय्य आणि तक्रार निवारण यंत्रणा पुरविते. (1800 270 0224) या राष्ट्रव्यापी प्राथमिक सहाय्यकारक चॅनेल म्हणून काम करणाऱ्या निःशुल्क हेल्पलाईनद्वारे त्याचबरोबर nam@sfac.in and enam.helpdesk@gmail.com यासारख्या अधिकृत ईमेल आयडी द्वारे, वापरकर्ते सहाय्य प्राप्त करू शकतात.

हा मंच, वापरकर्त्यांना आपल्या शंका आणि तक्रारी थेट पोर्टल द्वारे मांडण्यासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली प्रदान करतो.या एकात्मिक सहाय्यक ढाच्यामुळे, विशेष करून शेतकरी आणि डिजिटल बाजारपेठेत प्रथमच येणाऱ्या वापरकर्त्यांना मुद्यांचे वेळेत निवारण आणि अखंड तंत्र सहाय्य पुरवले जाते.
ई-नाम अंतर्गत ई-पेमेंट : पेमेंट,पारदर्शकता आणि समावेशकता
ई- नाम अंतर्गत ई-पेमेंट प्रणालीमध्ये डिजिटल रचना हा महत्वाचा घटक असतो त्यामुळे कृषी बाजारपेठेत कोणत्याही अडथळ्याविना वित्तीय व्यवहार शक्य होतात. व्यापार आणि पेमेंट तसेच एकीकृत इलेक्ट्रॉनिक कार्यप्रणाली एकत्र आणून हा मंच पारंपारिक मंडीच्या कार्यात परिवर्तन घडवितो आणि व्यवहारांची कार्यक्षमता वाढवितो.या प्रणालीअंतर्गत, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर विक्रीची रक्कम शेतकऱ्याच्या नोंदणीकृत बँक खात्यात थेट जमा होते. त्यामुळे मध्यस्थांवरचे अवलंबित्व कमी होते आणि व्यवहार सुटसुटीत होतो. पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्यामुळे वेळेत, पारदर्शक, आणि सुरक्षित व्यवहार सुनिश्चित होतो.
एनईएफटी, आरटीजीएस,इंटरनेट बँकिंग आणि युपीआय यासह विविध डिजिटल पेमेंट पद्धतीना हा मंच एकत्र आणत असल्याने राज्यांमध्ये त्याचा स्वीकार सुलभ होतो.याशिवाय व्यवहारांचे औपचारिकीकरण करून आणि पडताळणीयोग्य वित्तीय नोंदी तयार करून ई पेमेंट प्रणाली वित्तीय समावेशकतेला प्रोत्साहन देते.या नोंदींमुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक पत आणि इतर वित्तीय सेवांपर्यंत पोहोच सुलभ होते.
ई-एनडब्ल्यूआर आणि ई- नाम एकीकरणाद्वारे कापणी पश्चात पायाभूत सुविधा बळकटीकरण
कापणी पश्चात व्यवस्थापनावर देण्यात येणाऱ्या वाढत्या भरामुळे शास्त्रीय भांडार प्रणाली, प्रभावी बाजारपेठ पोहोच यंत्रणेशी एकीकृत करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाउस रसिट (ई-एनडब्ल्यूआर ) प्रणालीची ई-नाम शी सांगड घालण्यात आली आहे. यामुळे अखंड आणि प्रभावी कृषी विपणन ढाचा शक्य झाला आहे. साठवणूक केलेल्या मालाचे डिजिटल दस्तऐवजीकरण, हस्तांतरण आणि मुद्रीकरण शक्य करून इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाउस रसिट (ई-एनडब्ल्यूआर) प्रणाली,कापणी पश्चात कृषी व्यवस्थापनात लक्षणीय संस्थात्मक सुधारणा आणते. गोदाम (विकास आणि नियमन) कायदा 2007 अंतर्गत सुरु करण्यात आलेली ही प्रणाली सुरक्षित इलेक्ट्रॉनिक साधन म्हणून काम करते ,जी गोदाम विकास आणि नियमन प्राधिकरणाने (डब्ल्यूडीआरए) अधिस्वीकृत केलेल्या गोदामात साठवलेल्या मालाच्या मालकीचे प्रमाणन करते.
