दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विशेष बल्क पार्सल सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र टपाल मंडळ आणि मध्य रेल्वे करार बद्ध
भारतीय टपाल विशेष पार्सल सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सुरु; औरंगाबाद आणि गोव्याचा समावेश लवकरच
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2020 4:42PM by PIB Mumbai
मुंबई, 16 मे 2020
भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथून पार्सल वाहतुकीसाठी मध्य रेल्वे सोबत करार केला आहे. कोविड-19 मुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत, भारत टपाल रेल्वे पार्सल सेवे अंतर्गत ग्राहकांच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात वस्तू/पार्सल एकत्रित केले जाईल आणि गंतव्य स्थानावर पोहोचवले जाईल. आतापर्यंत, मध्य रेल्वे आणि भारत टपाल मेल मोटार सेवेद्वारे चालविण्यात येणाऱ्या चार विशेष पार्सल रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून राज्यातील 3 शहरांमध्ये ही पार्सल सेवा देण्यात येईल. पुढील टप्प्यात या पार्सल वितरण सेवेचा विस्तार करून यामध्ये औरंगाबाद आणि गोव्याचा समावेश करण्याची योजना आहे. 15 मे 2020 पासून या सेवेला सुरुवात झाली आहे.
9 मे रोजी नागपुरातील हिंगणा येथून 16 मोठ्या आकाराचे पार्सल घेऊन दुसर्या दिवशी मुंबईच्या दादर येथे हे पार्सल पोहचवून विशेष पार्सल वितरण सेवेची चाचणी घेण्यात आली. भारतीय टपाल विभाग त्याच्या जवळील वाहनांचा ताफा आणि टपाल कार्यालयांच्या नेटवर्कचा वापर करून ग्राहकांच्या घरातून पार्सल घेणे आणि ते वितरीत करण्याचे काम करेल, तर कोविड-19 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे द्वारे महत्वाच्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या विशेष पार्सल रेल्वे गाड्या मूळ आणि गंतव्य स्थानकांदरम्यान पार्सलची वाहतूक करतील.

9 मे 2020 रोजी विशेष पार्सल सेवेच्या चाचणी दरम्यान नागपुरातील हिंगणा येथून मोठ्या प्रमाणात पार्सल रवाना करण्यात आले.

नागपूरहून पहिले पार्सल 10 मे 2020रोजीमुंबईच्या दादर येथे प्राप्त झाले.
विशेष पार्सल वितरण सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक या लिंकमध्ये दिलेल्या महाराष्ट्र टपाल मंडळ अंतर्गत विशिष्ट टपाल विभाग आणि विभागाच्या नोडल अधिकारी व हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
वैयक्तिक आणि व्यवसायिक आस्थापनांना त्यांच्याकडील जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या मोठ्या पार्सलच्या वाहतूक अनेक अडचणी येत असल्यामुळे या सेवेची आवश्यकता भासली. म्हणूनच महराष्ट्र टपाल मंडळाने मोठ्या आणि वजनाने जड असणार्या पार्सलची वाहतूक करणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले. आता 200 किलोपेक्षा जास्त वजनाच्या मोठ्या वस्तूंसाठी विशेष पार्सल सेवा त्यांच्या उपयोगात येईल.
लॉकडाऊन कालवधीत, राज्यातील ग्राहक त्यांचे पार्सल पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पीड पोस्ट सेवेचा उपयोग करतात. आत्तापर्यंत, पोस्ट विभागाने स्पीड पोस्ट सेवांच्या माध्यमातून हजारो टन आवश्यक वस्तू जसे वैद्यकीय उपकरणे, मुखवटे इत्यादी वितरित केल्या आहेत. असे असले तरी देखील, व्यावसायिक ग्राहकांना ही सेवा वापरणे अवघड होत आहे कारण स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांना टपाल कार्यालयात जावे लागते आणि इतर रस्ते वाहतूकीचा खर्च अधिक आहे. ही अडचण दूर करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी ही नवीन सेवा सुरु केली आहे.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1624429)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English