• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Technology

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स भविष्याला गती देणाऱ्या ईसीएमएस अंतर्गत पहिल्या 7 प्रकल्पांना ₹5,532 कोटी गुंतवणुकीची मंजुरी

Posted On: 27 OCT 2025 6:12PM

तंत्रज्ञान

 

मुख्य मुद्दे

  • ईसीएमएस अंतर्गत 7 प्रकल्पांना एकूण ₹5,532 कोटींची मंजुरी
  • प्रकल्पांतून ₹44,406 कोटींचे उत्पादन आणि 5,195 रोजगार निर्मिती
  • ईसीएमएस अंतर्गत गुंतवणूक बांधिलकी ₹1.15 लाख कोटींपर्यंत, म्हणजे लक्ष्याच्या दुपटीहून अधिक
  • इलेक्ट्रॉनिक्स हा 2024-25 मध्ये भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात विभाग बनला

प्रस्तावना

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या कथेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे, कारण ₹5,532 कोटी किंमतीच्या प्रकल्पांना इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेतर्गत मंजुरी प्राप्त झाली आहे. हे पहिले सात प्रकल्प देशाच्या वाढत्या घटक परिसंस्थेला नवचैतन्य देणार आहेत, ज्यातून ₹44,406 कोटींचे उत्पादन आणि 5,000 पेक्षा अधिक नवीन रोजगार अपेक्षित आहेत.

या मंजूर प्रकल्पांची घोषणा केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी केली. यातून भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मूल्यशृंखलेला अधिक दृढ करण्याचा सरकारचा संकल्प दिसून येतो. उच्च-मूल्य घटकांच्या उत्पादनासाठी मजबूत देशांतर्गत पाया निर्माण करण्यावर सरकारचे लक्ष केंद्रीत असल्याचेही यावरून स्पष्ट होते.

अलीकडच्या वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने विलक्षण प्रगती साधली आहे आणि 2024-25 मध्ये तिसरे सर्वात मोठे आणि सर्वात वेगाने वाढणारे निर्यात विभाग म्हणून हे क्षेत्र उदयास आले आहे. ईसीएमएस हीच गती पुढे नेत, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक नेतृत्व मिळविण्याच्या देशाच्या उद्दिष्टाकडे अधिक वेगवान वाटचाल करत आहे.

योजनेचा आढावा

इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना 8 एप्रिल 2025 रोजी ₹22,919 कोटींच्या एकूण तरतुदीसह अधिसूचित करण्यात आली. याचे मूल्य सुमारे यूएसडी 2.7 अब्ज एवढे आहे. या योजनेचा कालावधी सहा वर्षांचा असून एक वर्षाचा ऐच्छिक प्रतीक्षा अवधी आहे. देशात इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादनासाठी मजबूत व स्वयंपूर्ण परिसंस्था निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मूल्यशृंखलेतील देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, अधिकाधिक देशांतर्गत मूल्यवर्धन वाढविणे आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स व्यापारात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणे यावर या योजनेचा भर आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक उद्योगाला जागतिक मूल्यशृंखलांशी जोडण्यासाठी देशातच आवश्यक घटक, उपघटक आणि कच्चा माल उत्पादनास प्रोत्साहन देणे हा ईसीएमएसचा उद्देश आहे.

30 सप्टेंबर 2025 पर्यंत योजनेअंतर्गत गुंतवणूक बांधिलकी ₹1,15,351 कोटी इतकी झाली आहे, जी मूळ लक्ष्य ₹59,350 कोटींच्या जवळजवळ दुप्पट आहे. पुढील सहा वर्षांत ₹10,34,751 कोटींचे उत्पादन निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे, जे सुरुवातीच्या अंदाजाच्या 2.2 पट आहे. प्रोत्साहन देयक अंदाजे ₹41,468 कोटी असेल, जे मूळ अंदाज ₹22,805 कोटींच्या 1.8 पट आहे. या योजनेत 1,41,801 थेट रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, जे 91,600 या लक्ष्यापेक्षा खूप जास्त आहे; तसेच अनेक अप्रत्यक्ष रोजगार संधीही निर्माण होणार आहेत.