पारंपारिक निगोशिएबल गोदाम पावती (एनडब्ल्यूआर) वर आधारित ई-एनडब्ल्यूआर प्रणाली, पारदर्शकता,मागोवा वाढविते आणि हस्तांतरण सुलभ करते त्यामुळे वस्तू प्रत्यक्ष न हलवता त्यांच्या व्यापाराची सुविधा प्राप्त होते. यामुळे साठवण आणि बाजारपेठ पोहोच यांच्यामध्ये महत्वाचा दुवा स्थापित होतो.म्हणूनच ई- एनडब्ल्यूआर शास्त्रीय गोदाम सुविधा आणि मालाचे प्रमाणन सुलभ करते तर ई-नाम,अशा साठवणूक केलेल्या कृषी मालाच्या प्रभावी आणि पारदर्शी व्यापाराकरिता देशव्यापी डिजिटल मंच पुरविते.

या एकीकृत ढाच्यामध्ये शेतकरी,व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आपल्या कृषी मालाची, डब्ल्यूडीआरए अधिस्वीकृत गोदामात साठवण करू शकतात,ई-एनडब्ल्यूआर प्राप्त करू शकतात आणि थेट ई नाम मंचावर विक्री करू शकतात.यामुळे मंडयांमध्ये मालाच्या प्रत्यक्ष वाहतूकीवरचे अवलंबित्व कमी होते त्यामुळे लॉजिस्टिक खर्चात कपात होते,कापणी पश्चात नुकसान कमी होते, त्याचबरोबर नाईलाजाने करावी लागणारी विक्रीही कमी होते.
याशिवाय ई-एनडब्ल्यूआरचा उपयोग संस्थात्मक कर्जासाठी तारण म्हणून करता येतो यातून रोखता वाढते आणि संबंधीताना विक्री कालावधीची कार्यक्षमता वाढविता येते. ई-नाम मूल्य निर्धारण आणि स्पर्धात्मक बोली यंत्रणेशी जोडले गेल्यास यातून बाजारपेठ पोहोच बळकट होते आणि उत्तम मूल्य प्राप्ती सुनिश्चित होते.
ही प्रणाली, प्रमाणित वर्गवारी आणि तपासणी याद्वारे साठवणूक केलेल्या मालाच्या गुणवत्ता आधारित व्यापाराला प्रोत्साहन देते.गुणवत्ता हमी आणि बाजारपेठ पोहोच यांची सांगड घालून ई-एनडब्ल्यूआर, ई-नाम एकात्मता,विश्वास वृद्धिंगत करते, प्रमाणीकरणाला प्रोत्साहन देते आणि अधिक प्रभावी आणि पारदर्शी कृषी बाजारपेठांसाठी योगदान देते.
निष्कर्ष
राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (ई-नाम) म्हणजे भारतातल्या कृषी विपणन क्षेत्राच्या सध्या सुरु असलेल्या कायापालटामधले महत्वाचे पाऊल आहे. राष्ट्रीय स्तरावर मंडया डिजीटली एकीकृत करून आणि पारदर्शक,तंत्रज्ञान आधारित व्यापार सुलभ करून या मंचाने बाजाराशी बंध बळकट केले आहेत त्याचबरोबर शेतकरी आणि इतर संबंधितांसाठी संधीचा विस्तार केला आहे.
याच्या वेब पोर्टल,मोबाईल अप्लिकेशन, प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म (पीओपी) आणि संबंधित पायाभूत सुविधांचा आधार यांचा समावेश असलेल्या एकीकृत डिजिटल परिसंस्थेमुळे मूल्य निर्धारण सुधारले असून, बाजारपेठ पोहोच विस्तारली आहे,डिजीटल व्यवहारांच्या स्वीकाराला प्रोत्साहन मिळाले आहे. इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती (ई-एनडब्ल्यूआर) सारख्या पूरक उपक्रमांनी साठवण, वित्त आणि बाजारपेठ पोहोच यांची जोडणी करून मूल्य साखळी अधिक बळकट केली आहे.
याचे विस्तारणारे प्रमाण, हितधारकांचा वाढता सहभाग आणि व्यापाराचे वाढते प्रमाण यासह ई-नाम अधिक एकात्मिक, प्रभावी आणि पारदर्शक कृषी विपणनाच्या विकासात योगदान देत आहे. विकसित होत जाणारा हा मंच, बाजारपेठ कनेक्टीव्हिटी सखोल करण्याच्या, शेतकऱ्यांसाठी मूल्य प्राप्ती वृद्धिंगत करण्याच्या आणि एकात्मिक राष्ट्रीय बाजारपेठ दृष्टीकोन पुढे नेण्याच्या उत्तम स्थितीत आहे.
***
हर्षल अकुडे/शैलेश पाटील/निलिमा चितळे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Explainer ID: 158252)
आगंतुक पटल : 17
Provide suggestions / comments