Posted On:
28 NOV 2026 12:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 नोव्हेंबर 2026) केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीमध्ये ऑटम टर्म 2026 (शरद सत्र 2026) च्या 'पासिंग आऊट परेड'चे (दीक्षांत संचलन) निरीक्षण केले.

या प्रसंगी बोलताना, राष्ट्रपतींनी भारतीय तटरक्षक दलातील तसेच मित्र राष्ट्रांमधील प्रशिक्षणार्थींचे, हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये अनेक युवा महिला आहेत, याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांची उपस्थिती संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, त्यांनी हे सिद्ध केले आहे की, दृढनिश्चय, धैर्य आणि क्षमता याला कोणतीही सीमा नसते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या यशातून अनेक युवा महिलांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि राष्ट्रसेवेमध्ये आव्हानात्मक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात सागरी क्षेत्र अधिक महत्त्वाचे झाले आहे, कारण जागतिक व्यापाराचा मोठा भाग समुद्रमार्गे जातो. म्हणून समुद्री मार्गांची सुरक्षा राष्ट्रांच्या आर्थिक कल्याणाशी आणि देशाच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. जहाजांच्या हालचालीत कोणताही व्यत्यय आला, तर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, खर्च वाढू शकतो आणि शेवटी सामान्य नागरिकांवर त्याचा अतिरिक्त भार पडू शकतो, असे त्या म्हणाल्या. त्यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले की, समुद्रातील त्यांची सेवा, ही जमिनीवरील लोकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. ही सेवा लोकांची सुरक्षा, समृद्धी आणि कल्याणामध्ये थेट योगदान देते.

राष्ट्रपतींनी सांगितले की, तरुण कॅडेट्सची सचोटी, व्यावसायिक कौश, धैर्य आणि करुणा हे गुण भारतीय नौदलाचे चारित्र्य घडवतील. समुद्रावर त्यांना आव्हानात्मक हवामान, दीर्घकाळ मोहिमेवर राहणे आणि अनिश्चित परिस्थितींचा सामना करावा लागेल. त्यांना अनेकदा दबावाखाली राहून कठीण निर्णय घ्यावे लागतील. त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावे, की नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर जबाबदारी स्वीकारणे, स्वतः आदर्श घालून देणे आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचे प्रशिक्षण, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता आणि त्यांची निष्ठा त्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी सांगितले की, कॅडेट्स जो गणवेश परिधान करतात, त्यामध्ये सव्वा अब्जांहून अधिक भारतीयांचा विश्वास आणि अपेक्षा सामावल्या आहेत. प्रत्येक नागरिक, मग तो कुठेही राहत असो किंवा काहीही काम करत असो, आपल्या सशस्त्र दलांकडे विश्वासाने आणि अभिमानाने पाहतो. तरुण कॅडेट्सनी भारतीय नौदलाच्या सर्वोच्च परंपरांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपतींचे भाषण इथे लिंक वर पाहता येईल
* * *
नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai