57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

ओटीटीमुळे सर्जनशीलतेच्या नव्या संधी खुल्या; भाषेच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांना जोडण्याचे प्रभावी माध्यम : इफ्फी ओटीटी पुरस्कार परीक्षक मंडळाचे प्रतिपादन


डिजिटल माध्यमातील बदलत्या कथनशैली, व्यक्तिरेखांवर आधारित कथाकथन आणि नवोदित कलावंतांसाठी उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत परीक्षक मंडळातील सदस्यांनी व्यक्त केले विचार

Posted On: 28 NOV 2026 2:07PMby PIB MumbaiRelease ID: 2343039Views: 9

गोवा, 28 नोव्‍हेंबर 2026

 

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जेडी मजेठिया आणि सदस्य कृष्णा हेब्बाले, शैलेंद्र झा व गरिमा वाहल यांनी ओटीटीवरील कथाकथनाचा बदलता प्रवास, प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि डिजिटल मंचांमुळे सर्जनशील क्षेत्रातील कलावंतांसाठी निर्माण झालेल्या संधींविषयी आपले विचार मांडले.

मनोरंजन उद्योगाच्या विस्ताराविषयी बोलताना परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जेडी मजेठिया म्हणाले की इंटरनेटचा वाढता प्रसार आणि ओटीटी व्यासपीठांमुळे प्रेक्षकांना विविध देशांतील तसेच भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील आशय पाहण्याची संधी मिळाली आहे. यामुळे कथाकथनाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. भारताच्या मनोरंजन उद्योगाला पुढे नेण्याची क्षमता गोवा आणि इफ्फी या व्यासपीठामध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ओटीटी पुरस्कारासाठी वेब सिरीजचे परीक्षण करतानाचे अनुभव मजेठिया यांनी कथन केले. परीक्षक मंडळातील प्रत्येक सदस्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परीक्षण करताना कथानकाची मांडणी, व्यक्तिरेखांची उभारणी, अभिनय, सादरीकरणातील प्रभाव आणि मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर उमटणारा दीर्घकालीन ठसा या बाबी विचारात घेण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. 

वेब सिरीजमध्ये अनेक प्रमुख व्यक्तिरेखा एकत्र असलेल्या कथानकांना आणि व्यक्तिरेखांवर केंद्रित कथांना वाढते महत्त्व मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या तुलनेत वेब सिरीजचे विस्तारित स्वरूप कथा आणि व्यक्तिरेखा अधिक सखोलपणे विकसित करण्याचे स्वातंत्र्य देते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोविड-19 साथरोगामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळाल्याचे मजेठिया यांनी नमूद केले.

परीक्षक मंडळाचे सदस्य कृष्णा हेब्बाले यांनी वेब सिरीजमधील लेखनाचा दर्जा सातत्याने उंचावत असल्याचे अधोरेखित केले. एखादी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरली, तर ते लगेच दुसरी मालिका पाहण्याकडे वळू शकतात, असे त्यांनी सांगितले. वेब सिरीजमधील अभिनयाची तुलना कसोटी क्रिकेटशी करताना ते म्हणाले की या माध्यमात कलाकारांना दीर्घकाळ आपली अभिनयक्षमता टिकवून ठेवावी लागते. त्याचवेळी व्यक्तिरेखांचे विविध पैलू उलगडून दाखवण्याची अधिक संधीही त्यांना मिळते.

पारंपरिक मनोरंजन क्षेत्रात संधी न मिळू शकलेल्या सर्जनशील अभिव्यक्तींना ओटीटी मंचामुळे नवी दारे खुली झाली आहेत, असे शैलेंद्र झा यांनी सांगितले. या प्रकाराअंतर्गत विविध प्रकारच्या आणि हळू हळू उलगडत जाणाऱ्या पात्रांवर भर दिला जातो, त्यामुळे प्रेक्षक त्या पात्रांच्या प्रवासात गुंतून जातात आणि पुढे काय घडते हे पाहण्यासाठी उत्सुक असतात, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. उपशीर्षकांमुळे (सबटायटल्स) भाषा समजण्याशी संबंधित अडथळे दूर व्हायला मदत होत असून विविध भाषिक पार्श्वभूमीच्या कथांचा अनुभव घेणे प्रेक्षकांना शक्य होऊ लागले असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेब मालिकांमुळे प्रेक्षकांना विविध प्रकारच्या कथा, भावना आणि सर्जनशील प्रतिभेच्या माध्यमातून भारतातील वैविध्याचे दर्शन घडू लागले असल्याचे मत, परीक्षक मंडळाच्या सदस्य गरिमा वहल यांनी व्यक्त केले. तुलनात्मक पातळीवर हा अनुभव पुस्तक वाचल्यासारखाच असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकारामुळे प्रेक्षकांशी अधिक आपुलकीचे नाते तयार होते असे त्यांनी सांगितले. विविध शैलींची वाढती लोकप्रियता आणि सलग पाहता येण्याच्या सुविधेमुळे संपूर्ण कथा एकाच वेळी पाहण्याची लवचिकता मिळाल्याने मनोरंजनाची व्याप्ती विस्तारली आहे, आणि उदयोन्मुख कलाकारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

प्रयोगशीलतेला प्रोत्साहन, सर्जनशीलतेशी संबंधित संधींचा विस्तार आणि देशभरातील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण कथा आणि अभिव्यक्ती पोहोचवण्याच्या प्रक्रियेत ओटीटी मंच बजावत असलेली भूमिकाही परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी अधोरेखित केली.

कथाकथनाचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि शैलींचा गौरव करणे, तसेच सिनेमा आणि मनोरंजनाचे मनोरंजनाचे बदलत्या स्वरूपाची दखल घेणे हाच 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा दृष्टीकोन आहे. याच दृष्टीकोनाची व्यापक प्रचिती या सत्रात झालेल्या चर्चेतून आली. या सत्राच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध व्यक्तिमत्वे एकत्र आली होती. उदयाला येत असलेले नवे प्रकार, विकसित होत असलेल्या सर्जनशील पद्धती आणि भारताच्या दृकश्राव्य क्षेत्राचे भविष्य घडवणाऱ्या संधींबद्दलचा संवाद घडवून आणण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न इफ्फी अंतर्गतच्या अशा आयोजनातून कायम होत राहीले आहेत.

महेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/वैभवी जोशी/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2343039
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026