ईसीएमएस अंतर्गत मंजूर उत्पादनांचा आढावा

पहिल्या मंजुरी संचामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासाठी अत्यावश्यक उच्च-मूल्य इलेक्ट्रॉनिक घटक आणि साहित्यांचा विस्तृत समावेश आहे. हे प्रकल्प स्मार्टफोन, वाहन उद्योग, वैद्यकीय साधने, दूरसंचार आणि औद्योगिक प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुलभ करतील आणि जागतिक मूल्यशृंखलेतील भारताचे स्थान अधिक बळकट करतील.

कॅमेरा मॉड्यूल उपघटक

कॅमेरा मॉड्यूल उपघटक स्मार्टफोन, ड्रोन, वैद्यकीय उपकरणे आणि रोबोट्समध्ये वापरले जातात. ते विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये उच्च-गुणवत्तेची छायाचित्र आणि व्हिडिओ कॅप्चर करतात आणि स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक, सुरक्षा कॅमेरे, वाहन प्रणाली आणि इंटरनेट-संलग्न उपकरणांमध्ये प्रतिमांकन साधन म्हणून कार्य करतात.

मल्टीलेअर पीसीबी

मल्टी लेअर पीसीबी अर्थात बहुस्तरीय मुद्रित परिपथ फलक वाहन उद्योग, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान, वैद्यकीय साधने, दूरसंचार, अंतराळ - संरक्षण आणि औद्योगिक उत्पादनात वापरले जातात. यात अनेक तांब्याचे आणि विद्युतरोधक स्तर असतात, जे छिद्र-वहन मार्गाने जोडलेले असतात.

एचडीआय पीसीबी

एचडीआय पीसीबी अर्थात उच्च-सघनता आंतरजोड फलक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, परिधानयोग्य उपकरणे, वाहन इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय साधने, दूरसंचार, अवकाश व संरक्षण या क्षेत्रांमध्ये वापरले जातात. हे अधिक प्रगत स्वरूपाचे फलक असून यात सूक्ष्म मार्ग, आंधळे आणि गाडलेले मार्ग, अधिक बारीक रेषा आणि कमी अंतर असते.

तांब्याने अच्छादित(लॅमिनेट)

तांबे-आच्छादित पत्रके वाहन उद्योग, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान, दूरसंचार, अवकाश-रक्षा आणि औद्योगिक उत्पादनात वापरली जातात. बहुस्तरीय परिपथ फलकांच्या निर्मितीसाठी हे मूलभूत साहित्य आहे.

पॉलिप्रॉपिलिन फिल्म

पॉलिप्रॉपिलिन पट्टी ही ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान, औद्योगिक उत्पादन, दूरसंचार आणि संगणन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या संधारित्रांच्या निर्मितीत प्रमुख साहित्य आहे.

ईसीएमएस अंतर्गत मंजूर अर्जांचा आढावा

या पहिल्या अर्ज संचामध्ये भारतात उच्च-मूल्य घटक क्षमता निर्माण करण्यासाठी अग्रगण्य देशांतर्गत उत्पादकांचा स्पष्ट संकल्प दिसून येतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेल्या या प्रकल्पांमध्ये ₹5,532 कोटींची गुंतवणूक, ₹44,406 कोटींचे अपेक्षित उत्पादन आणि 5,195 नवीन रोजगारांचा समावेश आहे.

 

Applicant Name

Product

Project Location

Cumulative Investment (₹ crore)

Cumulative Production (₹ crore)

Incremental Employment (Persons)

Kaynes Circuits India Private Limited

Multi-Layer Printed Circuit Board (PCB)

Tamil Nadu

104

4,300

220

Kaynes Circuits India Private Limited

Camera Module Sub-Assembly

Tamil Nadu

325

12,630

480

Kaynes Circuits India Private Limited

HDI PCB

Tamil Nadu

1,684

4,510

1,480

Kaynes Circuits India Private Limited

Laminate

Tamil Nadu

1,167

6,875

300

SRF Limited

Polypropylene Film

Madhya Pradesh

496

1,311

225

Syrma Strategic Electronics Private Limited

Multi-Layer Printed Circuit Board (PCB)

Andhra Pradesh

765

6,933

955

Ascent Circuits Pvt Ltd

Multi-Layer Printed Circuit Board (PCB)

Tamil Nadu

991

7,847

1,535

Total

 

 

5,532

44,406

5,195

 

 

भारताच्या अग्रगण्य निर्यात क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स

इलेक्ट्रॉनिक्स हा 2024–25 मध्ये भारताचा तिसरा सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढणारा निर्यात विभाग बनला आहे, 2021-22 मधील सातव्या स्थानावरून प्रगती करत आर्थिक वर्ष 2025–26 च्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रॉनिक्स निर्यात यूएसडी 22.2 अब्ज इतकी झाली आहे.

2014-15 मध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ₹1.9 लाख कोटी होते, जे 2024–25 मध्ये वाढून ₹11.3 लाख कोटी झाले, म्हणजे सहापट वाढले. याच कालावधीत निर्यात ₹38,000 कोटी वरून ₹3.27 लाख कोटी झाली, म्हणजे आठपटीने वाढली.

मोबाइल उत्पादनाने या बदलात मोठी भूमिका बजावली आहे. 2014–15 मधील ₹18,000 कोटी उत्पादन 2024–25 मध्ये ₹5.45 लाख कोटीवर पोहोचले, म्हणजे 28 पट वाढ. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन निर्माता आहे.

मोबाइल निर्यातीनेही उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे — 2014–15 मधील ₹1,500 कोटी वरून 2024–25 मध्ये ₹2 लाख कोटी — 127 पट वाढ. 2024 मध्ये अॅपलनेच ₹1,10,989 कोटी किंमतीचे आयफोन निर्यात केले. 2025–26 च्या पहिल्या पाच महिन्यांत स्मार्टफोन निर्यात ₹1 लाख कोटीवर पोहोचली.

भारत आता मोबाइल उत्पादनात जवळजवळ स्वयंपूर्ण झाला आहे, पूर्वी बहुसंख्य उपकरणे आयात केली जात असताना आता जवळजवळ सर्व उपकरणे देशातच तयार होतात.

निष्कर्ष

भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र एका बदलत्या आणि निर्णायक टप्प्यावर आहे. ईसीएमएस अंतर्गत मंजूर प्रकल्पांनी स्वयंपूर्णता वाढविण्याच्या दिशेने आणि जागतिक तंत्रज्ञान उत्पादन नकाशावर भारताचे स्थान बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मजबूत गुंतवणूक, उच्च उत्पादन, रोजगार निर्मिती आणि वाढते निर्यात क्षेत्र, या सर्वांमुळे भारताचा इलेक्ट्रॉनिक्स मूल्यसाखळीचा पाया अधिक भक्कम होत आहे.

घटकांपासून संपूर्ण उपकरणांपर्यंत, भारत आत्मविश्वासाने उत्पादन क्षमतेत प्रगती करत आहे. निर्यात, देशांतर्गत उत्पादन आणि मोबाइल क्षेत्रातील झपाट्याने झालेली वाढ हे सर्व भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट करतात.

संदर्भ

पीआयबी पार्श्वभूमी:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2177755

वाणिज्य व उद्योग मंत्रालय:
https://niryat.gov.in/

****

नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai

(Backgrounder ID: 156482) आगंतुक पटल : 6
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Nepali , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Kannada , Malayalam
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate